डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सोपारा येथे बुद्धजयंती निमित्त भाषण (6 मे 1955)

“मानवाच्या विवेकबुद्धीला केवळ बुद्धाने आव्हान केले आहे” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात. सदर लेखामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आहे, जे त्यांनी 6 मे 1955 रोजी महाराष्ट्रातील सोपारा येथे बुद्धजयंती निमित्य केले होते.

Dr. Babasaheb Ambedkar's speech at Sopara on the occasion of Buddha Jayanti (6 May 1955)
बुद्ध जयंती निमित्त सोपारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण (6 मे 1955)

आपल्या जाहीर धर्मांतरापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माच्या प्रचारार्थ अनेक भाषणे केली होती. 6 मे 1955 रोजी महाराष्ट्रातील सोपारा (नालासोपारा) येथे बुद्ध जयंतीनिमित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले होते. 

दिल्ली येथे सार्वजनिक बुद्धजयंतीचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 2 मे 1950 रोजी झाला होता. 6 मे 1955 रोजी महाराष्ट्रातील सोपारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत बुद्धजयंतीचा कार्यक्रम झाला. 

भगवान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञान व महापरिनिर्वाण असा त्रिवार मंगलमय दिवस म्हणजेच वैशाख पौर्णिमा हा होय. 6 मे 1955 ला वैशाख पौर्णिमेला बुद्धांच्या महापरिनिर्वाणाला 2499 वर्षे पूर्ण झाली होती.

6 मे 1955 यादिवशी 2579वी बुद्धजयंती आणि 2499वे बौद्धवर्ष (बुद्ध निर्वाणवर्ष) होते. 1956 मध्ये 2500व्या बौद्धवर्षाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘जाहीरपणे’ बौद्धधर्म स्वीकारला, तथापि या आधीही ते बौद्ध धर्मीय होते.

धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांनी 6 मे 1955 रोजी नागपुरात देखील तीन दिवसांचा बुद्ध जयंतीचा कार्यक्रम घेतला होता. 

 

Dr. Babasaheb Ambedkar’s speech at Sopara on the occasion of Buddha Jayanti on 6 May 1955

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 6 मे 1955 ला सोपारा येथे बुद्ध जयंतीनिमित्य केलेले भाषण खालीलप्रमाणे आहे :

मानवाच्या विवेकबुद्धीला केवळ बुद्धाने आव्हान केले आहे.

आज मी तुम्हाला भगवंताच्या धर्माचे सार थोडक्यात सांगणार आहे. बुद्धाने सांगितलेला धर्म सोडला तर सर्वच धर्माची उभारणी देव आणि आत्मा या जोडीवर करण्यात आली आहे. भक्तीच्या तथाकथित पुण्याईचे गाठोडे घेऊन जीवा – शीवाची गाठ पडते, आत्मा ईश्वरात विलीन होतो असा काल्पनिक आधार देव आणि आत्मा यांची बैठक पक्की करण्यासाठी दिलेला आहे. अशा कच्च्या पायावर उभारलेला हा देव आत्म्याचा पोकळ डालोरा आहे. भक्तिचे प्रकार आपल्याला माहीत आहेतच. पूजा-अर्चा, धूप-दीप, मंत्र-तंत्र, जप-तप, कर्म-कांड या मार्गांचा अवलंब ईश्वर भक्तिसाठी केला जातो. पण त्याशिवाय जीव हिंसा, नरबली इत्यादी अघोरी प्रकारही आहेत. भूतेखेते प्रसन्न करण्यासाठी नाना खुळचट विधी आहेत.

सर्वांच्या मुळाशी एकच कल्पना. जीव हा पापी असल्यामुळेच जन्माला येतो. तेव्हा पापक्षालनासाठी जीवाने देह झिजवून तपत्याग साधले तरच ईश्वराची त्याच्याशी गाठ पडू शकते. अशारितीने जन्माचे सार्थक होऊन जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. थोड्या फार फरकाने अशाच भ्रामक कल्पना आत्मा आणि ईश्वर यांचा संबंध जोडण्यासाठी व त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सर्वत्र पसरवलेल्या आहेत. बौद्ध धर्मात आत्म्याला स्थान नाही तसेच ईश्वराची उचलबांगडी करण्यात आली आहे.

बौद्ध धर्म सोडून जगाच्या पाठीवर दुसरा कोणताही धर्म घ्या. प्रत्येक धर्मानुयायी आणि त्यांचे प्रमाण ग्रंथ तो धर्म ईश्वराने सांगितलेला आहे, असेच प्रतिपादन करतात. ज्यांच्यामार्फत ईश्वराने धर्म सांगितला ते धर्मप्रवर्तक ईश्वराचे प्रेषीत अथवा दूत मानले जातात. खिस्ती धर्माचे संस्थापक येशू, यहुदी धर्म प्रणेता, माझेस आणि इस्लाम धर्म प्रवर्तक मोहम्मद यांनी प्रत्येकाने ईश्वराचे प्रेषित म्हणजे ईश्वराचा निरोप मानवांना पोचविणारे दूत असल्याचे सांगितले. प्रेषिताची भूमिका ईश्वर मानव संबंधात पोस्टमनपेक्षा वेगळी असल्याचे आढळत नाही. जरी प्रेषित हा मानवच असला तरी ईश्वराचे आदेश तो इतर मानवांना सांगत असल्यामुळे प्रेषिताने व्यक्त केलेले विचार, त्याच्या तोंडून निघालेले शब्द आणि वचने – संशय प्रुफ (संशयातीत) मानली गेली.

अशाप्रकारे प्रेषितांनी सांगितलेल्या ईश्वर प्रणीत वचनांची चिकित्सा करण्याचा मार्गच बंद करण्यात आला. जिज्ञासा तृप्त करण्याला व खरेखोटेपणा पडताळून पाहून ती वचने कसोटीवर लावण्याचे साधनच नाहिसे करण्यात आले.

भगवंतानी धर्म सांगताना, मी तो सांगतो म्हणून स्वीकारा, असे कधीच म्हटले नाही. उलट तुमच्या विचाराला पटेल तरच स्वीकारा असे म्हणून विवेकबुद्धीला आवाहन केले आहे. बौद्धधर्म हा चिकित्सेनंतर सांगितलेला धर्म आहे. रोग निदानानंतर दिलेले औषध आहे. भगवंतानी प्रथम मानव जातीच्या रोगाचे निदान केले. जगात दुःख आणि दारिद्र्य हे महाभंयकर रोग आहेत हे या चिकित्सेनंतर शोधलेले उत्तर होय. यालाच बौद्ध धर्माचे अधिष्ठान (Flooring) म्हणता येईल. आता प्रश्न उपस्थित होतो की, दुःख आणि दारिद्र्य नाहीसे करण्याचा प्रभावी आणि परिणामकारक मार्ग दाखवू शकत नाही, तो धर्मच होऊ शकत नाही. कारण धर्म हा समाज धारणेसाठी आहे.

इतर धर्ममतांत मेल्यानंतर काय होईल याचाच विचार केला आहे. तेवढीच एक चिकित्सा ते करीत बसले, मेल्यानंतर स्वर्ग मिळायचा का नरकात जायचे, ही भीती आयुष्यभर लोकांच्या मानगुटीवर, सिंदबादच्या पाठकुळीवर घट्ट बसलेल्या म्हाताऱ्यासारखी बसवून ऐदी, ऐतखाऊ, धूर्त लोकांचे धर्म हे एक कुरण झाले. मेल्यानंतरच्या स्थितीची काल्पनिक चित्रे रंगवून भय निर्माण करून लोकांना नाडायचे व स्वतःची वंशपरंपरा चैन चालू ठेवण्यासाठी एक व्यवसाय लबाड लोकांना मिळाला. मेल्यानंतर काय व्हावयाचे ते होईल. परंतु जे कष्टमय आहे ते सुखमय करण्याचा प्रश्न या जीवनानंतरच्या काल्पनिक प्रश्नांचा खल करून कसा सुटणार? त्या दृष्टिकोणातून पाहाता एकटे भगवान बुद्धच वास्तववादी होते. त्यांनी दुःखाची कारणे शोधली. ती कारणे तीन प्रकारची आहेत. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक.

आध्यात्मिक म्हणजे वैयक्तिक. व्यक्तिने स्वतःच्या वागणुकीने ओढवून घेतलेले दुःख, आपल्या कर्मामुळे उत्पन्न झालेले दुःख, दारुड्याने दारु पिऊन स्वतःच्या संसाराची धुळधाण आणि शरीराची राखरांगोळी स्वतःच्या हाताने करणे याला आध्यात्मिक दुःख म्हणावे.

आधिभौतिक म्हणजे सामुदायिक दुःख. विषम वागणुकीमुळे आणि अन्यायामुळे ओढणारी संकटे, जसे अस्पृश्यांना होणारी सामाजिक दुःखे, समानसंधी प्राप्त न होणे यांचा समावेश करता येईल.

आधिदैविक म्हणजे नैसर्गिक. रेल्वे, विमान, आगबोट, मोटार अपघातामुळे, वादळ, महापुरादी आपत्तीमुळे निर्माण होणारी दुःखे. वैयक्तिक आचरणामुळे ओढवणारी दुःखे नाहिशी करण्यासाठी पंचशील हे साधन सांगितले आहे. कोणाचा जीव घेऊ नकोस, चीज – वस्तू चोरू नकोस, खोटे बोलू नकोस, व्यभिचार करू नकोस आणि दारू अथवा अन्य मादक पदार्थांचे सेवन करू नकोस. हे पाच नियम पालन केले तर ही दुःखे निर्माणच होणार नाहीत.

Dr Ambedkar And the Buddha
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध (डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण दीक्षाभूमी)

आधिभौतिक दुःख नाहीसे करण्यासाठी श्रेष्ठ अशा अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे. (1) सम्यक दृष्टी, (2) सम्यक संकल्प, (3) सम्यक वाचा – चहाडी न करणे, (4) सम्यक कर्म, (5) सम्यक आजीव – वाईट मार्गाने उपजिविका न करणे, पोट भरण्यासाठी चांगलाच धंदा करणे. (6) सम्यक व्यायाम – सुविचार वाढीला लावून वाईट विचारांना थारा न देणे. वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा नाश करणे, (7) सम्यक स्मृति – शरीरातील सुखदुःखादी वेदनांचे वारंवार अवलोकन करणे, आणि (8) सम्यक समाधी – कोणत्याही दुष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.

यापैकी सम्यक दृष्टीला महत्त्वाचे स्थान आहे. आपण जे काही करतो त्यामुळे स्वतःचाच लाभ होतो की काय हे पाहाण्याऐवजी माझे हीत साधत असताना दुसऱ्याची हानी किंवा कोणाला अपाय होतो की काय हे पाहिले तर जगातील आधिभौतिक दुःखे नाहिशी होतील.

याच बरोबर दहा पारमिता सांगितल्या आहेत. ‘पारमिता म्हणजे आपल्याला करता येईल तेवढे. या पारमितात प्रज्ञा श्रेष्ठ आहे. प्रत्येक पारमितेला प्रज्ञेची कसोटी लागलीच पाहिजे. प्रज्ञा म्हणजे इंग्रजीत ज्याला Wisdom म्हणतात ती, प्रज्ञेचा वापर न केल्यामुळे माणूस कसा मुर्खासारखा वागतो याचे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो.

एका लहानशा गावी पाद्री राहात होता. संकट ओढवले की गुडघे टेकून प्रार्थना करावी हे एकवचन त्याला माहीत होते. एकदा त्या गावातील झोपड्यांना आग लागली. हा पाद्री तेथे गेला आणि सर्वांना एकत्र करून प्रार्थना करायला सुरुवात केली. अर्थातच आगीमुळे एकूणएक झोपडी जळून खाक झाली. थोडा प्रज्ञेचा वापर केला असता तर आग विझविण्यासाठी पाद्री बादली घेऊन स्वतः धावून गेला असता आणि इतरांना प्रार्थनेत न गुंतवता, तर कदाचित आगीपासून बऱ्याच झोपड्या वाचविता.

शील आणि नैष्कर्म्य यांचा परस्पर संबंध आहे. संकटग्रस्तांना वाचविण्यासाठी पराकाष्ठा करणे याला ‘दान’ पारमिता म्हणतात. जनकल्याणाची कामे उत्साहाने आणि तत्परतेने करणे याला ‘विर्य’ म्हणतात. राग आपोआप येतो पण ‘क्षमा’ हा गुण प्रयत्नांनी मिळवावा लागतो. ‘सत्य’ नसेल तर लाचारी आणि हांजीहांजीखोर वृत्ती येते. ‘अधिष्ठान’ म्हणजे दृढनिश्चय. तो जसा मोठ्या कार्याच्या बाबतीत तसाच लहान सहान बाबीतही पाहिजे. सर्वांवर सारखे प्रेम करणे याला ‘मैत्री’ आणि शुभ कार्यात अडथळा निर्माण न करणे याला ‘उपेक्षा’ पारमिता नाव आहे.

पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग आणि या दहा पारमिता दुःख निरोध करून दुःखाचा नाश करण्यास समर्थ आहेत. जगातील दुःख निवारण व्हावे हेच बौद्ध धर्माचे सार. आम्ही भारतीय आपल्या तत्त्वज्ञानाचे भारीच अभिमानी. परंतु गेल्या हजार वर्षांत एकही तत्त्वज्ञ अथवा तत्त्वचिंतक निर्माण झाला नाही. तात्विक विचार करून एखादा सिंद्धात मांडण्यासाठी जी मनोभूमिका विद्वानांची असावयाला हवी ती न राहिल्याने विद्वान विचारविनिमयाला आणि देवाणघेवाणाला पारखे झाले. त्यामुळे विद्वानांची बुद्धि कप्प्याकप्प्यात बंदिस्त होऊन कुंठीत झाली. त्यामुळे सत्यशोधन आणि सत्यग्रहण करण्याचे कार्य मागे पडून पंडिताऐवजी पुस्तकी पढीतांचा वर्ग निर्माण झाला.

ज्ञानाची किल्ली,
सांगेन एकच बोली
ही कल्पना निमाली

भाराभार ग्रंथ नुसते वाचून काय उपयोग? गाढवाच्या पाठीवर ग्रंथ लादण्यापासून गाढवाला जेवढा लाभ तेवढाच फार तर अशा वाचनाने होऊ शकेल. ग्रंथ वाचून रसग्रहण करण्याची शक्ती पाहिजे, नवनवीन कल्पना सुचल्या पाहिजेत, सिद्धांत परिपोष करता आला पाहिजे.

आज कोणताही विषय घ्या किंवा शास्त्र घ्या. साहित्य, तत्त्वज्ञान, अर्थशाख, आरोग्यशाख, विज्ञानशास्त्र, राजनीती, युद्धनीती इत्यादी कोणतीही ज्ञानाची शाखा घ्या. भारतीय म्हणून जे काही आहे ते पूर्णतेला पोचलेले नाही. तसे ज्ञान कधीही पूर्णत्वाला पोचू शकत नसते. आज परिपूर्ण वाटणारे ज्ञानाचे अंग किंवा शाखा भविष्यकाळात अपूर्ण वाटणारच कारण दिवसागणिक त्यात वाढ होत असते. भर पडत असते. माझ्या म्हणण्याचा आशय असा की, या देशातील विद्वानांनी, पंडितांनी नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला उज्जयनी, अवन्ती या जागतिक किर्तीच्या त्या काळातील विद्यापिठांतील आचार्यांनी जो ज्ञानसंचय केला. त्यांत शेकडो वर्षांत यत्किंचितही भर तर पडलीच नाही पण ‘जे जे आपणासी ठावे ते ते दुसर्‍याशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन’ याच्या उलट वागणूक केल्यामुळे मुळात असलेले ज्ञानही लोप पावले. गुरूने शिष्याला विद्या देताना हातचे एक राखून ठेवावे. गुरूला शंभर उपचार माहीत असतील तर नव्याण्णव चीजा चेल्याला देऊन एक गुरुकिल्ली आपल्या हाती ठेवावी. असा पायंडा पडल्यामुळे ज्ञानाचा र्‍हास होऊन त्याचे विकृत स्वरूप तेवढे शिल्लक उरले.

माणसाला निर्वाणपद प्राप्त करता आले पाहिजे. धम्मपदात ‘निब्बाण्णंपरम सुखं’ असे म्हटले आहे. गडगंज संपत्ती जवळ आहे म्हणून सुख लाभत नसते. नुसत्या पांडित्याने माणूस सुखी राहात नाही. तो दुःखी नसतो. पण असुखी असतो कारण अतिलोभ, खून, चोरी, परदारागमन इत्यादी विकार जन्मजात आलेले असताना विकारांवर ताबा ठेवता आला पाहिजे.

भगवंत म्हणतात मानव हा जळता अग्नी आहे. विकार हे या अग्नीमुळे पाण्यासारखे उकळत असतात. अग्नी चेतवता येतो किंवा शांत करता येतो. विकार नाहिसे करता येतील, परंतु समूळ उपटून टाकता येत नाहीत. अग्नीचा उपयोग करून घेण्यासाठी तो जसा मंद ठेवून अन्न शिजवून घ्यावे त्याप्रमाणे मानवाचा उपयोग समाजाला व्हावा यासाठी मधली स्थिती निर्वाण ही होय. त्यामुळे दश विकारांच्या आधीन न जाता मानव तर्कशुद्ध विचारसरणी ठेवून समाज उपयोगी कार्य करू शकतो.

ज्यांनी धर्मतत्त्वाबद्दल चर्चा केली, त्यांनी त्याचे एवढे गुपित राखले की भगवंतांना सांगावे लागले. स्त्रिया, खोटी धर्ममते आणि भटा – भिक्षुकांच्या पोथ्या या तीनच गोष्टी गुप्तता पाळतात. तरी देखील

श्रुतीविभिन्ताः स्मृतिविभिन्ताः
धर्मस्व तत्वं नि हितं गुहायां
महाजनो येन गतस्य पंथः

‘पीछेसे आई आगे चलाई’ अशी अवस्था धर्मत्तत्त्वाची करण्यात आली. श्रुती वेगळे सांगतात, स्मृत्या त्याही काही निराळाच उपदेश करतात. धर्माची तत्त्वे फारच गहन आणि गूढ ! मग काय करायचे तर चार मोठी माणसे ज्या मार्गाने जात असतील तो पंथ स्वीकारा. भगवंताने सांगितले की, मी सांगतो म्हणून नव्हे तर तुमच्या बुद्धिला, विवेकाला पटत असेल तर हा धर्ममार्ग स्वीकारा. एकीकडे आंधळेपणाने चार लोकांच्या मार्गाने आपण चला असा आदेश तर दुसरीकडे बुद्धिला आवाहन. किती मोठे अंतर आहे दोन विचारसरणीत.

कोणताही प्रश्न विचारला की, बड्याबड्या ऋषींनी कानांवर हात ठेवले. याज्ञवल्क्य ऋषीला विचारले, तुम्ही आत्मा मानता तर आत्मा कोठे आहे? उत्तर मिळाले नेति, नेति. बरे. आत्म्याचे मृत्यूनंतर काय? तरी देखील नेति, नेति, म्हणजे मला माहीत नाही. हे माहीत नसेल पण आत्म्याचा आकार तर माहीत असेल म्हणून प्रश्न केला. आत्मा ताडाच्या झाडाएवढा आहे का? तरी नेति, नेति. म्हणजे नन्नाचा पाढा.

आत्म्याचे स्थान कोणते, त्याचा आकार कसा आहे, पुढे त्याचे काय इत्यादीबद्दल काही माहिती नसताना आत्म्याबद्दल इतकी वायफळ बडबड झाली आहे की, नुसत्या सतत प्रचाराने एका केवळ काल्पनिक वस्तुच्या अस्तित्वाचा मोठ्या हिरीरीने पुरस्कार केला जात आहे. प्रेयसीचे नाव माहीत नाही, गाव जाणत नाही, रंग – रूप, वयाची कल्पना नाही पण माझे तिच्यावर प्रेम आहे हो. असे सांगणाऱ्या मूर्ख प्रेमवेड्यासारखी स्थिती आत्म्याचे अस्तित्व मानणाऱ्यांची आहे.

खरे पाहता, आत्मा नाही, हे सिद्ध करीत बसण्याची आवश्यकताच नाही. आत्मा आहे असे प्रतिपादन करणाऱ्यांनी तो असल्याचे सिद्ध करणे ही त्यांची जबाबदारी आहे. आत्मा नाही हे सत्य. आत्मा आहे हा प्रचार भ्रम आहे.

आत्मा सिद्ध करण्यासाठी पुनर्जन्माचे घोडे पुढे दामटण्यात आले. शरीर नाशवान आहे ते सोडून आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो वगैरे भाकडकथा निवेदन केल्या जातात. शरिरातील एकूण एक भाग चिरफाड केल्यावर दिसू शकतो, मग हा आत्माच का नाही शरीरातून काढून दाखवित ? चांगले निष्णात शस्त्रवैद्य आहेत. त्यांना जाऊन विचारा? सांगा म्हणावे आत्मा कोठे आहे तो ? काढून दाखवा शरीरातून?

14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथील धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या बाजूला डॉ. सविता आंबेडकर दिसत आहेत.

बौद्ध तत्त्वज्ञानात पुनर्जन्म मानण्यात येतो असा दाखला लागलीच देण्यात येईल, परंतु त्या सिद्धांताचा आत्म्याशी कोणताच अर्थाअर्थी संबंध नाही. बौद्ध पुनर्जन्म सिद्धांत म्हणजे पुनर्निर्मिती. निसर्गाची पुनरावृत्ती. पित्याच्या आकारासारखा चेहर्‍यामोहऱ्याचा पुत्र होतो म्हणून तो काही संपूर्णपणे पिता नाही. याला बौद्ध तत्त्वज्ञानात पिता पुत्राच्या रूपाने जन्म घेतो असे म्हटले आहे. परंतु पित्यातील सर्व गुणांचा वास पुत्राच्या ठिकाणी राहू शकत नाही. कारण त्याबाबतीत पित्याबरोबर मातेचे गुण त्यात येतात. शिवाय वातावरणाचा परिणाम होतोच. एका आंब्यापासून दुसरा आंबा निर्माण होतो. त्याप्रमाणे चाललेल्या जगरहाटीला पुनर्निर्मिती म्हणतात. परंतु जमीन, पाणी, वारा, खर यांचा जोड परिणाम होऊन मूळ आंब्याला जसे मधूर फळ येईल तसेच दुसऱ्या आंब्याला येऊ शकेल असे नाही. कदाचित चांगला परिणाम झाला तर चांगले फळ येईल, वाईट परिणाम झाला तर वाईट येईल. ‘शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी’. म्हणूनच एका प्रांतात विशेष फळ – फुल झाडांची वाढ होते. इतरत्र ते जगू देखील शकत नाहीत. जसे चहा – कॉफी आसाम, निलगीरीत होते. नारळ समुद्र किनाऱ्यावरच वाढतात. संत्री चांगली मध्यप्रदेशात नागपुरलाच होतात. मसाल्यासाठी जावा बेट प्रसिद्ध आहे. हापूस आंबा रत्नागिरी जिल्ह्यातलाच चवीला आणि रसाला चांगला. एकूण पुनर्निर्मितीच्या कार्यालाच पुनर्जन्म असे म्हटले आहे. परंतु पुनर्जन्म शब्दाचा आधार घेऊन त्याबरोबर आत्मा बौद्ध तत्त्वज्ञानाला मान्य आहे असा गैरसमज पसरविला जात आहे. पण तो गैरसमज आहे.

‘कर्म याचा अर्थ ब्राह्मण व बौद्ध धर्म वेगवेगळा करतात. कर्म ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हा जगाचा व्यवहार कसा काय चालला आहे? ब्राह्मण ग्रंथ म्हणतात नियंता चालवितो, त्याला ब्रह्माही म्हणतात. इतर धर्मही ईश्वर, अल्ला, गॉड या नावांनी त्याच कल्पनेला पुष्टी देतात. बौद्धधर्मात ईश्वर नाही. बौद्धधर्मानुसार जगाचे व्यवहार दरएकाच्या कर्माने चालतात. त्यामुळे बौद्धधर्माने मनुष्यमात्रावर जबाबदारी टाकली आहे. केले तसे भोगावे लागेल अशी ताकीद दिली. याला कर्मविपाक म्हणतात. कर्मविपाक म्हणजे आमच्या क्रियेपासून निर्माण होणारी फळे. कर्म म्हणजे पूर्वसंचित, पूर्वजन्मी साठविलेले पापपुण्याचे गाठोडे असा अर्थ बौद्ध तत्त्वज्ञानात नाही. काही कर्म असे असते की, त्याचा परिणाम ताबडतोब भोगावा लागत नाही. त्या कर्माचा, क्रियेचा परिणाम कालांतराने होतो. परंतु जन्मांतराने नव्हे. कारण [तसा] पुनर्जन्मच नाही.

यामुळे बौद्ध धर्माने माणसाला स्वतःच्या सद्गुणांची वाढ करण्याला वाव ठेवला आहे. मानवाला स्वतःच्या प्रगतिसाठी, उन्नतिसाठी स्वतःच झटावे लागेल असा आदेश दिला आहे. ‘माझ्या कपाळी हे लिहिले आहे. हे विधीलिखीत आहे. ब्रह्माची रेघ आहे’ म्हणून हताश न होता, निराश न होता स्वतःच्या उद्धाराचा राजमार्ग दाखविला आहे. संचित हे एक माणसाला निष्क्रिय करणारे धैर्य खचवणारे थोतांड आहे.

पूर्व जन्माच्या कल्पनेमुळे पापकर्मे करण्याला उत्तेजन मिळालेले आहे. मागच्या जन्मात साठवून ठेवलेले पुण्य आहे मग आता पाप करायला काय हरकत आहे असे एखादा खाऊनपिऊन बरा असा गृहस्थ आपल्या मनाशी विचार करतो. पण असा माणूस हा मानवजातीला अपायकारक असतो. पतित दोन प्रकारचे असतात. एक पतित ज्याला आपण पतित आहोत याची जाणीव असते व त्याची बोचणी लागलेली असते. दुसरा पतित ज्याला आपल्या पापकर्मांबद्दल काहीच वाटत नाही. जसा एखादा मारखाऊ कोडगा असतो तसा.

ज्या पतिताला आपल्या स्थितीची जाणीव असते व बोचणी लागते तो आपल्या पतित अवस्थेतून वर येण्यासाठी धडपड करतो. तो या जाणीवेमुळे स्वतःचा उद्धार करू शकतो. परंतु दुसऱ्या प्रकारचे पतित सुधारूच शकत नाही. कारण त्याची मानसिक ठेवणच तशी असते.

अशाप्रकारे आपल्या अधःपतनाबद्दल खंत वाटणाऱ्यांना मार्ग दाखविण्याचे कार्य करण्यासाठी समाजसेवकांची जरूरी आहे. समाजाला वैचारिक भूमिका देण्यासाठी आणि सांस्कृतिक कार्य करण्यासाठी सेवकांची जरूरी आहे. गरीब समाजाला त्यांना मेहनताना देता येणार नाही. पण त्यांच्या पोटापाण्याची सोय करता येईल. अशा कार्यकर्त्यांना ऐतखाऊ म्हणता येणार नाही. कारण हजार आकर्षणे सोडून समाजसेवा करावी लागते.

बौद्ध भिख्खुंची संघटना ही अशीच समाजसेवेसाठी भगवंतांनी निर्माण केली आहे. हे सतीचे वाण आहे. ते स्वीकारून भगवान बुद्धांनी दाखवून दिलेल्या मार्गाने जाण्याने आज जगाचे कल्याण होईल. मानवतेचे हित होईल.


हे ही वाचलंत का?


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.


‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *