9 नव्हे तर ‘या’ 12 भाषा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अवगत होत्या !

बहुभाषिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाच-सात किंवा नऊ नव्हे तर तब्बल बारा भाषा अवगत होत्या. डॉ. आंबेडकरांना अवगत भाषा आणि या भाषांचा त्यांच्या जीवनाशी असलेला संबंध याविषयीची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

Languages ​​known to Dr. Babasaheb Ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अवगत असलेल्या भाषा – Languages ​​known to Dr. Babasaheb Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एक सर्वात बुद्धिमान व्यक्तिमत्त्व होते. अनेक विषयात त्यांचे प्राविण्य होते. सामाजिक प्रश्न आणि राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि त्यांनी विपुल लेखनही केले. अशा या महामानवाला किती आणि कोणत्या भाषा अवगत होत्या? असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.

बाबासाहेबांना 9 भाषा येत असल्याची माहिती तुम्ही प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियावर पाहिली असेल. पण ही माहिती अपूर्ण आहे. बाबासाहेबांना किमान 12 भाषा अवगत होत्या. जेव्हा आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मराठी आत्मचरित्र (ज.गो. संत यांनी संपादित केलेले) ‘माझी आत्मकथा’ वाचतो तेव्हा आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांना अवगत असलेल्या अनेक भाषांचे संदर्भ मिळतात.

2017 मध्ये, मी (संदेश हिवाळे) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नऊ भाषा अवगत असल्याची माहिती मराठी विकिपीडिया आणि हिंदी विकिपीडिया दोन्हींमध्ये नोंदवली होती. याच सुमारास मी बाबासाहेबांविषयी 100 फॅक्ट्स तयार केले होते आणि ते फेसबुक आणि व्हॉट्सॲप या दोन सोशल मीडियावर शेअर केले होते, आणि त्यातही मी बाबासाहेबांना अवगत असलेल्या नऊ भाषांची नावे दिली होती. ही माहिती जुनी आहे पण हाच ‘9 भाषा’ अवगत असल्याचा आकडा अनेक लोक आजही वापरत आहेत.

बाबासाहेबांना अवगत असलेल्या भाषांची यादी मी वेळोवेळी अपडेट केली. मराठी आणि हिंदी विकिपीडिया यांवर नऊ भाषेवरून दहा भाषा, दहा भाषेवरून 11 भाषा, आणि नंतर 11 वरून 12 भाषा अशी ही यादी वाढत गेली. सध्या आपल्याला कळते की बाबासाहेबांना बारा भाषा येत होत्या. किंबहुना, अधिक संशोधन केल्यानंतर त्यांना आणखी काही भाषा येत होत्या, हे कळाले तर नवल वाटायला नको.

बहुभाषिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, फारसी, गुजराती, फ्रेंच, जर्मन, पाली, बंगाली, कन्नड आणि उर्दू अशा बारा भाषा अवगत होत्या. यांमध्ये 8 भारतीय आणि 4 विदेशी भाषांचा समावेश आहे. डॉ. आंबेडकरांना बंगाली, कन्नड आणि उर्दू या तीन भाषांव्यतिरिक्त इतर नऊ भाषांवर प्रभुत्व होते. बाबासाहेब हे केवळ बहुभाषिकच नव्हते तर ते भाषातज्ज्ञही होते.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना येत असलेल्या भाषा

मराठी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मराठी कुटुंबात झाला. त्यांची मातृभाषा मराठी असल्याने ते या भाषेत प्रवीण होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे झाला असला, तरी ते महाराष्ट्रीयन होते. महाराष्ट्र ही बाबासाहेबांची कर्मभूमी होती. त्यांनी महाराष्ट्रात अनेक सभा घेतल्या आणि आपल्या भाषणांमध्ये मराठी भाषेचा वापर केला.

1894 मध्ये, सुभेदार रामजी सकपाळ, ब्रिटीश सैन्यातील मुख्याध्यापक म्हणून नोकरीतून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या त्यांच्या मूळ गावाजवळील कॅम्प दापोली येथे आपल्या कुटुंबासह स्थायिक झाले. भीमराव लहान असल्याने त्यांना कॅम्प दापोली येथील शाळेत प्रवेश मिळाला नाही आणि भीमरावांना घरीच मुळाक्षरे शिकावी लागली.

1896 मध्ये रामजी आपल्या कुटुंबासह दापोली सोडून साताऱ्यात आले. यावेळी भीमराव पाच वर्षांचे होते. नोव्हेंबर 1896 ते 1900 पर्यंत भीमरावांनी सातारा येथील मराठी माध्यमाच्या कॅम्प स्कूल या शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले.

7 नोव्हेंबर 1900 रोजी, त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत, गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल), सातारा येथे पहिल्या इंग्रजी वर्गात प्रवेश देण्यात आला. नोव्हेंबर 1904 मध्ये भीमराव चौथ्या इंग्रजी वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाले. आणि त्याच वर्षी रामजी सकपाळ आपल्या कुटुंबासह मुंबईला आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्रांची (साप्ताहिक व पाक्षिक) भाषा मराठी होती. मूकनायक, जनता, समता, प्रबुद्ध भारत आणि बहिष्कृत भारत हे सर्व मराठीत बाबासाहेबांनी प्रकाशित केले. बाबासाहेबांनी त्यांच्या पत्नी रमाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनेकदा मराठीत पत्रे लिहिली आहेत. बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र हे होते आणि त्यांचे बहुतांश सहकारी महाराष्ट्रातील मराठी भाषिक होते. म्हणूनच बाबासाहेबांनी मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे.

बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ हे सुरुवातीला ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांची लष्करी शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. रामजींना मराठी बरोबरच इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व होते. शिक्षणाचे महत्त्वही त्यांना चांगलेच ठाऊक होते, याचाच फायदा बाबासाहेब आंबेडकरांना झाला.

First 3 pledges out of 22 pledges in Dr. Babasaheb Ambedkar's handwriting
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हस्ताक्षर, ज्यात त्यांनी मराठीतील २२ प्रतिज्ञांपैकी पहिल्या तीन प्रतिज्ञा लिहिल्या आहेत. त्यांची स्वाक्षरी आणि तारीखही खाली नोंदवली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जवळजवळ सर्व ग्रंथ इंग्रजीत असले तरी त्यांनी ‘बुद्ध पुजा पाठ‘ नावाची छोटी मराठी पुस्तिका देखील लिहिली. बाबासाहेबांचा मराठी भाषेशी अतूट संबंध होते. बाबासाहेबांवरील सर्वाधिक लिखाण मराठी भाषेत झाले आणि त्यांच्या चळवळीला गतिमान करण्याचे सर्वाधिक काम प्रामुख्याने महाराष्ट्रातील मराठी लोकांनी केले.

मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे आणि गोवा राज्यात अतिरिक्त अधिकृत भाषा वापरली जाते. 2011 पर्यंत, मराठी ही 8.30 कोटी भाषिकांसह भारतातील (हिंदी आणि बंगाली नंतर) तिसरी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. 2011 मध्ये, मराठी ही प्रथम आणि द्वितीय भाषा म्हणून बोलणाऱ्यांची एकत्रित संख्या 10 कोटी होती. जगातील सर्वाधिक स्थानिक भाषिक असलेल्या भाषांच्या यादीत मराठी 13 व्या क्रमांकावर आहे. 

 

इंग्रजी – English 

इंग्लिश किंवा इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ही भाषा लहानपणापासूनच येत होती. बाबासाहेबांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते आणि ते अतिशय उच्च दर्जाचे इंग्रजी बोलत.

बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ लष्करी शिक्षक असल्याने त्यांना इंग्रजी भाषा चांगलीच अवगत होती. रामजींनी बाल भिवाला इंग्रजी शिकवले, त्यामुळे त्यांना ही भाषा लहानपणापासूनच अवगत होती. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाचे श्रेय बाबासाहेब त्यांचे वडील रामजी बाबांना देतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. 1896 ते 1900 या काळात भीमरावांनी सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर, 7 नोव्हेंबर 1900 ते नोव्हेंबर 1904 पर्यंत भीमरावांनी सातारा येथील इंग्रजी माध्यमाच्या गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले.

7 नोव्हेंबर 1900 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी गव्हर्नमेंट हायस्कूल, सातारा येथे पहिल्या इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला होता. त्यामुळे 7 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र सरकारने ‘विद्यार्थी दिन‘ म्हणून घोषित केला आहे. त्यांचे उच्च शिक्षणही इंग्रजी माध्यमातून झालेले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की,

“मराठी भाषेप्रमाणेच त्यांना (वडिलांना) इंग्रजी भाषेचा पण अभिमान होता. त्यांना इंग्रजी शिकविण्याचीही भारी हौस होती. ते मला नेहमी सांगत, “हॉवर्डची पुस्तकं तोंडपाठ करून टाक.” त्याचप्रमाणे तर्खडकरांची भाषांतर पाठमालेची तीन पुस्तके पण त्यांनी माझ्याकडून पाठ करवून घेतली. मराठी भाषेतील शब्दांना योग्य इंग्रजी प्रतिशब्द शोधून काढण्यास व त्यांचा योग्य ठिकाणी उपयोग करण्यासही माझ्या वडिलांनीच मला शिकविले.

मी इंग्रजी चांगले बोलतो व लिहितो, थोडीबहुत ख्याती आहे असे मला वाटते. पण योग्य शब्दांचा तोल तोलून उपयोग कसा करावा हे माझ्या वडिलांनी मला जसे शिकविले तसे इतर कोणाही मास्तरांनी मला शिकविले नाही. तर्खडकरांच्या पुस्तकातून उलटसुलट शब्द विचारून ते माझ्या ज्ञानाची नेहमी चाचणी करीत. त्याचप्रमाणे इंग्रजी वाक्यप्रचार व योग्य भाषाशैली कशी वापरावी हे पण त्यांनीच मला शिकविले.”

बाबासाहेबांनी त्यांची जवळपास सर्व पुस्तके इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. बाबासाहेबांनी इंग्रजी भाषेत प्रबंध, भाषण, पत्र लेखन, चर्चा अशा अनेक गोष्टी केल्या. राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजी भाषेचा वापर केला.

इंग्लिश भाषेचा उगम मध्ययुगीन इंग्लंडमध्ये झाला अणि आज ती जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. इंग्रजीचे महत्त्व सांगताना बाबासाहेब म्हणतात की,

“हिंदीच्या बरोबर तुम्हाला सारे जगाशी संबंध ठेवण्यासाठी इंग्रजीचाही अभ्यास करावा लागेल. भारतातून उद्या इंग्रज गेले तरी तुम्हाला त्यांची भाषा सोडून चालणार नाही. आतापर्यंत इंग्रजी भाषेच्या जोरावरच एकराष्ट्रीयत्व प्राप्त करून घेता आले, ही गोष्ट आपल्याला विसरता कामा नये.”

 

गुजराती – ગુજરાતી

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गुजराती भाषा सुद्धा अवगत होती. बाबासाहेब केवळ गुजराती बोलू अगर समजू शकत नव्हते तर त्यांनी गुजराती भाषेत अनेकदा भाषणे देखील दिली. गुजराती भाषा ही मुळची गुजरात राज्यातील आहे आणि मुख्यतः गुजराती लोक ही भाषा बोलतात.

गुजरातमधील बडोदा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानात काही काळ काम केले होते. बाबासाहेबांच्या काळामध्ये बॉम्बे प्रांत (मुंबई राज्य) होते, ज्यामध्ये आजचा महाराष्ट्र आणि गुजरात यांचा समावेश होता. बॉम्बे प्रांतामध्ये मराठी व गुजराती या दोन प्रमुख भाषा होत्या. एकाच प्रांतातील भाषा असल्यामुळे देखील बाबासाहेबांना गुजराती भाषा चांगली येत होती.

2011 पर्यंत, मूळ भाषिकांच्या संख्येनुसार गुजराती ही भारतातील 6वी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे, जी 5.55 कोटी भाषकांकडून बोलली जाते. 2007 पर्यंत स्थानिक भाषिकांच्या संख्येनुसार गुजराती ही जगातील 26वी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.

 

हिंदी – हिन्दी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हिंदीही चांगली होती. हिंदी ही अतिशय महत्त्वाची भाषा आहे कारण संपूर्ण देशातील लोक हिंदी बोलतात. महाराष्ट्रातील लोक मराठीसह हिंदी भाषा बोलतात आणि समजतात. बाबासाहेबांनाही लहानपणापासूनच हिंदी भाषा येत होती. त्यांनी आपली अनेक भाषणे हिंदीत दिली आहेत. साऱ्या भारताचे एकीकरण घडून आणायचे असेल तर त्यासाठी हिंदी भाषा शिकली पाहिजे, असे बाबासाहेबांचे मत होते.

हिंदी ही भारतातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. हिंदी ही इंग्रजीसह भारताची अधिकृत भाषा म्हणून वापरली जाते, आणि ती उत्तर भारताची भाषा आहे. हिंदी ही नऊ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये अधिकृत भाषा आहे आणि इतर तीन राज्यांमध्ये अतिरिक्त अधिकृत भाषा आहे.

2011 च्या जनगणनेनुसार, भारतात मूळ हिंदी भाषिकांची संख्या 53 कोटी (44%) होती. प्रथम, द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून हिंदी बोलणाऱ्यांची संख्या एकत्रितपणे मोजली तर ती 69 कोटी (57%) होती. मंदारिन (चीनी), स्पॅनिश आणि इंग्रजी नंतर हिंदी ही जगातील चौथी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. Ethnologue च्या अहवालानुसार (2022, 25वी आवृत्ती) हिंदी ही जगातील पहिली आणि दुसरी भाषा म्हणून बोलणाऱ्यांसह तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. 

 

उर्दू – اُردُو

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उर्दू भाषा येत होती, हे खरे आहे. हिंदी आणि उर्दू भाषा यांच्यात अनेक साम्य आहे, आणि या दोन्ही भाषांचा एकमेकांवर प्रभावही आहे. बाबासाहेबांना उर्दू अवगत होती, यास आंबेडकरी बौद्ध विद्वान शांतिस्वरूप बौद्ध यांनी दुजोरा दिला आहे.

उर्दू ही मुख्यतः भारत आणि पाकिस्तानमध्ये बोलली जाणारी भाषा आहे. ही पाकिस्तानची राष्ट्रीय भाषा आहे, जिथे ती इंग्रजीबरोबरच अधिकृत भाषा देखील आहे. भारतात, उर्दू भाषेला अनेक राज्यांमध्ये अधिकृत दर्जा देखील आहे. नेपाळ, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये ही अल्पसंख्याक भाषा म्हणून देखील बोलली जाते. 

उर्दू मातृभाषा असणारे जगभरात सुमारे 7 कोटी लोक तर ही द्वितीय भाषा म्हणून बोलणाऱ्यांची संख्या जवळपास 17 कोटी आहे. 

 

फारसी – فارسی

पर्शियन (किंवा फारसी, पारशी) ही एक इराणी भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने इराण, अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये बोलली जाते आणि या देशांची ती अधिकृत भाषा आहे. भारतात पारशी भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या एक लाखाहून अधिक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फारसी चांगली येत होती. 3 जानेवारी 1908 रोजी भीमरावांनी मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. चार वर्षांनंतर, 1912 मध्ये, त्यांनी येथून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रात बी.ए.ची पदवी घेतली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रूजू झाले.

एल्फिन्स्टन महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत विषय घ्यायचा होता. परंतु ते अस्पृश्य जातीचे असल्यामुळे त्यांना संस्कृत शिकवणाऱ्या कर्मठ ब्राह्मण शिक्षकाने नकार दिला. त्यामुळे त्यांना अनिच्छेने पर्शियन विषय निवडावा लागला. त्यांनी फारसीचा चांगला अभ्यास केला होता आणि 100 पैकी 90-95 गुण मिळत असे. अशा रीतीने बाबासाहेबांना पारशी भाषा अवगत झाली आणि त्यात पारंगत झाले.

 

फ्रेंच – français

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1913 ते 1916 या काळात अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतले. यावेळी त्यांनी अभ्यासक्रम म्हणून 59 कोर्सेस निवडले होते, त्यापैकी दोन कोर्स हे भाषांचे होते – एक कोर्स जर्मन भाषेचा तर दुसरा एक फ्रेंच भाषेचा होता. कोलंबिया विद्यापीठात, बुद्धिमान विद्यार्थी असलेले भीमराव आंबेडकर फ्रेंच आणि जर्मन दोन्ही भाषा शिकले.

फ्रेंच ही जगातील 27 देशांमध्ये अधिकृत भाषा आहे आणि ती सर्व खंडांमध्ये बोलली जाते. जगभरात 31 कोटींहून अधिक लोक फ्रेंच भाषा बोलतात. फ्रेंच मातृभाषा असणारे जगभरात सुमारे साडे 7 कोटी लोक आहेत. तर फ्रेंच ही द्वितीय भाषा म्हणून बोलणाऱ्यांची संख्या जवळपास 24 कोटी आहे.

 

जर्मन – Deutsch

जगभरात सुमारे साडे 9 कोटी जर्मन मातृभाषिक आहेत. तर जर्मन ही द्वितीय भाषा म्हणून बोलणाऱ्यांची संख्या जवळपास साडे 8 कोटी आहे. अशा प्रकारे, जगभरात जर्मन भाषिकांची संख्या 18 कोटींहून अधिक आहे. जर्मन ही पाच देशांमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी आणि अधिकृत किंवा सह-अधिकृत भाषा आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जर्मन भाषेवर प्रभुत्व होते. आधी सांगितल्याप्रमाणे, बाबासाहेबांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात जर्मन भाषेचा अभ्यास केला आणि जर्मन भाषा शिकली. लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठात प्रवेश घ्यायचे ठरवले.

यासाठी ते 1922 च्या एप्रिल-मे मध्ये व पुन्हा 1923 मध्ये सुमारे तीन महिने जर्मनीत राहिले. या विद्यापीठातील कामकाजाची भाषा जर्मन होती. त्यांना त्यांचा प्रबंधही जर्मन भाषेत लिहावा लागणार होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जर्मन भाषेची कोणतीही अडचण नव्हती कारण त्यांना जर्मन भाषा अवगत होती.

25 फेब्रुवारी 2021 रोजी जर्मनीतील बॉन विद्यापीठात प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बर्लिनमधील विज्ञान, कला आणि सार्वजनिक शिक्षण विभागाला उद्देशून एक पत्र लिहिले. पत्र अस्खलित जर्मन भाषेत लिहिले होते. या पत्रात त्यांनी जन्मतारीख, धर्म, शिक्षण, अधिनियम याबाबत तपशील सादर केला आहे.

याशिवाय, त्यांनी या पत्रात असेही नमूद केले आहे की बॉन विद्यापीठातील भारत अध्ययन आणि तुलनात्मक भाषाशास्त्र विभागाचे प्राध्यापक हर्मन जेकोबी यांच्या सहकार्यामुळे त्यांना बॉन विद्यापीठात पीएचडी प्रबंध सादर करण्याची परवानगी मिळाली.

25 फेब्रुवारी 1921 रोजी जर्मनीतील बॉन विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तिथल्या प्रशासनास अस्खलित जर्मन भाषेत लिहिलेले पत्र.

जर्मन भाषातज्ज्ञ, जयश्री हरि जोशी या डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या जर्मन पत्राविषयी सांगतात की,

“भाषा आणि रचना दोन्ही दृष्टींनी हे पत्र अभ्यासण्याजोगे आहे. समर्पक, मुद्देसूद आणि नेमक्या शब्दांत केलेली मांडणी हे तर बाबासाहेबांसारख्या खंद्या बॅरिस्टरचं वैशिष्टय आहेच, पण शब्दांच्या निवडीतूनही त्यांचा आत्मविश्वास जाणवतो. मोजके पण चपखल बसणारे शब्द, योग्य क्रियापदे. काही फापटपसारा नाही, अलंकारिक भाषाप्रयोग नाहीत.

तरीही हवी ती माहिती हव्या त्या अनुक्रमाने सादर केली आहे. जर्मन भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केली, तेही ऐच्छिक विषय म्हणून. पण या भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व थक्क करणारे आहे. संपूर्ण पत्रात व्याकरणाची एकही चूक नाही. सहजासहजी न वापरली जाणारी क्रियापदे, शब्दयोगी अव्यये ते अगदी लीलया वापरून गेले आहेत.

1921 साली प्रचलित असलेल्या जर्मन भाषेतले, एव्हाना कालौघात विरून गेलेले काही शब्द वाचताना आनंद वाटतो. उदा. inskribieren म्हणजे नावनोंदणी करणे, gesuch म्हणजे नम्र विनंती, शिवाय मायना lobliche behorde- अर्थात प्रशंसनीय अधिकारी जनहो! आणि पत्राच्या शेवटी zeichne ich- मी स्वाक्षरी करतो, असे जाहीर करून केलेली सही हे वाचताना मोज वाटते.” (बातमी बघा)

 

पाली – पालि 

पाली किंवा पाली-मागधी ही भारतीय उपखंडातील भाषा आहे. याचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला जातो, कारण ती बौद्ध धर्मग्रंथ त्रिपिटकाची भाषा तसेच थेरवाद बौद्ध धर्माची पवित्र भाषा आहे. पाली भाषा ही बौद्ध धर्मातील अत्यंत महत्त्वाचे भाषा मानली जाते.

बुद्धांनी आपली शिकवण पालीमध्ये दिली, कारण ती त्या काळी सर्वसामान्यांची भाषा होती. पाली ही भाषा आहे ज्यामध्ये असंख्य बौद्ध ग्रंथ आणि साहित्य रचले गेले आहे. बाबासाहेबांच्या जीवनातही पाली भाषेला महत्त्वाचे स्थान होते.

बाबासाहेबांचे पाली भाषेवर प्रभुत्व होते. ते पाली भाषेत इतके निपुण होते की त्यांनी पाली व्याकरण आणि पाली शब्दकोश (पाली-इंग्रजी) देखील लिहिले. The Buddha and His Dhamma हे पुस्तक लिहिण्यासाठी बाबासाहेबांनी पाली भाषेतील अनेक ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. बाबासाहेबांनी आपल्या जीवनात पाली बौद्ध सूत्रांचा वापर केला.

 

संस्कृत – संस्कृतम्

संस्कृत ही एक प्राचीन व अभिजात भाषा आहे. संस्कृत ही हिंदू धर्माची पवित्र भाषा आहे, शास्त्रीय हिंदू तत्त्वज्ञानाची भाषा आहे तसेच बौद्ध आणि जैन धर्माच्या ऐतिहासिक ग्रंथांची भाषा आहे. महायान बौद्ध धम्माचे असंख्य ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिण्यात आले आहेत. बुद्ध धर्माच्या संदर्भातील अनेक शब्द किंवा संकल्पना आपल्याला थोड्याफार फरकाने लिहिलेला पाली आणि संस्कृत भाषेमध्ये लिहिलेल्या आढळतात. कारण या दोन्ही भाषा बौद्ध साहित्याचा देखील भाग आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत भाषा अवगत होती. 1908-12 मध्ये, डॉ. आंबेडकर मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिकत असताना संस्कृतचे अध्ययन करता आले नाही. मात्र पुढे ते मुद्दाम चिकाटीने संस्कृत शिकले. 

त्यांना त्यांच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये संस्कृत शिकण्यास मज्जाव केला होता. बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत भाषा शिकण्याची इच्छा होती मात्र ते जातीने अस्पृश्य असल्यामुळे त्यांना संस्कृत भाषा शिकवण्याचे ब्राह्मण शिक्षकाकडून नाकारण्यात आले. संस्कृत ही ब्राह्मणांची आणि उच्चवर्णीयांची भाषा आहे, आणि संस्कृत भाषेवर केवळ ब्राह्मणांचा अधिकार आहे असे रूढीवादी लोक मानत होते.

लंडनमधील शिक्षण आटोपल्यानंतर जर्मनीतील बाबासाहेब यांनी बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. ते 1922 च्या एप्रिल-मे मध्ये व पुन्हा 1923 साली सुमारे तीन महिने जर्मनीत राहिले होते. येथेच त्यांनी जर्मन भाषा शिकली. 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,

“आमचे वडिल मास्तर होते. ईस्ट इंडिया कंपनीचा एक चांगला नियम होता. तो पुढे पाळला गेला नाही हे आमचे दुर्दैव होय. तो नियम म्हणजे कंपनी सरकारच्या सैन्यातील दरोबस्त सैनिकाला सक्तीचे शिक्षण दिले जात असे व सैनिकांच्या मुलामुलींसाठी दिवसाच्या शाळा असून प्रोढ लोकांसाठी रात्रीच्या शाळा असत. प्रत्येक पलटणीसाठी स्वतंत्र शाळा असत. अशा एका शाळेमध्ये माझे वडिल चौदा वर्षे हेडमास्तर होते. सैनिकांसाठी चांगले शिक्षक तयार करण्यासाठी पुण्यास एक “नॉर्मल शाळा” होती. त्या नॉर्मल शाळेत शिकून माझ्या वडिलांनी मास्तरचा डिप्लोमा मिळविला होता. त्यांची शिकविण्याची पद्धत फार वाखाणण्यासारखी होती. त्यामुळे आमच्या वडिलांच्यामध्ये शिक्षणाविषयी आवड व आस्था निर्माण झालेली होती.

“आमच्या घरातील बायका-मुलांना सुद्धा उत्तम लिहिता वाचता येत होते. इतकेच नव्हे, तर पांडव प्रताप, रामायणासारखे ग्रंथ वाचून त्यावर निरुपण करण्याची शक्तीही वडिलांच्या प्रोत्साहाने माझ्या बहिणीत आली होती. ते स्वतः कबीरपंथी असल्याने त्यांना कितीतरी भजने व अभंग तोंडपाठ असत. मी संस्कृत शिकावे अशी त्यांची फार इच्छा होती. पण ही त्यांची इच्छा सफल झाली नाही. त्याला एक कारण झाले, ते असे. माझा थोरला भाऊ सातारा येथे असताना इंग्रजी चौथीत आला. तेव्हा त्यानेही संस्कृतचा अभ्यास करावा व चांगले विद्वान व्हावे अशी त्यांची फार इच्छा होती. पण आमच्या संस्कृत मास्तरांनी “अस्पृश्यांच्या पोरांना मी संस्कृत शिकविणार नाही” असा हट्ट धरल्यामुळे माझ्या भावाला अगदी निरुपाय म्हणून पर्शियन भाषा शिकणे भाग पडले. हे मास्तर वर्गात आमची हेटाळणी करीत. त्यामुळे मनावर एक प्रकारचा वाईट परिणाम होत असे. पुढे मी सुद्धा जेव्हा चौथ्या इयत्तेत आलो, तेव्हा आमच्या संस्कृतच्या मास्तरांचा हट्ट मलाही भोवणार हे नक्की माहीत असल्यामुळे मला पर्शियन भाषेकडेच निरूपायाने धाव घेणे भाग पडले.

“मला संस्कृत भाषेचा अत्यंत अभिनान आहे व ती मला चांगली यावी अशी अजूनही माझी इच्छा आहे. आता स्वतःच्या मेहनतीने मी थोडेसे संस्कृत वाचू व समजू शकतो, नाही असे नाही. पण त्या भाषेत पारंगत व्हावे अशी माझ्या अंतःकरणात तळमळ आहे. तो सुदिन कधी उगवेल तो खरा. मी जरी पर्शियन भाषेचा चांगला अभ्यास केला असला तरी व मला शंभरपैकी नव्वद-पंच्यान्नव मार्क मिळत असले तरी हे कबूल करायला हवे की संस्कृत वाङ्मयापुढे पर्शियन वाङ्मय अगदी फिके आहे. संस्कृत वाङ्मयात काव्य आहे, काव्यनिर्मीती आहे, अलंकारशास्त्र आहे, नाटके आहेत, रामायण महाभारतासारखी महाकाव्ये आहेत, तत्त्वज्ञान आहे, तर्कशास्त्र आहे, गणित आहे. आधुनिक विद्येच्या दृष्टीनेही पाहता संस्कृत वाङ्मयात सर्व काही आहे. पण तशी स्थिती पशिर्यन वाङ्मयात नाही. संस्कृतचा अभिमान व संस्कृत भाषा आपल्याला चांगली अवगत असावी याविषयी माझ्या अंतःकरणात विलक्षण तळमळ असतानाही शिक्षकाच्या कोल्या वृत्तीमुळे व संकुचित दृष्टिकोनामुळे मला संस्कृत भाषेला मुकावे लागले.”

 

थोर विचारवंत दत्तोपंत ठेंगडींच्या ‘सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि बाबासाहेब’ या ग्रंथातील परिशिष्टामध्ये त्यांनी बाबासाहेबांचे संस्कृतचे ज्ञान व तत्कालीन संदर्भ दिलेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संस्कृत विषयीची ओढ दर्शविणारे ‘संस्कृताभिमानी डॉ. आंबेडकर‘ हे पुस्तक उपलब्ध आहे.

मुंबई व दिल्ली येथे वास्तव्य करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत भाषेत जास्त पारंगत होण्यासाठी अनुक्रमे पंडित होसकेरे नागप्पा शास्त्री (Pandit Hoskere Nagappa Shastri) आणि पंडित सोहनलाल शास्त्री (Pandit Sohanlal Shastri) यांच्याकडून संस्कृतचे धडे गिरवले. ते पंडित सोहनलाल शास्त्री यांच्याशी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी संस्कृत भाषेवर चर्चा करत असत आणि संस्कृतमध्ये संवादही साधत असत.

पंडित होसकेरे नागप्पा शास्त्री यांचे नातू बेलिगेरे मंजुनाथ यांनी इंग्रजी Quora वर लिहिले की त्यांनी डॉ. आंबेडकरांना त्यांच्या आजोबांशी शुद्ध संस्कृतमध्ये चर्चा करताना पाहिले आहे. डॉ. आंबेडकरांनी 1930 ते 1942 या काळात मुंबई येथे पंडित होसकेरे नागप्पा शास्त्री यांच्याकडून संस्कृतचे शिक्षण घेतले. पंडित नागप्पा शास्त्री हे 1937 मध्ये डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या गुरुनानक खालसा कॉलेज, मुंबई येथे संस्कृतचे प्राध्यापक होते.

संविधान सभेत पश्चिम बंगालचे खासदार पं. लक्ष्मीकांत मैत्र यांनी डॉ. आंबेडकरांना संस्कृतमधून काही शंका विचारल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित मैत्र यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे संस्कृतमध्येच दिली. हे संभाषण ऐकून घटना समितीच्या बैठकीतील सर्व सदस्य अचंबित झाले होते. ही बातमी त्यावेळच्या काही प्रमुख वृत्तपत्रांमध्येही प्रसिद्ध झाली होती.

 

बंगाली – বাংলা

बंगाली (किंवा बांग्ला) भाषा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना येत होती, जी हिंदी नंतर भारतातील दुसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा होय. बाबासाहेब बंगाली भाषेत पारंगत नव्हते, मात्र ते ही भाषा समजू शकत होते.

बंगाली ही बंगाल प्रदेशातील भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने बांगलादेशात आणि पश्चिम बंगाल व त्रिपुरा या भारतीय राज्यांमध्ये बोलली जाते. भारतात (हिंदी नंतर) दुसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा बंगाली आहे.

बंगाली ही बंगाल प्रदेशातील भाषा आहे. 2024 पर्यंत 250 कोटींहून अधिक मूळ भाषिक आणि 4.10 कोटी द्वितीय भाषा भाषकांसह, बंगाली ही जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात जास्त बोलली जाणारी मूळ भाषा आणि एकूण भाषिकांच्या संख्येनुसार जगातील सातव्या क्रमांकाची भाषा आहे. 

 

कन्नड – ಕನ್ನಡ

कन्नड ही महाराष्ट्राच्या दक्षिणेस असणाऱ्या कर्नाटक राज्याची राजभाषा आहे. बाबासाहेबांना बंगाली प्रमाणेच कन्नड भाषा सुद्धा तोडकीमोडकी समजत होती‌. कन्नड मूळ भाषिकांची संख्या जवळजवळ साडे 4 आहे आणि त्याव्यतिरिक्त कर्नाटकातील सुमारे दीड कोटी [कन्नड मूळ नसलेल्या] भाषिकांची ही दुसरी किंवा तिसरी भाषा आहे. 


या लेखामध्ये आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना येत असलेल्या बारा भाषांबद्दल माहिती जाणून घेतली. या भाषांचा बाबासाहेबांच्या आयुष्यातील संबंध तसेच या भाषा बोलणाऱ्यांची भाषिकांची संख्या सुद्धा आपण बघितली. ‘बहुभाषिक आंबेडकर’ याविषयीचा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. 

तसेच तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये किंवा ई-मेलद्वारे लिहून आवर्जून कळवावे. धन्यवाद.


हे ही वाचलंत का?


‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी ई-मेल करु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *