
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विविध भाषेत अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आलेली आहे. चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांनी बाबासाहेबांना आपापल्या परीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, आणि बाबासाहेबांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांनी त्याच धाडसाने आणि जोमाने पडद्यावर बाबासाहेबांना जीवंत केले. – films about dr ambedkar
More than 15 films about Dr B R Ambedkar डॉ बाबासाहेब आंबेडकर चित्रपट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर निघाले आहेत १५ पेक्षा अधिक चित्रपट, आणि या अभिनेत्यांनी साकारल्या बाबासाहेबांच्या भूमिका — 15+ Films about Dr. Babasaheb Ambedkar
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर ज्यांना लोक आदरपूर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला आणि ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. परंतु मोठ्या पडद्यावर त्यांना बर्याचदा जिवंत केले गेले आहे. या लेखामध्ये अशाच बाबासाहेबांशी संबंधित १५ पेक्षा जास्त चित्रपटांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, लेखक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच त्यांनी महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांसाठी सुद्धा आवाज उठवला. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार‘ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते‘ असेही म्हटले जाते.
आधुनिक भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारताला ‘प्रजासत्ताक भारत’ बनविण्यात योगदान अतुलनीय आहे. स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि न्याय यांचे मानक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक आदर्श होते, ज्यांचे समाज आणि लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश आणि जग त्यांना अभिवादन करते. अशा वेळी चित्रपटांच्या माध्यमातून बाबासाहेबांची व्यक्तिरेखा त्याच धाडसाने आणि जोमाने पडद्यावर बजावणार्या कलाकारांवर नजर टाकुया. बाबासाहेबांवरील चित्रपटांच्या निर्माता-दिग्दर्शकांनी बाबासाहेबांना आपापल्या परीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
films about Dr Ambedkar डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्रपट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आणि विचारधारेवर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आतापर्यंत मुख्यधारेचे एकूण १२ चित्रपट बनवले गेले आहेत. त्यापैकी ७ चित्रपट हे एकट्या मराठीमध्ये आहेत, त्यानंतर कन्नडमध्ये ३, तेलगूमध्ये आणि इंग्रजीमध्ये प्रत्येकी १ चित्रपट बनवला गेला आहे.
जर बाबासाहेबांवर बनवलेल्या चित्रपटांचा विचार केला तर बहुतेक लोकांना एकच नाव स्मरते ते डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” चित्रपटाचे, ज्यामध्ये अभिनेता माम्मूट्टीने मुख्य भूमिका साकारली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट हा मूळ इंग्रजीमध्ये होता, आणि त्याची हिंदी आवृत्ती सुद्धा खूप लोकप्रिय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्रपट मोठ्या प्रमाणावर बघितले जातात.
परंतु ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटाच्या आधी आणि नंतरही बाबासाहेबांवर अनेक चित्रपट बनवले गेले आहेत, जे बहुधा प्रादेशिक भाषांपुरते मर्यादित होते तर काहींचे हिंदी डबिंगदेखील झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर हिंदी चित्रपट – मात्र एक आश्चर्याची गोष्ट ही की आजवर आपल्या बॉलिवूडने बाबासाहेबांवर कोणताही हिंदी चित्रपट बनलेला नाही!
बाबासाहेबांवर बनवलेल्या सर्व चित्रपटांबद्दल मी बर्याचदा गुगलवर search केले, पण मला कधीच योग्य निकाल मिळाला नाही. नेहमी दोन तीन चित्रपटांचीच माहिती दिसायची. आणि जेव्हा मी महात्मा गांधींवर बनलेल्या चित्रपटांविषयी माहिती शोधली तेव्हा मला बर्याच बातम्या आणि पोस्ट सापडल्या ज्यामध्ये त्यांच्यावरील चित्रपटांबद्दल पुरेशी माहिती होती.
बाबासाहेब आंबेडकरांवर बर्याच वेळा माहिती शोधल्यानंतरही सापडलत नाही म्हटल्यावर मी स्वतः त्यांच्यावर बनविलेले सर्व चित्रपट शोधण्याचा आणि ते संकलित करण्याचा संकल्प केला, आणि बरेच संशोधन व मेहनत घेऊन मी ही माहिती गोळा केलीच. ही माहिती संक्षिप्त स्वरुपात मी मराठी आणि हिंदी विकिपीडियामध्ये सुद्धा जोडली आहे.
या लेखामध्ये आपण बाबासाहेबांशी संबंधित तीन प्रकारच्या चित्रपटांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत –
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील मुख्यधारेचे चित्रपट, ज्यात बाबासाहेबांची प्रमुख भूमिका आहे.
- बाबासाहेबांची छोटीशी भूमिका असेलेले असे चित्रपट, जे इतर व्यक्तींवर बनवले गेले आहेत.
- बाबासाहेबांना समर्पित केलेले चित्रपट किंवा त्यांच्या विचारांवर, ग्रंथावर आधारित असलेले असे चित्रपट, ज्यात बाबासाहेबांची भूमिका नाही आहे.
अगदी सुरुवातीलाच इ.स. १९९०, इ.स. १९९१, इ.स. १९९२, व इ.स. १९९३ अशा सलग चार वर्षांत बाबासाहेबांवर चित्रपट बनवण्यात आले होते. चला तर आता आपण जाणून घेऊया बाबासाहेबांशी संबंधित १५ पेक्षा जास्त चित्रपटांबद्दल… – More than 15 movies about Dr B R Ambedkar बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्रपट
हे सुद्धा पहा : येथे पहा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील सर्व चित्रपटांचे व documentries चे videos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील मुख्य चित्रपट – Films based on Dr. Babasaheb Ambedkar
1) भीम गर्जना (Bhim Garjana) :

भीम गर्जना हा इसवी सन १९९० मधील एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय पवार (Vijay Pawar) यांनी केले आहे, तर चित्रपटाच्या निर्मात्या नंदा पवार (Nanda Pawar) या होत्या. या चित्रपटामध्ये बाबासाहेबांची प्रमुख भूमिका अभिनेता कृष्णानंद (Krishnanand) यांनी साकारली होती, तर अभिनेत्री प्रथमा देवी (Prathama Devi) यांनी रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बनवण्यात आलेला पहिला चित्रपट आहे. हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मराठी चित्रपट एक उत्कृष्ट स्वरूपाचा चित्रपट आहे, आणि यात बाबासाहेबांची भूमिका उत्तम प्रकारे साकारलेली आहे.
films about dr ambedkar
2) बालक आंबेडकर (Balak Ambedkar) :

बालक आंबेडकर हा १९९१ मध्ये प्रदर्शित झालेला एक कन्नड चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बसवराज केस्थर यांनी केले आहे. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणीच्या जीवनावर आधारित चित्रपट होता. यात बालक भीमराव आंबेडकरांची भूमिका बाल अभिनेता चिरंजीवी विनय (Chiranjivi Vinay) यांनी साकारली होती.
3) डॉ. आंबेडकर (Dr. Ambedkar) :

डॉ. आंबेडकर हा २५ सप्टेंबर १९९२ रोजी प्रदर्शित झालेला एक तेलुगू चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन परपल्ली भारत (Bharat Parepalli) यांनी केले आहे, तर चित्रपटाच्या निर्मात्या डॉक्टर पद्मावती आहेत. अभिनेता आकाश खुराना (Akash Khurana) यांनी बाबासाहेबांची भूमिका केली होती तर अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या रमाबाई आंबेडकरांच्या भूमिकेत होत्या. रोहिणी हट्टंडी (Rohini Hattangadi) यांनी सुद्धा चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण २८ दिवस चालले होते. यामध्ये एस.पी. बाल सुब्रमण्यम यांनी पार्श्वगायन केले आहे.
films about dr ambedkar
4) युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Yugpurush Dr. Babasaheb Ambedkar) :

युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा इसवी सन १९९३ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे निर्माते माधव लेले होते तर दिग्दर्शन शशिकांत नलावडे (Shashikant Nalawade) यांनी केले आहे. चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता नारायण दुलाके (Narayan Dulake) यांनी साकारली होती. अनंत वर्तक, अशोक घरत, अस्मिता घरत, उपेंद्र दाते, चित्रा कोप्पीकर या कलाकारांनी सुद्धा चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटामध्ये ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे‘, ‘जय भीमा, शुभंकरा तुज कोटी कोटी प्रणाम‘ ही गीते शाहीर साबळे, अनिरुद्ध जोशी, राजेंद्र पै. यांनी गायली आहेत. युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रपट हा बाबासाहेबांवर बनवलेला तिसरा आणि मराठीमध्ये आलेला दुसरा चित्रपट आहे.
5) डॉ. बाबासाहेब आंबेडकर – द अनटोल्ड ट्रुथ (Dr. Babasaheb Ambedkar – The Untold Truth) :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ हा इसवी सन २००० मधील जब्बार पटेल (Jabbar Patel) दिग्दर्शित इंग्लिश चित्रपट आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता मामुट्टी (Mammootty) यांनी साकारली होती, तर प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) यांनी रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली होती, तर मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांनी बाबासाहेबांची दुसरी पत्नी सविता आंबेडकर (Savita Ambedkar) यांची भूमिका केली होती. हा चित्रपट इंग्रजी व्यतरिक्त हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली, उडिया, गुजराती यासारख्या अनेक भाषांमध्ये डब झालेला आहे. Best Feature Film in English, Best Actor (मामुट्टी), Best Art Direction (नितीन देसाई) असे तीन राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाले आहेत. बुद्धं शरणं गच्छामि, कबीर कहे ये जग अंधा, मन लागो मेरा यार, भीमाईच्या वासराचा रामजीच्या लेकराचा यासारखी उत्कृष्ट गीते या चित्रपटात आहेत. चित्रपटासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च झाला. या चित्रपटाची शूटिंग करताना १०० आंबेडकरी विचारवंतांचे सहकार्य सुद्धा घेतले गेले होते. भीम जयंतीदिनी आणि महापरीनिर्वाण दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठी चित्रपट महाराष्ट्रातील सरकारी दूरचित्रवाहिन्यांवर प्रसारित केला जात असतो.
films about dr ambedkar
6) डॉ. बी. आर. आंबेडकर (Dr. B. R. Ambedkar) :

डॉ. बी. आर. आंबेडकर हा ३० डिसेंबर २००५ रोजी प्रदर्शित झालेला आणि दिग्दर्शक कुमारशरण कब्बुर (Sharan Kumar Kabbur) यांनी दिग्दर्शित केलेला कन्नड भाषेतील चित्रपट आहे. चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता विष्णुकांत बी.जे. (Vishnukanth B. J.) यांनी साकारली होती. अभिनेत्री तारा (actress Tara) यांनी बाबासाहेबांची पहिली पत्नी रमाबाई यांची भूमिका केली होती तर दुसरी पत्नी सविता आंबेडकर यांच्या भूमिकेत अभिनेत्री भव्या (Bhavya) होती. या चित्रपटास तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत – कन्नड राज्य चित्रपट पुरस्कार (२००५-०६), सर्वोत्कृष्ट डबिंग कलाकार (पुरुष) – रवींद्रनाथ, आणि परीक्षकांकडून विशेष सन्मान पुरस्कार. नंदिता, अभिमान, शंकर शानभाग, आणि गुरुमूर्ती या गायक-गायिकांनी या चित्रपटामध्ये पार्श्वगायन केले होते, तर अभिमान रॉय यांनी चित्रपटास संगीत दिले होते.
7) पेरियार (Periyar) :

पेरियार हा २००७ चा तमिळ भाषेतील चित्रपट आहे, जो समाज सुधारक आणि तर्कवादी विचारवंत पेरियार ई. व्ही. रामासामी (Periyar E. V. Ramasamy) यांच्या जीवनावर बनलेला आहे. ज्ञान राजशेकरन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता मोहन रामन (Mohan Raman) यांनी साकारली होती, तर पेरियार यांच्या भूमिकेत होते ते प्रसिद्ध अभिनेता सत्यराज (Sathyaraj). हे तेच सत्यराज आहेत ज्यांनी बाहुबली चित्रपटात कटप्पा ही प्रसिद्ध व्यक्तिरेखा साखारली होती. पेरियार यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खूप प्रभाव होता. पेरियार यांनी एकदा त्यांच्या अनुयायांना सांगितले होते की, “जर कदाचित मी जगात मी नाही राहिलो तर तुम्हाला कोणाला ‘पिता’ मानायचे असेल तर ते तुम्ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच माना, व त्यांच्याच शिकवणीनुसार मार्गक्रमण करा.” या दोघांच्या अनेकदा भेटी सुद्धा झालेल्या आहेत. films about dr ambedkar
8) डेबू (Debu) :

“डेबू“ हा सन २०१० मधील निलेश जळमकर दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. संत गाडगे बाबा (Gadge Baba) यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे, आणि त्यांची भूमिका अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी साकारली होती. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही व्यक्तिरेखा दाखवली गेली आहे. गाडगे बाबांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खूप प्रभाव होता, या दोघांच्या अनेकदा भेटी झालेल्या आहेत.
9) रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) (Ramabai Bhimrao Ambedkar (Ramai)) :

रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) हा दिग्दर्शक प्रकाश जाधव यांनी दिग्दर्शित केलेला रमाबाई आंबेडकर यांच्यावर आधारित मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबर २०१० रोजी प्रदर्शित झाला होता. यामध्ये रमाबाईची मुख्य भूमिका अभिनेत्री निशा परुलेकर (Nisha Parulekar) यांनी साकारली आहे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता गणेश जेथे (Ganesh Jethe) यांनी केली होती. शकुंतला जाधव, विजय सरतापे, नंदेश उमप, कोरस या गायक-गायिकांनी या चित्रपटामध्ये पार्श्वगायन केले आहे. हा रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर बनवला गेलेला पहिलाच चित्रपट आहे, याखेरीज अन्य दोन चित्रपट रमाबाईंवर बनवण्यात आलेले आहे. films about dr ambedkar
10) रमाबाई (Ramabai) :

रमाबाई हा सन २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला आणि एम. रंगनाथ (M. Ranganath) यांनी दिग्दर्शित केलेला कन्नड भाषेतील चित्रपट आहे. हा रमाबाई आंबेडकर यांच्यावर आधारित दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सिद्धाराम कर्णिक (Dr. Sidram Karanik) यांनी साकारली होती, रमाबाई आंबेडकरांच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री यागना शेट्टी (Yagna Shetty) होत्या. ऑडिटर श्रीनिवास, नागराज, बॅंक जनार्दन, सुमथी श्री, मायसोर रमानंद या कलाकारांनी सुद्धा चित्रपटात अभिनय केले आहेत. के. कल्याण यांनी चित्रपटास संगीत दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जन्मदिनी – १४ एप्रिल २०१६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.
11) बोले इंडिया जय भीम (Bole India Jai Bhim) :

बोले इंडिया जय भीम : बाबु हरदास एल. एन. यांचा संघर्षमय प्रवास हा सुबोध नागदेवे (Subodh Nagdeve) यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट असून तो ७ ऑक्टोबर २०१६ रोजी प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाचे निर्माते जितेंद्र खुशालदास दोशी व धनंजय गलानी (Dhananjay Galani) आहेत. हा चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी व समाजसुधारक एल.एन. हरदास (L. N. Hardas) यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता श्याम भीमसरिया (Shyam Bhimsaria) यांनी साकारली होती, तर हरदासांची प्रमुख भूमिका अभिनेता अमोल चिव्हने (Amol Chiwhane) यांनी साकारली होती. जय भीम (Jay Bhim) या प्रसिद्ध अभिवादनाची सुरूवात हरदास यांनी केलेली आहे. या चित्रपटास संगीत दिनेश अर्जुना यांनी दिले, तर जावेद अली व बेला शेंडे या गायकांनी चित्रपटात गायन केले.
12) सरणं गच्छामि (Saranam Gacchami) :


“शरणं गच्छामि” हा सन २०१७ मधील प्रेम राज (Prem Raj) दिग्दर्शित, भारतीय संविधानावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित एक तेलुगू चित्रपट आहे. “आंबेडकर सरणं गच्छामि” (Ambedkar Saranam Gacchami) हे चित्रपटाचे एक गाणे असून त्यात डॉ. आंबेडकर यांचीही व्यक्तिरेखा दाखवली गेली आहे. या चित्रपटात मुख्य कलाकार नवीन संजय (Navin Sanjay) व तनिष्का तिवारी (Tanishq Tiwari) हे होते. हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा चित्रपट हिंदीमध्ये आढळून येत नाही, तथापि याचे तमिळमध्ये डबिंग झाले आहे.
13) बाळ भिमराव (Bal Bhimrao) :

बाळ भिमराव हा ९ मार्च २०१८ रोजी प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक हे प्रकाश नारायण जाधव (Prakash Narayan Jadhav) होते. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणीच्या जीवनावर निघालेला दुसरा चित्रपट आहे. यात बालक भीमराव आंबेडकर यांची भूमिका बाल कलाकार मनीष कांबळे (Manish Kamble) याने साकारली होती. मोहन जोशी, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, निशा भगत आणि प्रेमा किरण यांनी सुद्धा चित्रपटात अभिनय केले आहेत. शंकर महादेवन (Shankar Mahadevan) व सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांनी चित्रपटात गीत गायन केले आहेत.
14) रमाई (Ramai) :

रमाई हा इ.स. २०१९ मधील बाळ बरगाले (Bal Bagrale) दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. रमाबाई आंबेडकर यांच्यावर निघालेला हा तिसरा चित्रपट आहे. याचे निर्माते प्रा. प्रगती खरात, मनिषा मोटे, व चंद्रकांत खरात हे होते. या चित्रपटात रमाबाईंची मुख्य भूमिका अभिनेत्री वीणा जामकर (Vina Jamkar) यांनी साकारली आहे, तर अभिनेता सागर तळाशीकर (Sagar Talashikar) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेत होते. अरुण नलावडे, स्वनिल राजशेखर, प्रफुल्ल सामंत, प्रकाश धोतरे या कलाकारांचाही चित्रपटात समावेश होता. आनंद शिंदे, नंदेश उमप, साधना सरगम, रवींद्र साठे, व विजय सरतापे यांनी चित्रपट गीते गायली आहेत, तर भिमराव धुळबुळू व गोपाळ कबनुरक हे गीतकार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८व्या जन्मदिनीच्या पार्श्वभूमीवर, १२ एप्रिल २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्रपट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित अन्य चित्रपट – Films related to Dr. Babasaheb Ambedkar
15) जोशी की कांबळे (Joshi ki Kamble) :

जोशी की कांबळे हा सन २००८ मधील शेखर सरतांडेल (Shekhar Sartandel) दिग्दर्शित एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटातील नायक हा एक आंबेडकरी तरुण संजय कांबळे [अमेय वाघ / Amey Wagh] आहे, जो एका बौद्ध अनु. जातीच्या कुटुंबात [कांबळे परिवार] वाढलेला असतो, मात्र त्याचे biological आई-वडील हे हिंदू ब्राह्मण [जोशी परिवार] असतात. हा चित्रपट आरक्षण आणि जातीव्यवस्था या विषयांवर देखील भाष्य करणारा आहे. या चित्रपटात ‘भीमरावांचा जयजयकार‘ हे भीमगीत आहे. तसेच रामदास आठवले यांची चित्रपटात विशेष भुमिका आहे.
16) शूद्र : द राइझिंग (Shudra : The Rising) :

शूद्र : द राइझिंग हा सन २०१२ मधील प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन संजीव जयस्वाल (Sanjiv Jaiswal) यांनी केले आहे. हा चित्रपट शूद्रांच्या जीवनाचे वर्णन करीत असला तरी तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित केलेला आहे. या चित्रपटात ‘जय जय भीम‘ (Jai Jai Bhim) हे लोकप्रिय भीमगीत सुद्धा आहे.
17) अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध (A Journey of Samyak Buddha) :

अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध हा सन २०१३ मधील प्रवीण दामले यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट आहे. गौतम बुद्ध (Lord Buddha) यांच्या आयुष्यावरील हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे, आणि त्यांची भूमिका अभिनेते अभिषेख उराडे (Abhishekh Urade) यांनी साकारली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म (The Buddha and His Dhamma) या ग्रंथावर आधारित हा चित्रपट आहे. हा सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित केलेला चित्रपट आहे.
18) जय भीम (Jai Bhim)

जय भीम हा टी.जे. ज्ञानवेल दिग्दर्शित 2021चा तमिळ-भाषेतील चित्रपट आहे आणि ज्योतिका आणि तो सूर्या यांनी 2D एंटरटेनमेंट अंतर्गत निर्मित केला आहे. चित्रपटात सूर्या (suriya), लिजोमोल जोस, के. मणिकंदन, राजिशा विजयन, प्रकाश राज, राव रमेश आणि इतर सहाय्यक भूमिकेत आहेत. 1993 मधील एका सत्य घटनेवर आधारित, ज्यामध्ये न्यायमूर्ती के. चंद्रू यांनी लढलेल्या खटल्याचा समावेश आहे, ते इरुलर जमातीतील जोडपे सेंगेनी आणि राजकन्नू यांच्या जीवनाभोवती फिरते. या चित्रपटाचे नाव “जय भीम” हे सर्वपरिचित आहे, जे सामाजिक व आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाचे घोषवाक्य वा नारा आहे. चित्रपटाचा नायक चंद्रू हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांपासून प्रेरित झालेला दाखवण्यात आलेला आहे.
19) द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव (The Battle of Bhima Koregaon) :

द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव हा रमेश थेटे (Ramesh Thete) निर्मित-दिग्दर्शित आगामी हिंदी चित्रपट आहे. रमेश थेटे फिल्म्सच्या बॅनरखालील या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित केलेला चित्रपट आहे. हा चित्रपट १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या ऐतिहासिक व प्रसिद्ध अशा कोरेगावच्या लढाईवर (Battle of Koregaon) आधारित आहे. या चित्रपटात शिदनाक इनामदार या महार योद्ध्याच्या मुख्य भूमिकेत अभिनेते अर्जुन रामपाल (Arjun Rampal) असणार आहेत. तसेच दिगंगना सूर्यवंशी (Digangana Suryavanshi), सनी लिओनी, अभिमन्यू सिंग हे कलाकार सुद्धा चित्रपटात असणार आहेत.
हे सुद्धा पहा :
- येथे पहा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील सर्व चित्रपटांचे व documentries चे videos
- आंबेडकर जयंती : डॉ. बाबासाहब आंबेडकर पर बनी हैं 15 से भी अधिक फिल्में (हिंदी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील लघुपट (Dr Ambedkar short films)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३०व्या जयंती (२०२१ मध्ये) साजरी होत असताना बाबासाहेबांवरील एका दुर्मिळ लघुपटाची माहिती मिळाली, त्याचे नाव होते महापुरुष डॉ. आंबेडकर (The Great Dr. Ambedkar). हा इ.स. १९६८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर निर्मित मराठी लघुपट आहे. या लघुपटाची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी संचालनालयातर्फे १९६८च्या जुलै महिन्यात करण्यात आली होती. ‘व्हटकर प्रॉडक्शन्स’ या बॅनरखाली निर्मित करण्यात आलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शन नामदेव व्हटकर यांनी केले होते. सुमारे १८ मिनिटांच्या या लघुपटाला संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीत दिले होते. अभिनेते डेव्हिड अब्राहम यांनी लघुपटाचे निवेदन केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रपट मराठी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक लघुपटांची निर्मिती झालेली आहे. यावरही मी स्वतंत्रपणे एक लेख घेऊन येणार आहे.
Films based on Dr Ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील टीव्ही मालिका (Dr Ambedkar TV series’)
पुढील लेखामध्ये आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बनवण्यात आलेल्या तसेच बाबासाहेबांची भूमिका असलेल्या सर्व टीव्ही मालिकांची माहिती जाणून घेणार आहोत. या मालिकांमध्ये बाबासाहेबांच्या भूमिका साकारणाऱ्या सर्व कलाकारांवरही आपण प्रकाश टाकूया. धन्यवाद.
Films based on Dr Ambedkar
संदर्भ व नोंदी
- डेबू आणि सरणं गच्छामि या चित्रपटांमध्ये बाबासाहेबांची भूमिका कोणत्या अभिनेत्यांनी साकारली होती, याची माहिती मला मिळालेली नाही. त्यामुळे मी या लेखामध्ये त्या दोन अभिनेत्यांची नावे नमूद करू शकलो नाही. जर तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल तर जरुर जरूर कळवावी, ही विनंती.
- या यादीमध्ये एखाद्या चित्रपटाची माहिती लिहिली गेली नसेल तर कृपया मला संदर्भासह सूचित करा, तसेच या लेखात चुकून काही त्रुटी झाली असेल तर मला जरूर कळवावे.
- बाबासाहेबांवर निर्मित चित्रपट आणि त्यामधील त्यांच्या भूमिका साकारलेले कलाकार, यांच्या नोंदी मी मराठी आणि हिंदी विकिपीडियांमध्ये सुद्धा केलेल्या आहेत. links खालीप्रमाणे आहेत :
हे ही वाचलंत का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 प्रेरणादायक व अनमोल सुविचार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 75 प्रेरणादायी सुविचार
- भगतसिंग विषयी डॉ. आंबेडकरांचे विचार | Dr. Ambedkar on Bhagat Singh
- हिंदी विकिपीडिया पर भारत के टॉप 20 सबसे लोकप्रिय लोग (2016-2020)
- मराठी विकिपीडियावरील 20 सर्वात लोकप्रिय व्यक्ती (2016-2020)
- भारतातील बौद्ध सेलेब्रिटी – Buddhist Celebrities in India
- अन्य लेख वाचा
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)
उत्कृष्ट संकलन केलं आहे दादा.
धन्यवाद प्रतिक