माघ पौर्णिमा : बौद्ध धम्मामधील महत्त्व

आज माघ पौर्णिमा : बौद्ध धर्मात पौर्णिमा महत्त्वाची मानली जाते. या लेखात आपण माघ पौर्णिमेचे महत्त्व आणि त्याचा गौतम बुद्धांशी असलेला संबंध जाणून घेणार आहोत.

Magh Purnima
Magh Purnima – माघ पौर्णिमा आणि तिचे बौद्ध धम्मामधील महत्त्व

पौर्णिमा (किंवा बौद्ध पौर्णिमा) या तथागत बुद्ध आणि त्यांच्या जीवन कार्याशी संबंधित आहेत. त्यामुळे बौद्ध धर्मात पौर्णिमेला खूप महत्त्व आहे.

 

माघ पौर्णिमा

माघ पौर्णिमा साधारणतः फेब्रुवारी महिन्यात येते. बुद्ध काळातील तीन महत्त्वाच्या घटनांचा स्मरणोत्सव म्हणून या पौर्णिमेचे महत्त्व आहे. बौद्ध धम्मामध्ये माघ पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे.

१) एक हजार दोनशे पन्नास अर्हत भिक्खूंच्या उपस्थितीत सारिपुत्त आणि मोग्गल्लान या शिष्यांचा गौरव व उच्च स्थान प्रदान

२) भिक्खूंकरिता नीतितत्त्वांचे निर्धारण.

३) स्वतःच्या महापरिनिर्वाणाची भगवान बुद्धाद्वारे घोषणा.

 

सारिपुत्त आणि मोग्गल्लान यांचा गौरव

सारिपुत्त आणि मोग्गल्लान हे घनिष्ट मित्र होते. त्या दोघांचे ध्येय एकच होते. जीवन आणि मृत्युच्या रहस्याचा छडा लावणे, त्याची उकल करणे. बुद्ध अनोमदस्सी यांचे जीवनकाळात, अनोमदस्सी यांनी आपल्या अतिंद्रिय शक्तीने जाणले होते की, बुद्ध गौतमच्या जीवन काळात हे दोघे त्यांचे प्रमुख शिष्य होतील. पारमितांची पूर्तता करता- करता बुद्ध गौतमाच्या काळात त्यांना इष्ट फलप्राप्ती झाली.

सारिपुत्त याचे पूर्वाश्रमीचे नाव उपतिस्स. अंर्तमनाचा शोध घेणारी अंतदृष्टी असणारे, प्रज्ञावंत आणि सखोल जाणकार असलेले सारिपुत्त भगवान बुद्धाचे प्रमुख शिष्य बनले. बुद्धाखालोखाल प्रज्ञेच्या क्षेत्रात ते जाणकार होते. तत्त्वज्ञान शिकविण्याची त्यांची कुवत जवळपास बुद्धासारखीच होती. त्यांच्या तेजस्वी धारदार प्रज्ञेने, बुद्धीमत्तेने आणि निष्कलंक चारित्र्याने त्यांना “अनु-बुद्ध” अर्थात दुसरे बुद्ध असे गौरवशाली नामाभिधान मिळवून दिले.

मोग्गल्लान यांचे पूर्वीचे नाव कोलित होते. भगवान बुद्धांचे द्वितीय परमशिष्य होण्याचा सन्मान त्यांना मिळाला. बुद्धांच्या तुलनेत जरी ते कमी असले तरी त्यांना परामानसिक (परचित्तविज्ञाण-ऋद्धि) शक्ती प्राप्त होत्या व त्या क्षेत्रात ते अव्वल होते.

 

या द्वयीचा भगवान बुद्ध किती सन्मान, आदर करायचे ते सच्च विभंग सुत्तावरून स्पष्ट होते. (मज्झिम-निकाय) बुद्ध म्हणतात- “भिक्खूंनो, सारिपुत्त आणि मोग्गल्लान यांचेशी सौख्य बाळगा, त्यांचा कित्ता गिरवा कारण ते समंजस आणि आपल्या धम्मबंधुंसाठी त्यांच्या धम्मजीवनात पाठिराखे आहेत. सारिपुत्त आईसारखे तर मोग्गल्लान सेवा करणाऱ्या दाईसारखे आहेत. सारिपुत्त तुम्हाला निब्बाणाकडे जाणाऱ्या प्रवाहात सोडून देण्यास समर्थ आहेत तर मोग्गल्लान तुमच्यातील अत्युच्च आदर्शाचे दर्शन करून देण्यास सक्षम आहेत. चार आर्यसत्यांचे दर्शन, आकलन, मिमांसा स्पष्ट करून देण्यास सारिपुत्ताचा हातखंड आहे.”

सारिपुत्ताच्या अनुपम गुणांबद्दल भगवान बुद्धाने अनुप्पाद सुत्तामध्ये त्याची प्रशंसा केली आहे. बुद्ध म्हणतात- “जर कोणाला खरोखर असे म्हणायचे असेल की श्रेष्ठ सद्गुण, श्रेष्ठ ध्यान, श्रेष्ठ प्रज्ञा, विमुक्ती यांमध्ये कोणी पारंगत असेल काय? तर असा पुरुष सारिपुत्त आहे. जर कोणाला म्हणायचे असेल, भगवान बुद्धाचा खरा पुत्र कोण? तर तो सारिपुत्त होय. शुद्ध वाणी लाभलेला, धम्मात जन्मलेला, धम्माचा बनलेला आणि धम्माचा उत्तराधिकारी (लौकिक वस्तूंचा उत्तराधिकारी नव्हे) होय. माझ्या पश्चात सारिपुत्त धम्मचक्राचे प्रवर्तन करेल.”

 

एकदा सारिपुत्ताबद्दल काही आरोप करण्यात आले. सारिपुत्त अविचल, निश्चल, अभंग राहिले. भगवान बुद्ध म्हणाले – ‘भिक्खूंनो सारिपुत्त क्रोध आणि द्वेष जोपासत राहिल हे अशक्य होय. सारिपुत्ताचे मन पृथ्वीसारखे विशाल, द्वाराच्या खांबासारखे दृढ आहे. शांत सरोवरासारखे निश्चल आणि स्वच्छ आहे. पृथ्वीसारख्या क्षमाशील, सरोवरासारख्या स्वच्छ व निर्मळ मनाच्या सद्गुणी सारिपुत्ताला निब्बाण मिळाले आहे.’

मुक्तीपथावर आरूढ झालेल्या साधकाला परोपरीने विस्मयकारक मदत केल्याची अनेक उदाहरणे पाली वाङ्मयात आदरणीय मोग्गल्लान यांचे नावे आलेली आहेत.

 

माघ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी एक हजार दोनशे पन्नास अर्हत भिक्खुंच्या उपस्थितीमध्ये भिक्खु संघाच्या मोठ्या सभेमध्ये अर्हत भिक्खु सारिपुत्र आणि अर्हत भिक्खु मोग्गल्यायन या दोघांची भिक्खु संघाचे प्रमुख ‘धम्म सेनापती‘ म्हणून निवड केली. उच्च स्थान प्रदान करुन या दोन बुद्धशिष्यांचा मोठा गौरव करण्यात आला.

 

भिक्खूंकरिता नीतितत्त्वांचे निर्धारण

सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा ।

सचित्त परियोदपनं, एतं बुद्धान सासनं ।।

खन्ति परमं तपो तितिक्खा, निब्बाणं परमं वदन्ति बुद्धा ।

न हि पब्बज्जितो परूपघाती,

न समणो होति परं विहेठयन्तो ।।

अनूपवादो अनूपघातो, पातिमोक्खे च संवरो ।

मत्तश्रुता च भत्तस्मिं, पन्थं च सयनासनं ।

अधिचित्तेच आयोगो, एतं बुद्धान सासनं ।। (धम्मपद)

 

माघ पौर्णिमेला भिक्खु संघाकरिता विनय (नियम) तयार केले गेले. भिक्खु संघाची आचार संहिता म्हणून या विनय पीठकाला फार महत्त्वाचे स्थान आहे.

कोणतेही पापकर्म (अकुशल कर्म) न करणे, पुण्यकर्म (कुशल कर्म) सतत करणे आणि आपल्या चित्ताची परिशुद्धी करणे ही बुद्धांची शिकवण आहे. सहनशीलता आणि क्षमाशीलता परम तप आहे. निर्वाण हे उत्तम आहे.

दुसऱ्यांचा घात करणारा प्रवज्जित होत नाही. दुसऱ्यांना त्रास देणारा, श्रमण होवू शकत नाही. निंदा न करणे, घात न करणे, प्रातिमोक्ख (भिक्खु-नियम) द्वारा स्वतःला सुरक्षित ठेवणे, आपल्या आहारात सतुलन ठेवणे. एकांतात झोपणे बसणे आणि आपल्या संत इसे चित्ताला एकाग्र करण्याचा सतत प्रयत्न करणे ही बुद्धांची शिकवण आहे.

 

महापरिनिर्वाणाची घोषणा

भगवान बुद्धांनी दिवशी वैशाली नगरीत मुक्काम केला. ग्रीष्मकालीन वास्तव्य संपवून ते हिवाळ्यात चापाल चैत्य येथे राहत होते. तेव्हा महाकारुनिका तथागत सम्यक संबुद्ध आनंदला बोलावून म्हणाले, ‘आनंद! भगवान बुद्ध लवकरच महापरिनिर्वाण प्राप्त करतील!’ ते ऐकून आनंद म्हणाला – ‘तुम्ही भगवंत संघाचा काहीतरी उपदेश करा.’ तेव्हा भगवान बुद्धांनी उपदेश केला. या माघ पौर्णिमेला बुद्धांनी सांगितले होते की आजपासून तीन महिन्यांनी तथागतांचे महापरिनिर्वाण होईल.

जीवनातील दुःखांनी संत्रस्त होवून सत्याचा शोध घेणाऱ्यांना मार्ग दाखविण्याकरिता बुद्धांचा उद्‌भव होतो. भगवान बुद्धांच्या दीर्घ आणि परिपूर्ण जीवनाने त्यांचा उद्देश सफल झाला. वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांना वाटले की त्यांचे कार्य पूर्ण झाले आहे. बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना- गृहस्थी आणि गृहत्यागी, यांना भरपूर उपदेश, सूचना, आवश्यक मार्गदर्शन केले आहे.

अष्टांग मार्गात त्यांचे अनुयायी पारंगत झाले आहेत. धम्म जाणून घेतला आहे व इतरांना शिकवण्याचे कौशल्य आणि कुवत त्यांचे ठायी आली आहे. अर्हतपदाचा अत्यानंद दिर्घकाल उपभोगिला आहे आणि स्वेच्छेने आयुष्य वाढवून घेण्याचे काहीच कारण नाही. चापाल येथील चैत्यात निवास करताना तीन महिन्यानंतर आपले महापरिनिर्वाण होईल अशी घोषणा भगवान बुद्धांनी आनंदाजवळ केली.

(महापरिनिब्बान सुत्त)हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *