डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी स्थापन केलेल्या संस्था

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजाच्या उद्धाराकरिता अनेक प्रकारच्या संस्थांची वा संघटनांची स्थापना केलेली आहे. बाबासाहेबांच्या संस्थांमुळे वंचित समूहालाच नव्हे तर समस्त समाज बांधवांना फायदा झालेला असल्याचे आपणास दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी स्थापन केलेल्या संस्था आजही कार्यरत आहेत.

 इस लेख को हिंदी में पढ़ें  

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था - Institutions founded by Dr Babasaheb Ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था – Institutions founded by Dr Babasaheb Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एक आघाडीचे विचारवंत आणि थोर समाजसुधारक होते. 1919-20 मध्ये बाबासाहेबांचा सामाजिक-राजकीय क्षेत्रांत प्रवास सुरू झाला होता, आणि महापरिनिर्वानापर्यंत त्यांचे हे कार्य सातत्याने आणि अधिक शक्तीने सुरू राहिले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व धार्मिक अशा क्षेत्रांमध्ये बाबासाहेबांच्या संस्था कार्यरत होत्या आणि आहेतही.

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी स्थापन केलेल्या संस्था आणि संघटना 

आता आपण वरील संस्थांची माहिती, सामाजिक, शैक्षणिक धार्मिक व राजकीय अशा चार श्रेणींमध्ये ठेवून बघणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थांची वर्गीकरणानुसार विस्तृतपणे माहिती खालील प्रमाणे आहे.

 

सामाजिक संस्था

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांच्या आणि अस्पृश्यांच्या उत्थानासाठी अनेक सामाजिक संस्था स्थापन केल्या. या संस्थांच्या माध्यमातून लोकांना व विद्यार्थ्यांना सामाजिक तथा शैक्षणिक लाभ झाला आहे आणि होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी स्थापन केलेल्या संस्था – सामाजिक

 

बहिष्कृत हितकारिणी सभा (1924)

कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 20 जुलै 1924 रोजी मुंबई येथे ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची स्थापना केली.

या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे 4 जानेवारी 1925 रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक, साधनसामग्री पुरवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या वसतिगृहास सोलापूर नगरपालिकेकडून रू. 40000/–चे अनुदान मिळवून दिले. या संस्थेने ‘सरस्वती विलास’ नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू केले.

अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी सामाजिक चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची स्थापना केली. सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबर आणणे, हे ह्या सभेचे ध्येय होते. अस्पृश्यांना समाजाबाहेर ठेवून, त्यांना नागरी, धार्मिक वा राजकीय हक्क देण्यात आले नव्हते.

त्यांच्या अधिकारांप्रती त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता. आपल्या समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधीची मागणी केली.

त्यात त्यांनी भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली होती. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली.

 

समता सैनिक दल (1927)

आज पासून 95 वर्षांपूर्वी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 19 मार्च 1927 रोजी समता सैनिक दलाची स्थापना केली होती, आणि आजही हे संस्था कार्यरत आहे. या दलामध्ये आंबेडकरवादी स्वयंसेवकांचा समावेश होतो. 24 सितंबर 1924 साली बाबासाहेबांनी महाडला एक परिषद भरविली होती. महाडच्या सत्याग्रहापूर्वीची ही परिषद होती. या परिषदेत समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली.

1927चा काळ पाहता चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृतीचे दहन या महत्त्वाच्या घटना आहेत. समाजात अस्पृश्यावर अन्याय, अत्याचार होतच होते. सगळा समाज विषमतेत जळत होता. बाबासाहेबांच्या चळवळीमुळे समाजात जागृती होत होती. शेकडो वर्षे मान खाली घालून चालणारे लोक आता मान वर करू लागले होते. माणसे मुक्तीच्या वाटा चालू लागली होते.

सवर्णांना हे आवडणे शक्य नव्हते, त्यांचा वर्चस्वाचा अहंकार दुखविला जाणे साहजिक होते, हे स्वाभिमानाचे नवे वारे सवर्ण समाजाला झोंबत होते आणि त्याचा परिणाम म्हणून गावा – गावात सवर्णांकडून अस्पृश्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले. अशावेळी गावागावातील लोकांच्या रक्षणासाठी, चळवळीची ताकद वाढविण्यासाठी आणि महाडच्या सत्याग्रहाच्या यशस्वितेसाठी 19 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘समता सैनिक दलाची’ स्थापना केली होती.

मीराताई आंबेडकर यांनी 1977 मध्ये द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची सूत्रे हाती घेतल्यानंतर 1982 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली समता सैनिक दल आले. 1982 पासून समता सैनिक दल ‘बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या नेतृत्वाखाली अर्थात मीराताई आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी येथे आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन यासारखे महत्त्वपूर्ण दिवशी समता सैनिक दलाच्या स्वयंसेवकांचे कडे स्मारकाच्या बाजूला बघायला मिळते.

 

द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट (1944)

द बॉंबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 29 जुलै 1944 रोजी मुंबई येथे स्थापन केलेली एक सामाजिक संस्था होती. समस्त अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन केलेल्या अनेक संस्थांपैकी इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट ही एक संस्था होती.

पण त्यापूर्वी दलितांच्या सर्वागीण विकासासाठी एक मध्यवर्ती सामाजिक केंद्र निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी इमारत फंड उभारण्यास सुरुवात केली. त्यासाठी पुरुषांकडून दोन तर महिलांकडून एक रुपया वर्गणी घेण्याचे आवाहन करण्यात आले. दलित समाजातील लोकांनी बाबासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने या योजनेतून तब्बल 45,095 रुपयांचा निधी जमा झाला.

या निधीतून बाबासाहेबांनी 10 ऑक्टोबर 1944 रोजी दादर-नायगाव विभागात गोकुळदास पास्ता रोडवर 2,332 चौरस यार्डाचा भूखंड 36 हजार 535 रुपये खर्चून विकत घेतला व उरलेल्या निधीतून द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट बनविला. याच निधीतून या प्लॉटवर छोटे तात्पुरते साईट ऑफिस बांधण्यात आले.

पुढे ही इमारतच बाबासाहेबांच्या सर्व चळवळींचे केंद्रस्थान बनली. बाबासाहेबांचा खासगी प्रिंटिंग प्रेस नायगाव येथे होता. जातीय दंगलीत या प्रेसचे नुकसान झाल्यामुळे बाबासाहेबांना ही प्रेस त्यांच्या नायगाव येथील साइट ऑफिसमध्ये हलवावी लागली. मात्र या वास्तूत प्रेस आणताच बाबासाहेबांनी जागेच्या भाड्यापोटी ट्रस्टमध्ये महिना 50 रुपये जमा करण्यास सुरुवात केली.

ट्रस्टने बाबासाहेबांच्या संकल्पनेनुसार दलितांच्या सर्वागीण विकासासाठी समाजकेंद्र उभारण्यासाठी प्रयत्न केले. पण अनेक अडचणींमुळे ते शक्य झाले नव्हते. दरम्यानच्या काळात मुंबई महापालिकने या प्लॉटवर माध्यमिक शाळेचे आरक्षण टाकले.

ट्रस्टने माध्यमिक शाळेचा तीन मजली प्लान महापालिकेला सादर करून त्याला मंजुरी घेतली. आरक्षणामुळे या शाळेच्या प्लानमध्ये तळमजल्यावर पार्किंगची तरतूद केली होती. हे पार्किंग म्हणजे शाळेच्या मागच्या भागाला ज्याला ‘आंबेडकर भवन‘ म्हणून संबोधले गेले. पार्किंग एरियात बाबासाहेबांची नातवंडे – प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर या आंबेडकर बंधूंनी आपली कार्यालये निर्माण केली होती.

 

शैक्षणिक संस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित आणि शिक्षणतज्ज्ञ होते. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे, केवळ वंचित अस्पृश्य समाजासाठीच नव्हे तर सर्व समाज बांधवांसाठी त्यांनी शिक्षणसंस्था उभ्या केलेल्या आहेत. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” असे त्यांनी लिहिलेले आहे.

प्राचीन हिंदू समाजातील जातीच्या नियमांनुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता तर केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ठ जातींची स्थिती जवळपास गुलामासारखीच झाली होती. शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारेल असा विचार करून डॉ. आंबेडकरांनी अनेक शैक्षणिक कामे केली.

हजारो वर्षांपासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. यामुळे त्यांचे उच्च जाती हलक्या प्रतीची कामे स्वतः न करता कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत. बाबासाहेबांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिव करून दिली.

कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनुयायांना “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” असा संदेश दिला. शिक्षण देताना बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला नाही, त्यांनी अस्पृश्यांना आणि ब्राह्मणांना – दोन्हींना शिक्षण दिले.

 

डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी (1928)

अस्पृशांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी 14 जून 1928 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली होती. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीने बहिष्कृत समाजातील उच्च शालेय विद्यार्थ्यांना विशेष लाभ घेण्यासाठी मुंबई सरकारद्वारे पनवेल, ठाणे, नाशिक, पुणे आणि धारवाड येथील पाच वसतिगृहाची जागा मंजूर करून घेतली होती.

 

पीपल्स एज्युकेशन सोसायटी (1945)

पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही भारतातील एक प्रमुख शैक्षणिक संस्था आहे. देशभर आणि मुख्यत्वे मागासलेल्या वर्गात उच्चशिक्षणाचा प्रसार करणे हे या संस्थेचे ध्येय व उद्दिष्ट आहे. अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटीची’ स्थापना केली.

या संस्थेच्यावतीने 1946 मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, 1950 मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, 1953 मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर 1956 मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाज बांधवासाठी सुरू केले. सध्या देशभरात या संस्थेची 30 पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. अधिक माहिती  → पीपल्स एज्युकेशन सोसायटी

 

ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स (1956)

1 जुलै 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स’ ही संस्था सुरू केली. विद्यार्थ्यांना संसदीय लोकशाही (parliamentary democracy) शिकवणे हा या स्कूलचा उद्देश होता. बाबासाहेबांनी सिद्धार्थ महाविद्यालयाचे ग्रंथपाल शांश रेगे यांची या स्कूलच्या प्रमुखपदी नियुक्ती केली. परंतु 6 डिसेंबर 1956 रोजी म्हणजे अवघ्या सहा महिन्यांत बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणामुळे स्कूल बंद पडले आणि स्कूलची मूळ कल्पना चांगली असली तरी ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. त्यामुळे या ट्रेनिंग स्कूलकडून आंबेडकरी चळवळीत कोणतीही भरीव कामगिरी होऊ शकली नाही.

“आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स” ही बाबासाहेबांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने निर्माण झालेली एक वेगळी संस्था होती. ही स्कूल 31 जुलै 1944 रोजी सुरू झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 3 ऑक्टोबर 1945 रोजी पुण्यात याचे औपचारिक उद्घाटन केले.

 

राजकीय संस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील एक आघाडीचे राजकारणी होते. आजही, भारतीय राजकारणामध्ये त्यांचे स्थान निर्विवादपणे सर्वात प्रभावशाली आहे. आज घडीला महात्मा गांधींसोबत बाबासाहेबांचे नाव सुद्धा राजकीय पटलावर सर्वोच्च स्थानी घेतले जाते. आजवरच्या भारतातील सर्वश्रेष्ठ राजकीय नेत्यांमध्ये बाबासाहेबांचे नाव प्रथम क्रमांकावर घेण्यात येते.

बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना लिहिली, त्यांना गणराज्य भारताचे किंवा आधुनिक भारताचे शिल्पकार असेही म्हटले जाते. 1926 पासून ते 1927 पर्यंत ते राजकीय क्षेत्रात कार्यरत होते आणि या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमदार, विरोधी पक्षनेते, खासदार, मंत्री, संविधान सभेचे सदस्य यासारख्या प्रमुख पदांवर काम केलेले आहे. बाबासाहेबांचा राजकीय वारसा प्रभावशाली आहे.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी स्थापन केलेल्या संस्था – राजकीय पक्ष

स्वतंत्र मजूर पक्ष (1936 – 1942)

कामगार मैदान, मुंबई येथे समता स्वतंत्र मजूर पक्षाच्या रॅलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Independent Labour Party अर्थात स्वतंत्र मजूर पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला पहिला राजकीय पक्ष होता. याची स्थापना 15 ऑगस्ट 1936 रोजी करण्यात आली. या पक्षाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. या पक्षाचा जाहीरनामा ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी दैनिकात प्रथम प्रकाशित करण्यात आला होता.

1937 मध्ये मुंबई विधानसभेची निवडणूक घेण्यात आली होती, आणि ही निवडणुक काँग्रेसने प्रतिष्ठेची मानली होती. यावेळी बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने 15 उमेदवार उभे केले होते व 2 उमेदवारांना बाहेरून पाठिंबा दिला होता.

विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः मुंबईमधून उभे होते. पक्षाने उभे केलेल्या 15 उमेदवारांपैकी 13 उमेदवार व पाठिंब्याचे दोन्ही उमेदवार असे एकूण 15 उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाला मिळालेले हे यश घवघवीत होते.

या निवडणुकीत बाबासाहेब सुद्धा निवडून आले आणि ते मुंबई विधानसभेचे आमदार बनले (कालावधी 1937-1942). काँग्रेस नंतर सर्वाधिक जागा बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाला मिळालेल्या असल्याने मुंबई विधानसभेमध्ये बाबासाहेबांचा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष ठरला, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी पक्षनेते बनले. 1937-1942 या कालावधीमध्ये मुंबई विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या बाबासाहेबानी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली.

मुंबई विधानसभेचे सदस्य आणि मुंबई विधानसभेचे विरोधी पक्षनेते अशा दोन्ही भूमिका बाबासाहेबांनी सांभाळल्या. यापूर्वी 1926 ते 1937 या कालावधीमध्ये बाबासाहेब आंबेडकर मुंबई विधिमंडळाचे सदस्य होते. थोडक्यात, 1926 ते 1942 या सुमारे पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमदार होते.

स्वतंत्र मजूर पक्षाने 1936 ते 1939 या दरम्यान महत्त्वाची कामगिरी केली. या पक्षाच्या प्रतिनिधींनी विधिमंडळात अनेक विधेयके मांडली. अनेक विधेयकांवर प्रभावीपणे मते मांडली. सर्वांनी विधीमंडळ कामकाजात भाग घेतला. त्यामुळे तत्कालीन सरकार पक्षाला खरी भिती स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रतिनिधींची वाटत होती.

 

शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन (1942 – 1957)

शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन (अनुसूचित जाती संघ) ही 19 जुलै 1942 रोजी दलित समाजाच्या हक्कांसाठी व त्याच्या प्रचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली एक राजकीय संस्था होती. मद्रासचे दलित नेता राव बहाद्दूर एन. शिवराज हे या राजकीय पक्षाचे पहिले अध्यक्ष आणि मुंबईचे पां.न. राजभोज हे पहिले महासचिव झाले.

खरे तर, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन हे 1936 साली स्थापन झालेल्या ‘स्वतंत्र मजूर पक्षाचे’ एक विकसित रूप होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 पासून ते 1942 पर्यंत स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने अस्पृश्य समाजाचे व मजूर वर्गाचे नेतृत्व केले.

बाबासाहेबांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे सभासद म्हणूनच संविधान समितीतीत राहून संविधान निर्मिती केली आणि भारत सरकारमध्ये कायदामंत्री सुद्धा राहिले. शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचेच रूपांतर पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये झाले.

इ.स. 1952 साली सार्वत्रिक निवडणुकीत शेड्युल्ड कास्टस् फेडरेशनच्या वतीने उभे राहिलेले दोन उमेदवार – पी. एन. राजभोज (सोलापूर मतदारसंघ) व एम. आर. कृष्णन (करीमगर मतदारसंघ, हैद्राबाद प्रांत) लोकसभेवर निवडून गेले.

मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काजरोळकर सारख्या सामान्य काँग्रेस उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला. हैद्राबाद, मद्रास, पेप्सू, मुंबई आणि हिमाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभांमध्ये शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे सर्व मिळून 12 उमेदवार विजयी झाले.

शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन या पक्षाच्या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर दोन वेळा भारताचे मंत्री झाले आणि एकदा खासदार झाले. भारतीय संविधान सभेचे सदस्य असताना ते भारतीय संसदेचे सदस्य  देखील होते.

शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन या पक्षाचे सभासद म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भूषवलेली राजकीय पदे खालील प्रमाणे आहेत :

  • ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, ऊर्जामंत्री व बांधकाम मंत्री (1942-1946)
  • भारतीय संविधान सभेचे सदस्य (1946-1950)
  • स्वतंत्र भारताचे कायदा व न्यायमंत्री (1946-1951)
  • मुंबई राज्यातून राज्यसभेचे सदस्यखासदार (1952-1956)

 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (1957)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा मे 1956 मध्ये केली होती. परंतु हा पक्ष स्थापन करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले, त्यानंतर त्यांच्या अनुयायांनी व कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या संकल्पनेतील हा राजकीय पक्ष स्थापन करण्याची योजना आखली.

पक्ष स्थापन करण्यासाठी 1 ऑक्टोबर 1957 रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एन. शिवराज, यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी 3 ऑक्टोबर 1957 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली.

एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, आणि ते त्यांच्या मृत्यूपर्यंत या पदावर कार्यरत होते. 1957 साली दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे 9 उमेदवार निवडून आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा या पक्षाला केंद्रीय पातळीवर मिळालेले हे सर्वाधिक यश होय.

पुढे, रिपब्लिकन नेत्यांमध्ये वर्चस्वावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक गट निर्माण झाले. त्यामध्ये सध्या केंद्रीय मंत्री असलेल्या रामदास आठवलेंचा गट बऱ्यापैकी टिकून आहे.

 

धार्मिक संस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक धर्मतज्ज्ञ होते, त्यांनी दोन दशकांपेक्षा जास्त कालावधी मध्ये विविध धर्मांचा सखोल अभ्यास केला, धर्मचिकित्सा केली. हिंदू धर्मामध्ये जन्मलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला.

ते एक बौद्ध धर्म प्रचारक होते, म्हणून त्यांनी भारतात बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. त्यांचे भारतीय बौद्ध धर्मासाठीचे योगदान खूप व्यापक होते.

सम्राट अशोकानंतर भारतीय बौद्ध धर्मासाठी सर्वात जास्त योगदान बाबासाहेबांनी दिले आहे, यामुळे त्यांना आधुनिक सम्राट अशोक असे सुद्धा म्हटले जाते.

 

भारतीय बौद्ध महासभा (1955)

बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, ज्याला भारतीय बौद्ध महासभा म्हणून ओळखले जाते, ही भारतातील राष्ट्रीय बौद्ध संघटना आहे. या संघटनेची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 4 मे 1955 रोजी मुंबई येथे केली होती.

भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक असलेले डॉ आंबेडकर या संघटनेचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होते. 8 मे 1955 रोजी नरे पार्क, मुंबई येथे आयोजित एका समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी ही संस्थेची स्थापना करण्याची औपचारिक घोषणा केली.

संघटना स्थापनेच्या पुढील वर्षांमध्ये बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले त्यानंतर त्यांचे पुत्र यशवंतराव आंबेडकर हे आजीव या संघटनेचे अध्यक्ष राहिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर बौद्ध धर्माचा अभ्यास केला. 1950 च्या सुमारास, त्यांनी बौद्ध धर्माकडे आपले अधिक लक्ष केंद्रित केले आणि बौद्धांच्या जागतिक धम्म परिषदेमध्ये उपस्थित राहण्यासाठी श्रीलंकेत गेले.

1954 मध्ये त्यांनी म्यानमार मधील बौद्धांच्या तिसऱ्या जागतिक धम्म परिषदेला उपस्थित गेले. जुलै 1951 मध्ये त्यांनी “भारतीय बौद्ध जनसंघ” स्थापन केला, त्यानेच नामकरण मे 1955 मध्ये “भारतीय बौद्ध महासभा” किंवा “बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया” झाले.

आज रोजी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धार्मिक संस्थेचे सुद्धा अनेक गट बघायला मिळतात ज्यामध्ये मीराताई आंबेडकरांचा गट आणि राजरत्न आंबेडकरांचा गट प्रमुख आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची यांच्या सून मीरा यशवंत आंबेडकर या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत आणि त्यांचा मुलगा (बाबासाहेबांचा पणतू) भीमराव यशवंत आंबेडकर कार्याध्यक्ष आहेत.

दुसऱ्या गटामध्ये राजरत्न अशोक आंबेडकर (बाबासाहेबांचा चुलत पणतू) भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आहेत.


Institutions founded by Dr. Babasaheb Ambedkar – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी स्थापन केलेल्या संस्था खालीलप्रमाणे आहेत :

सामाजिक संस्था :

  • बहिष्कृत हितकारिणी सभा (20 जुलै 1924)
  • समता सैनिक दल (19 मार्च 1927)
  • द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट (29 जुलै 1944)

 

शैक्षणिक संस्था :

  • डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी (14 जून 1928)
  • पिपल्स एज्युकेशन सोसायटी (8 जुलै 1945)

 

धार्मिक संस्था :

  • भारतीय बौद्ध महासभा (4 मे 1955)

 

राजकीय संस्था :

  • स्वतंत्र मजूर पक्ष (15 ऑगस्ट 1936)
  • शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन (19 जुलै 1942)
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (3 ऑक्टोबर 1957)

 

बाबासाहेबांनी काढलेली वृत्तपत्रे सुद्धा त्यांच्या सामाजिक-राजकीय संस्थांमध्ये समाविष्ट होऊ शकतात.

  • मूकनायक (31 जानेवारी 1920)
  • बहिष्कृत भारत (3 एप्रिल 1927)
  • समता (29 जून 1928)
  • जनता (24 नंबर 1930)
  • प्रबुद्ध भारत (4 फेब्रुवारी 1956)

सारांश :

मी मराठी विकिपीडियावर देखील बाबासाहेबांनी स्थापित केलेल्या या संस्थांबद्दल माहिती देणारे विकिपीडिया लेख लिहिलेले आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी स्थापन केलेल्या संस्थांची माहिती सांगणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला? लेख आवडल्यास इतरांनाही शेअर करा. कृपया तुमची प्रतिक्रिया कॉमेट बॉक्समध्ये किंवा ई-मेलद्वारे लिहून जरूर कळवा. धन्यवाद.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नव-नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी उजवीकडील खालील बाजूस असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *