2024 लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रातील बौद्ध उमेदवार कोण होते आणि विजयी कोण झाले?

2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून पाच मोठे चेहरे असलेले बौद्ध उमेदवार उभे होते. एक पाच पैकी दोन बौद्ध उमेदवार हे विजयी झाले आहेत. या पाचही बौद्ध उमेदवारांविषयी सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील दोन बौद्ध खासदार कोणते तेही जाणून घ्या.

  यह लेख हिंदी में पढ़े 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील बौद्ध उमेदवार - Buddhist candidates from Maharashtra in 2024 Lok Sabha elections
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील बौद्ध उमेदवार – डावीकडून – वर्षा गायकवाड, यामिनी जाधव, प्रकाश आंबेडकर, बळवंत वानखेडे आणि सुधाकर शृंगारे

Buddhist candidates from Maharashtra in 2024 Lok Sabha elections

भारतात 18व्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि 4 जून 2024 रोजी निकाल लागला. भारतातून 543 उमेदवार आणि त्यांपैकी महाराष्ट्रातील 48 उमेदवार लोकसभेवर निवडून गेले आहेत. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रभावशाली राजकीय आघाड्या आहेत. याशिवाय तिसरी आघाडी म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे पाहिले जात असले तरी या पक्षाचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता फारच कमी होती. त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच उमेदवार हे महायुती आणि महाविकास आघाडीचेच निवडून येतील.

लोकसभा आणि बौद्ध उमेदवार

या लोकसभा निवडणुकीत विविध जाती-धर्माच्या लोकांना उमेदवारी देण्यात आली होती. तथापि, आपण येथे बौद्ध उमेदवारांचा विचार करणार आहोत. या निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीचे दोन आणि महायुतीचे दोन असे एकूण चार बौद्ध उमेदवार उभे होते. वंचित बहुजन आघाडीनेही 7 बौद्ध उमेदवार उभे केले होते, तर इतर तीन बौद्ध उमेदवारांना पाठिंबा दिला होता. मात्र, यांपैकी फक्त पक्षाध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याच विजयाची अत्यल्प शक्यता होती.

या निवडणुकीत राज्यातून 15 हून अधिक उल्लेखनीय बौद्ध उमेदवार उभे होते. मात्र, त्यांमध्ये तिन्ही आघाडीतील फक्त पाचच उमेदवार हे प्रबळ होते. या पाच उमेदवारांपैकी दोन उमेदवार विजयी देखील झाले. यंदाचे पाचही बौद्ध उमेदवार हे एकतर आमदार राहिले आहेत किंवा खासदार राहिले आहेत. या लेखात आपण याच पाच बौद्ध उमेदवारांवर प्रकाश टाकत आहोत, त्यांच्याविषयी जाणून घेत आहोत. 

 

सर्वप्रथम आपण बौद्धांच्या राजकीय प्रतिनिधित्वाबद्दल विचार करूयात. महाराष्ट्रात किती बौद्ध खासदार असावे? राजकीय पक्षांनी किमान किती बौद्ध उमेदवार निवडणुकीत उभे करावे? लोकसंख्येच्या गुणोत्तरानुसार महाराष्ट्रात बौद्धांना लोकसभेत 4 जागा प्रतिनिधित्व मिळायला हवे याबद्दलचा सविस्तर लेख धम्म भारत वेबसाइटवर उपलब्ध आहे (येथे वाचा).

थोडक्यात, महाराष्ट्रात लोकसभेचे 48 खासदार आहेत, त्यांपैकी चार बौद्ध खासदार असावेत. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात महार आणि बौद्ध समाजाची एकत्रित लोकसंख्या साडेआठ टक्के होती. यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना लोकसभेच्या चार जागा मिळायला हव्या होत्या म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी चार बौद्ध उमेदवार उभे करायला हवे होते, परंतु प्रत्यक्षात तसे न करता त्यांनी प्रत्येकी दोन बौद्ध उमेदवार उभे केले.

‘महायुती’मधील तीन प्रमुख पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. ‘महाविकास आघाडी’मध्ये काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) हे तीन महत्त्वाचे पक्ष आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आणि शिवसेना (UBT) या तिघांनी एकही बौद्ध उमेदवार उभा केला नाही.

 

महाराष्ट्रातील लोकसभेचे बौद्ध उमेदवार खालीलप्रमाणे होते :

महायुती :
1. सुधाकर शृंगारे, भाजप, लातूर लोकसभा मतदारसंघ (विद्यमान खासदार)
2. यामिनी जाधव, शिवसेना, दक्षिण मुंबई मतदारसंघ (विद्यमान आमदार)

महाविकास आघाडी :
3. बळवंत वानखेडे, काँग्रेस, अमरावती मतदारसंघ (विद्यमान आमदार)
4. वर्षा गायकवाड, काँग्रेस, उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ (विद्यमान आमदार)

वंचित बहुजन आघाडी :
5. प्रकाश आंबेडकर, वंबआ, अकोला मतदारसंघ (माजी खासदार)

वर्षा गायकवाड आणि बळवंत वानखेडे हे बौद्ध उमेदवार निवडून आले.

 

(याशिवाय इतरही काही बौद्ध उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे आहेत. त्यांची माहिती ‘येथे‘ पाहता येईल.)

वरील पाच बौद्ध उमेदवारांपैकी दोन उमेदवारांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून तर तीन उमेदवारांनी खुल्या मतदारसंघातून निवडणूक लढवली. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांनी आपला एक उमेदवार आरक्षित मतदारसंघातून तर दुसरा खुल्या मतदारसंघातून उभा केला होता. वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाध्यक्षानेही खुल्या मतदारसंघातून निवडणूक लढवली.

 

बौद्ध उमेदवारांची माहिती

वर्षा गायकवाड (विजयी)

महाविकास आघाडीच्या बौद्ध उमेदवार प्रोफेसर वर्षा एकनाथ गायकवाड या विद्यमान आमदार असून त्या धारावी मतदारसंघातून चार वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेल्या आहेत. त्या काँग्रेस पक्षाच्या असून त्यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 16,514 मताधिक्याने विजयी झाल्या.

त्यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम होते, जे भाजपच्या तिकिटावर उभे होते. या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भाजपच्या पूनम महाजन होत्या, ज्या सलग दोन वेळा (2014 आणि 2019 मध्ये) निवडून आल्या होत्या.

2024 लोकसभा निवडणूक – मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ :

  • मतदारसंघामध्ये झालेले एकूण मतदान –
  • काँग्रेस : वर्षा गायकवाड () यांना मिळालेली मते – 4,45,545  
  • भाजप : ॲड. उज्वल निकम यांना मिळालेली मते –  
  • इतर उमेदवारांना मिळालेली मते –
  • इतक्या मताधिक्यान पराभूत/ विजयी – 

 

वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड हे 2004 मध्ये याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. 1957 मध्ये बाबासाहेबांच्या शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे उमेदवार गोपाळ माने आणि 1998 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार रामदास आठवले यांसारखे बौद्ध राजकारणीही याच मतदारसंघातून निवडून आले होते. आता या यादीत वर्षा गायकवाड यांचेही नाव समाविष्ट झाले.

उत्तर मध्य मुंबई ही जागा गेल्या दहा वर्षांपासून (2014-24) भाजपच्या ताब्यात होती. तथापि भाजपचे 2024चे उमेदवार उज्वल निकम हे राजकारणाशी संबंधित नसले, तरी ते लोकप्रिय आहेत. दुसरीकडे, वर्षा गायकवाड या देखील सक्रिय राजकारणी आहेत, 2004 पासून सलग आमदार आणि राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्री आहेत. शेवटी, गायकवाडांनी निकम यांना मात दिली.

 

बळवंत वानखेडे (विजयी)

अमरावती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार आणि विद्यमान आमदार यांच्यातच लढत झाली. तसेच येथे दोन बौद्ध उमेदवार देखील उभे होते. या मतदारसंघात भाजपच्या नवनीत राणा पराभूत झाल्या आणि काँग्रेस पक्षाचे बौद्ध उमेदवार बळवंत वानखेडे निवडून आले. ते दरियापूर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सदस्य होते.

विद्यमान आमदार बळवंत बसवंत वानखेडे यांच्या विरोधात विद्यमान खासदार आणि भाजपच्या उमेदवार नवनीत कौर राणा आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज यशवंत आंबेडकर उभे होते. आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू असून या निवडणुकीत त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा होता. वानखेडे आणि आंबेडकर दोघेही बौद्ध असल्याने अमरावती मतदारसंघात बौद्ध मतांमध्ये मोठी फूट पडण्याची थोडी शक्यता होती पण तसे बिलकुल झाले नाही. नाहीतर महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना त्याचा निश्चितच फायदा झाला असता. 

2019 मध्ये, नवनीत राणा अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या, परंतु तेव्हा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपसोबत जुळवून घेतले. बळवंत वानखेडे हे एकदाच आमदार झाले आहेत, आणि नवनीत राणा याही एकदाच खासदार झाल्या आहेत. तर आनंदराज आंबेडकर कधीही खासदार किंवा आमदार झाले नाहीत. मात्र, राज्यातील आंबेडकरी जनतेमध्ये त्यांची लोकप्रियता आहे. परंतु अमरावती मतदारसंघांमध्ये बौद्ध जनतेने सुद्धा त्यांना नाकारल्याचे दिसून आले.

अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती (SC) साठी राखीव आहे. नवनीत कौर राणा या अनुसूचित जातीतील ‘चमार’ जातीच्या असून शिख वा हिंदू समाजाच्या आहेत. दुसरीकडे बळवंत वानखेडे आणि आनंदराज आंबेडकर हे दोघेही ‘महार’ जातीचे व बौद्ध समाजाचे आहेत. वानखेडे आणि राणा यांच्यातील तुरशीच्या लढाईत वानखेडे यांनीच बाजी मारली. तर आंबेडकरांनी चौथ्या क्रमांकाची मते घेतली.

 

सुधाकर शृंगारे (पराभूत)

लातूर लोकसभा मतदारसंघातून बौद्ध उमेदवार सुधाकर तुकाराम श्रृंगारे उभे होते. श्रृंगारे हे विद्यमान खासदार आणि भाजप पक्षाचे आहेत. 2019 मध्ये लातूर मतदारसंघातून ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. 2019-24 मध्ये 17व्या लोकसभेचे महाराष्ट्रातील एकमेव बौद्ध खासदार सुधाकर शृंगारे होते. यापूर्वी 2014 मध्येही लातूरमधून भाजपचे उमेदवार निवडून आले होते.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुधाकर श्रृंगारे यांना महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी पराभूत केले. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे डॉ. काळगे हे नेत्रशैल्यचिकित्सक असून राजकारणातील नवा चेहरा आहेत.

लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. डॉ. शिवाजीराव काळगे हे अनुसूचित जातीतील ‘माला जंगम’ जातीचे तसेच लिंगायत समाजाचे आहेत. दुसरीकडे सुधाकर श्रृंगारे हे ‘महार’ जातीचे तसेच ते बौद्ध समाजाचे आहेत.

लातूर लोकसभेची जागा भाजपसाठी मजबूत होती कारण येथून दोनदा भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत आणि 2024 चे उमेदवार हे स्वतः विद्यमान खासदार होते. त्यामुळे येथे भाजपचा काँग्रेसवर वरचष्मा असल्याचे वाटत होते, परंतु तब्बल 61,881 मतांनी सुधाकर शृंगारे पराभूत झाले. 

 

यामिनी जाधव (पराभूत)

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातही विद्यमान आमदार आणि विद्यमान खासदार यांच्यात लढत झाली. यामिनी यशवंत जाधव (शिंदेंच्या) शिवसेनेच्या विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर (ठाकरेंच्या) शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत उभे होते, जे विद्यमान खासदार आहेत. म्हणजेच दक्षिण मुंबईच्या जागेवर दोन्ही शिवसेना एकमेकांविरुद्ध लढल्या, आणि त्यात ठाकरेंची शिवसेना विजय ठरली. अरविंद सावंत यांनी यामिनी जाधव यांना 52,673 मतांनी पराभूत केले.

यामिनी जाधव या बौद्ध धर्मीय असून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्या भायखळा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्या एकदाच आमदार झाल्या आहेत. पण दुसरीकडे अरविंद सावंत हे 2014 आणि 2019 मध्ये दोनदा शिवसेनेकडून लोकसभेचे खासदार झाले होते. आता ते तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत.

 

प्रकाश आंबेडकर (पराभूत)

वंचित बहुजन आघाडीचे (व्हीबीए) अध्यक्ष प्रकाश यशवंत आंबेडकर हे नेहमीप्रमाणे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि पराभूत झाले. या जागेवरून त्यांनी सातव्यांदा निवडणूक लढवली. सुरुवातीला ते 1990-1996 मध्ये राज्यसभेत खासदार होते आणि नंतर ते अकोला मतदारसंघातून दोनदा (1998 आणि 1999 मध्ये) लोकसभेवर निवडून गेले. मात्र त्यानंतर त्यांना [2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये] सलग पाच वेळा पराभवाला सामोरे जावे लागले. 

2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांसमोर भाजपचे उमेदवार अनुप संजय धोत्रे आणि काँग्रेसचे उमेदवार अभय काशिनाथ पाटील अशी दोन आव्हाने होती. अनुप धोत्रे या निवडणुकीत विजयी झाले तर दुसऱ्या क्रमांकाची मते अभय पाटील यांची घेतली होती आणि प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावर होते.

धोत्रे आणि पाटील या दोन सवर्ण हिंदूंमुळे हिंदूमतांची विभागणी होईल, तसेच येथील मुस्लिम मतदार काँग्रेसच्या आरएसएसची पार्श्वभूमी असलेला हिंदुत्ववादी उमेदवाराला मत देणार नाहीत असे शक्यता वर्तवली जात होती, परंतु या दोन्ही शक्यता पूर्णपणे फोल ठरल्या. विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप धोत्रे राजकारणातील नवा चेहरा असल्याने अकोल्यातील मतदारांनी त्यांना त्यांच्या वडिलांइतके मते दिली नाहीत पण विजयी जरूर केले.

गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांचा 2.79 लाख मतांनी पराभव झाला होता. 2019 च्या निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे यांना 5.54 लाख, वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना 2.76 लाख आणि काँग्रेसचे हिदायतुल्ला पटेल यांना 2.54 लाख मते मिळाली होती. जर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील झाली असती तर यावेळी प्रकाश आंबेडकर नक्कीच जिंकू शकले असते. 2024 च्या निवडणुकीत ॲड. आंबेडकर हे दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरल्याचे दिसले. परिस्थितीशी जुळून न घेणे आणि वास्तविकतेपासून दूर राहणे यामुळे वंचित बहुजन आघाडी ही फेल ठरली.


  • या व्यतिरिक्त देखील काही बौद्ध उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे आहेत. त्यांची माहिती आपण ‘येथे’ पाहू शकता.


‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी ई-मेल करु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *