दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे | Statues of Dr Ambedkar in Delhi

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे तमाम भारतीयांसाठी बाबासाहेबांचा सांस्कृतिक वारसा आहेत. दिल्लीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक सुंदर पुतळे उभारण्यात आलेले आहेत, ज्यापैकी एक बाबासाहेबांचा पुतळा संसद भवन परिसरात उभा आहे.

  यह लेख हिंदी में पढ़े  

Statues of Dr Babasaheb Ambedkar in Delhi
दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे – Statues of Dr Babasaheb Ambedkar in Delhi

आपणास माहितच असेल की भारतात सर्वात जास्त पुतळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत आणि त्यांची संख्या एक लाखापेक्षा अधिक आहे.

जगभरात बाबासाहेबांची अनेक भव्य आणि सुंदर शिल्पे निर्मिलेली आहेत. भारताची राजधानी दिल्लीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बरेच पुतळे आहेत, आणि यांपैकीच काहींची माहिती या लेखामध्ये आपल्याला बघायला मिळेल. केवळ बाबासाहेबांसाठीच नव्हे तर दिल्लीसाठी सुद्धा हे पुतळे गौरव ठरत आहेत. देशातील विशेषतः दिल्लीतील जनता या भीम पुतळ्यांसमोर नतमस्तक होऊन महान राष्ट्रनिर्मात्यास अभिवादन करते.

 

दिल्लीतील एकापेक्षा एक सुंदर बाबासाहेबांचा पुतळा

1. भारतीय संसद भवन

statues of ambedkar in delhi बाबासाहेबांचा पुतळा
14 एप्रिल 2016 रोजी संसद भवन येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त नागरिक त्यांना आदरांजली वाहताना

नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात राष्ट्रनिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पंचधातूचा भव्य पुतळा उभारलेला आहे. बाबासाहेबांचे हे स्मारकशिल्प 12.5 फूट उंचीचे आहे, तर आधारासह (किंवा चौथऱ्यासह) या पुतळ्याची एकूण उंची सुमारे 25 फूट आहे. आंबेडकरवादी समाजाने या पुतळ्यासाठी लोकवर्गणीद्वारे पैसा गोळा केला होता.

हा पुतळा मुंबईचे शिल्पकार ब्रह्मेश विनायक वाघ यांनी बनवलेला होता. या पुतळ्याचे वजन दीड टन आहे. बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या डाव्या बगलेत भारतीय संविधान हे पुस्तक आहे. त्यांचा उजवा हात पूर्णपणे वर उचललेला असून तर्जनी भारतीय संसद भवनाकडे अंगुलिनिर्देशन करताना दर्शवले आहे.

भारताचे तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते 2 एप्रिल 1967 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. अनावरण सभारंभाला उपराष्ट्रपती झाकीर हुसेन, उपपंतप्रधान मोरारजी देसाई, भारताचे गृहमंत्री यशवंतराव चव्हाण, लोकसभेचे सभापती नीलम संजीव रेड्डी,  रिपब्लिकन नेते दादासाहेब गायकवाड, बाबासाहेबांचे चिरंजीव यशवंत आंबेडकर, हुमायून कबीर व इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.

संसद भवन परिसरात उभारला गेलेला हा बाबासाहेबांचा दुसरा पुतळा आहे. तत्पूर्वी केवळ मोतीलाल नेहरू यांचा पुतळा या परिसरात उभारण्यात आला आहे.  डॉ. आंबेडकर जयंती दिनी व ६ डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा व राज्यसभा सदस्य, केंद्रीय मंत्री, राज्यपाल इत्यादी नेते व जनता डॉ. आंबेडकरांना स्मरून या पुतळ्याला अभिवादन करत असतात.

 

2. दिल्ली विधानसभा

Ambedkar statues in Delhi बाबासाहेबांचा पुतळा
दिल्ली विधानसभेसमोरील बाबासाहेबांचा पुतळा (Twitter – Delhi Assembly)

दिल्ली विधानसभेसमोर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. 8 डिसेंबर 2001 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या उपस्थितीत सोनिया गांधी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष, दिल्लीचे आमदार, मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल इत्यादी राजकीय नेते बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी आणि महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या दिल्ली विधानसभेतील पुतळ्याला आदरांजली वाहतात.

दिल्ली आणि पंजाब मधील शासकीय कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग या दोनच राष्ट्रीय महापुरुषांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत.

 

3. आंध्र प्रदेश भवन

Ambedkar statues in Delhi बाबासाहेबांचा पुतळा
आंध्र प्रदेश भवनातील बाबासाहेबांचा पुतळा (Photo Credit: kailas Jivani)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दिल्लीतील आंध्र प्रदेश भवनाच्या समोर उभारण्यात आलेला आहे. आंध्र प्रदेश भवन हे एपी भवन या नावाने प्रसिद्ध असलेली नवी दिल्ली येथील आंध्र प्रदेश सरकारच्या मालकीची मालमत्ता आहे. त्याच्या आवारात निवास, कॅन्टीन आणि सभागृह असून ते येथे 19.84 एकर जमिनीवर बनवलेले आहे.

आंध्र प्रदेश राज्यामध्ये 125 फूट उंचीचा भव्य बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येत आहे, जो 6 डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होईल. हा पुतळा भारतातील सर्वाधिक उंचीच्या पुतळ्यांमध्ये स्थानापन्न होईल.

 

4. उ. डीएमसी मुख्यालय

बाबासाहेबांचा पुतळा
बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रतिष्ठापना करताना (Photo Credit: Hindustan Times)
नवी दिल्ली मधील उत्तर डीएमसी मुख्यालयाच्या (North DMC HQ) सिव्हिक सेंटरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा आहे. दिल्ली भाजपा प्रमुख आदेश गुप्ता, महापौर उत्तर दिल्ली MCD जय प्रकाश यांनी इतरांच्या उपस्थित 13 एप्रिल, 2021 रोजी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

5. बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालय, पहाडगंज

statues of ambedkar in delhi बाबासाहेबांचा पुतळा
बाबासाहेबांचा पुतळा

नवी दिल्लीतील बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळेत सुद्धा बाबासाहेबांचा एक पूर्णाकृती पुतळा आहे. बाबासाहेब आंबेडकर सेकंडरी स्कूल ही नवी दिल्लीतील पहाडगंज येथील एक माध्यमिक शाळा आहे, जीची स्थापना 1967 मध्ये झाली होती.

24 जानेवारी 2001 रोजी एड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. 15 सप्टेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विद्यालयाच्या प्रांगणात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम हाती घेतली होती.

 

6. डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (महापरिनिर्वाण भूमी)

statues of ambedkar in delhi
महापरिनिर्वाण भूमीमधील बाबासाहेबांचा पुतळा (tripadvisor.in)

बाबासाहेबांचा एक पुतळा डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात आहे. डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (Dr. Ambedkar National Memorial) हे 26 अलीपूर रोड, दिल्ली येथील एक राष्ट्रीय स्मारक आहे, स्मारकाच्या इमारतीची रचना उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार “ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक” आहे. 1951 ते 1956 या काळात बाबासाहेबांचे वास्तव्य या घरात होते. तिथेच त्यांचे 6 डिसेंबर, 1956 रोजी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यामुळे ही वास्तू ‘परिनिर्वाण स्थळ’ किंवा ‘महापरिनिर्वाण भूमी’ म्हणून ओळखली जाते.

13 एप्रिल 2018 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन व लोकार्पन करण्यात आले. स्मारकाला सुमारे 200 कोटी रूपये एवढा खर्च लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधीत पंचतीर्थांमध्ये हे एक स्मारक आहे. स्मारकाच्या आत् बाबासाहेबांचा 12 फुट उंचीचा कांस्य धातूचा एक सुंदर पूर्णाकृती पुतळा आहे. स्मारकाच्या प्रवेश द्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक अर्धाकृती पुतळा (bust) आहे. (विकिपीडिया लेख)

स्मारकाची विस्तृत माहिती 

 

7. डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (1)

statues of ambedkar in delhi बाबासाहेबांचा पुतळा
डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमधील बाबासाहेबांचा पुतळा

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये खुर्चीत बसलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अत्यंत रुबाबदार आणि सुंदर मूर्ती आहे, जिच्यामागे संसद भवनाची अप्रतिम प्रतिकृती आहे. 7 डिसेंबर 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. Dr. Ambedkar international Centre हे नवी दिल्लीतील एक आंतरराष्ट्रीय केंद्र असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले ते दिल्लीतील पहिले स्मारक आहे. ’15, जनपथ’ असा या स्मारकाचा पत्ता आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अन्य मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याक आदींच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे हे केंद्र बनविण्याचा भारत सरकारचा विचार आहे. 20 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वास्तूचे भूमिपूजन केले होते, पुढे 7 डिसेंबर 2017 रोजी या आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन मोदींच्याच हस्ते संपन्न झाले. (विकिपीडिया लेख )

 

8. डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (2)

Ambedkar statues in Delhi
डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या आवारातील बाबासाहेबांचा पुतळा (Image : Curly Tales)

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राच्या परिसरात बाबासाहेबांचा अजून एक 18 फुट उंच पुतळा उभारण्यात आलेला आहे. 7 डिसेंबर 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. केंद्राच्या आत आणि बाहेर आशा दोन्ही ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे दिमाखात उभे आहेत.

 

9. महाराष्ट्र सदन

Dr Ambedkar Statue in Maharashtra Sadan
महाराष्ट्र सदनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा – Dr Ambedkar Statue in Maharashtra Sadan

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक सुंदर पुतळा दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सुद्धा बसवण्यात आलेला आहे. हा पुतळा खुर्चीत बसलेल्या वयोवृद्ध बाबासाहेबांना दर्शवतो. महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सरकारच्या मालकीची मालमत्ता आहे. महाराष्ट्र सदनात महाराष्ट्रातील अनेक थोर व्यक्तींचे सुद्धा पुतळे बसवण्यात आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतीराव फुले यांचे पुतळे सदनाच्या आवारात प्रमुख दर्शनी ठिकाणी स्थापित केले आहेत.

मुंबई मध्ये 450 फूट उंचीचा भव्य बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येत आहे, जो 14 एप्रिल 2023 पर्यंत पूर्ण होईल. हा पुतळा जगातील सर्वाधिक उंचीच्या 3 पुतळ्यांमध्ये स्थानापन्न होईल.

 

10. CAG कार्यालय

statue of ambedkar
बाबासाहेबांचा पुतळा (cag.gov.in)

भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय सुंदर पुतळा बसवण्यात आला आहे. 22 जुलै 2022 रोजी भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

CAG चा एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह संस्था म्हणून गौरव करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, आज एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह संस्था म्हणून CAG ची प्रतिष्ठा निर्माण झाली पाहिजे आणि त्याचे श्रेय आपल्या राज्यघटनेच्या रचनाकारांना, विशेषत: डॉ. आंबेडकरांना द्यायला हवे. एक स्वतंत्र संस्था म्हणून CAG चे व्यापक अधिकार निश्चित केले गेले.

स्वातंत्र्य, वस्तुस्थितीवर आधारित निष्पक्ष वस्तुनिष्ठता, उपलब्ध वस्तुस्थितींवर निष्ठा, विश्वासार्हता, पारदर्शकता, व्यावसायिक कौशल्य उत्कृष्टता हे गुण आज CAG चे वैशिष्ट्य आहेत, हे गुण डॉ. आंबेडकरांच्या जीवनातून व आदर्शातून प्रेरित झाल्याचे ते म्हणाले. उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि सुशासन या लोकशाहीच्या आवश्यक अटी आहेत, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हे कदाचित भारताच्या संविधानातील सर्वात महत्त्वाचे अधिकारी आहेत. ती अशी व्यक्ती आहे जी हे पाहते की, संसदेने मंजूर केलेल्या खर्चाच्या मर्यादेपेक्षा जास्त पैसा खर्च होत नाही, किंवा संसदेने विनियोग कायद्यात निश्चित केलेल्या बाबींवरच पैसे खर्च करावेत. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

11. शहीदी पार्क

Ambedkar Statue in Shaheedi Park, Delhi
Dr Ambedkar Statue in Shaheedi Park, Delhi

दिल्लीतील शाहिदी पार्कमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सुंदर पुतळा आहे. शाहिदी पार्क हे 4.5 एकर जमिनीवर पसरलेले भारतातील पहिले ओपन एअर म्युझियम आहे. या ठिकाणच्या कलाकृती तुम्हाला प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारतीय इतिहासाची झलक देतात. 9 ऑगस्ट 2023 रोजी या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.

शहीद उद्यान हे भारताच्या राष्ट्रीय नायकांना तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि सार्वभौमत्वासाठी वेगवेगळ्या कालखंडात बलिदान दिलेल्या प्रसिद्ध व्यक्तींना समर्पित आहे. या सर्वांचे पुतळे येथे पाहायला मिळतात. या उद्यानात सिंहासनावर बसलेला सम्राट अशोकाचा पुतळाही आहे. याशिवाय, या उद्यानात देशातील समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा दर्शविणारी विविध आकर्षणे आहेत.

 

12. सर्वोच्च न्यायालय

Statue of Dr BR Ambedkar in the Supreme Court premises
Statue of Dr Babasaheb Ambedkar in the Supreme Court premises (photo : Anurag Bhaskar)

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सुंदर पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संविधान दिनी म्हणजेच 26 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात आले. बाबासाहेबांचा हा पुतळा 7 फूट उंच असून 3 फूट उंच व्यासपीठावर उभा आहे. पुतळ्यामध्ये डॉ. आंबेडकर वकिलाच्या वेशात असून त्यांच्या हातात संविधानाची प्रतही आहे. बाबासाहेबांचा हा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार नरेश कुमावत यांनी साकारला आहे. या पुतळ्याबद्दल अधिक वाचा


सारांश

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजच्या पोस्टमध्ये आपण दिल्लीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांविषयी माहिती बघितली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि माहिती आवडली तर तुमच्या मित्रांना मैत्रिणींना पण नक्की शेअर करा. एखाद्या नवीन विषयावर माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला विषय सांगू शकता. धन्यवाद.


आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये अनुक्रमे 205 फूट आणि 175 फूट उंचीचे बाबासाहेबांचे भव्य पुतळे बसवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही 2026 मध्ये बाबासाहेबांचा 450 फूट उंचीचा पुतळा तयार होणार आहे. तपशीलवार वाचा


‘धम्म भारत’ पर मराठी, हिंदी और अंग्रेजी में लेख लिखे जाते हैं :

 

हे ही वाचलंत का?

 


मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

2 thoughts on “दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे | Statues of Dr Ambedkar in Delhi

  1. पुस्तक रूपाने ही सर्व माहिती उपलब्ध झाली तर जे मोबाईल वापरकर्ते नाहीत अर्थात सामान्यजन त्यांच्या पर्यंत हा खजाना पोहचू शकतो. पुस्तक सामान्य माणूस विकत घेऊन वाचू ही शकतो. जयभीम

    1. जयभीम सर, तुर्तास सदर माहिती पुस्तक रुपाने आणण्याचा मानस नाही. सध्या डिजिटल माध्यमातूनच (मोबाईल) ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *