डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक क्षेत्रातील प्रचंड मोठं नाव आहे. त्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी जोरदार संघर्ष केला. आजच्या या लेखामध्ये आपण महान समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार जाणून घेणार आहेत.

Social thoughts of Dr. Babasaheb Ambedkar - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार

सामाजिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. ते भारतातले एक सर्वात मोठे समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक सामाजिक कार्ये केली आणि सामाजिक कुप्रथा नष्ट करण्याचे कार्य केलेले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य अतुलनीय आहे.

सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या वर्गांसाठी बाबासाहेब आंबेडकर हे एखाद्या देवापेक्षा कमी नव्हे! अस्पृश्यता, हिंदूधर्म, जातीव्यवस्था, समाजपरिवर्तनाचे मार्ग यासंबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महत्त्वपूर्ण आहेत. चला तर जाणून घेऊया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक विचार ….

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक विचार

राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक परिवर्तन आधी? हा महाराष्ट्रातील राजकीय विचारवंतांमधील मोठा वाद होता. महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुधारणांची जी पिढी लोकहितवादी, महात्मा फुले, आगरकर यांच्या स्वरूपात उभी राहिली तिच्या कार्याचे आणि विचारांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जोरदार समर्थन केले.

एवढेच नव्हे तर त्यांच्या कार्यांवर ज्या मर्यादा पडल्या होत्या, त्या दूर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुद्धा बाबासाहेबांनी केला. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक विचार महत्त्वपूर्ण ठरतात.

 

अस्पृश्यतेसंबंधी विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकदंर कार्यात सामाजिक सुधारणांना विशेषतः दलितोद्धाराच्या चळवळीला विशेष महत्त्व आहे. ते स्वतः एका अस्पृश्य कुटुंबात जन्मल्याने त्यांना अस्पृश्यतेचे अनेक वाईट अनुभव आले होते. म्हणूनच त्यांनी अस्पृश्यता नष्ट करणे आणि अस्पृश्यांचा सर्वांगीण विकास करणे हे आपल्या जीवनाचे पहिले ध्येय ठेवले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ईश्वरनिर्मित अस्पृश्यतेच्या कल्पनेवर विश्वास नव्हता. त्यांचे असे मत होते की अस्पृश्यता ही मानवनिर्मित असून भारताच्या इतिहासात त्याचे मूळ दडले आहे.‌ वेदांमध्ये चार वर्ण सांगितले आहेत ते म्हणजे ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य आणि शूद्र.

अस्पृश्यांनी बौद्ध धर्माचा आश्रय घेतल्याने ब्राह्मणांच्या मनात त्यांच्याविषयी संताप निर्णय झाला व ब्राह्मणांनी त्यांना अस्पृश्य ठरवले. अस्पृश्य हे ‘अवर्ण’ होते, म्हणजेच वरील चार वर्णांमध्ये त्यांचा समावेश नव्हता. म्हणून अस्पृश्य हे पाचव्या वर्णात असल्याचे मानले जाते.

शतकानुशतके अस्पृश्यांना मानवी हक्क नाकारले गेले. पूर्वी अस्पृश्यांना उपनयनाचा व यज्ञयागाचा अधिकार होता. ते राज्यात मोठ्या पदांवरही होते; परंतु सवर्णांनी विशेषतः ब्राह्मणांनी त्यांची अवनती घडवून आणली.

म्हणूनच अस्पृश्यता ही ब्राह्मणांनी निर्माण केली असून तिला ईश्वराची मान्यता व वेदांचा आधार नाही. ‘पुरुष सूक्त’ मागावून घुसडले गेले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नमूद केले आहे.

 

हिंदू धर्मविषयक विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, मानवी जीवनात धर्म एक आवश्यक गोष्ट आहे. व्यक्ती व समाजाला धर्माची नितांत गरज आहे. धर्म हे माणसाच्या विकासाचे व उन्नतीचे एक महत्त्वाचे साधन आहे.

धर्मातून मनुष्याला शांतता व समाधान मिळते. यामुळे गरीब माणसाच्या जीवनात धर्माला महत्त्वाचे स्थान आहे. बाबासाहेबांच्या मते, धर्म हा बुद्धिनिष्ठा व नैतिकता यांच्याशी विसंगत नसावा. स्वातंत्र्य, समता, बंधुता व ज्ञान हीच जीवनाची मूलतत्त्वे आणि धर्म यांमध्ये सुसंगती असावी.

या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचे चिकित्सक परीक्षण केले. हिंदू धर्मातून स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा अविष्कार होत नाही असे बाबासाहेबांना जाणवले. ‘जातिव्यवस्था’ हा हिंदू धर्माचा अत्यंत महत्त्वाचा दोष आहे. अस्पृश्यता तर हिंदू धर्मावरील कलंक आहे.

मानवी मनात उच्च-नीचतेची कल्पना रुजवण्यात हिंदू धर्म जबाबदार आहे. जातीव्यवस्थेमुळे हिंदू धर्मात परिवर्तन घडवून येणे अशक्य आहे. त्यामुळे पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे.

 

जातीसंस्थेसंबंधी विचार

Castes in India (भारतातील जातीव्यवस्था) आणि Annihilation of Castes (जातीव्यवस्थेचा विध्वंस) ही जाती व्यवस्थेसंबंधी दोन प्रमुख पुस्तके बाबासाहेबांनी लिहिली आहेत. जातीव्यवस्था ही हिंदू धर्मशास्त्राने निर्माण केलेली होती आणि या जातीव्यवस्थेबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मते निश्चित स्वरूपात होती.

जातिव्यवस्थेबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खालीलप्रमाणे आहेत :

१. जातीव्यवस्था ही श्रम विभाजनाच्या तत्त्वानुसार निर्माण झाली नाही.

२. जातीव्यवस्था ही माणसाच्या अंगी असणाऱ्या गुणांवर आधारलेली नाही. गुण हे नैसर्गिक असतात. जातीव्यवस्था पूर्णपणे अनैसर्गिक आहे.

३. जातीव्यवस्थेने समाजात उच्च-नीचता निर्माण केली. भेदाभेद निर्माण केला.

४. जातीव्यवस्था ही पूर्वकर्माशी व पुनर्जन्माशी जोडली गेली. त्यामुळे ती अशास्त्रीय आहे.

५. जातीव्यवस्थेचे स्वरूप अकरणात्मक आहे. यात आंतरजातीय विवाह मान्य नाहीत. त्यामुळे हिंदूंचा वंश संकुचित झालेला दिसतो.

६. जातीव्यवस्थेमुळे हिंदू समाजाचे विघटन झाले आहे आणि नैतिक अवनती सुद्धा झालेली आहे.

७. जाती-जातीमधील तणाव वाढल्याने सामाजिक संबंध बिघडले.

८. जातीव्यवस्थेमुळे माणूस संकुचित झाला.

 

समाज परिवर्तनाचे मार्ग

जातीव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या दुःखिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर हिंदू धर्मात परिवर्तन झाले पाहिजे असे बाबासाहेबांचे मत होते. बाबासाहेबांनी धार्मिक परिवर्तनाची दिशा पुढीलप्रमाणे स्पष्ट केली आहे.

१. इस्लाम, ख्रिश्चनांप्रमाणे हिंदू धर्मात एक ग्रंथ, एक देव असावा. वेद, शास्त्रे, पुराणे नष्ट करावीत.

२. हिंदू धर्माच्या अनेक ग्रंथांच्या आधारे जे लोक आचरणाचा उपदेश करतात त्यांना शिक्षा व्हावी.

३. पुरोहित वर्ग नसावा. जर त्या वर्गाची आवश्यकता असेल तर तो जन्मधिनिष्ठ नसावा. अशा व्यक्तींनी सरकारकडून पुरोहितपणाचा परवाना घ्यावा.

४. पुरोहित हा अन्य सरकारी सेवकांप्रमाणे सरकारी नोकर असावा. त्यावर कायद्याचे बंधन असावे. राज्याच्या कायद्याने धर्माधिकाऱ्यांची संख्या मर्यादित करावी.

 

हिंदू धर्मात सुधारणा घडवून येणे अशक्य असल्याची जाणीव झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला व त्याचा पुरस्कार केला. बौद्ध धर्माने तेजस्वी व संपन्न अशा संस्कृतीचा पाया घातला असे त्यांचे मत होते.

नीतिमत्तेची शिकवण देणारा बुद्धिनिष्ठ, स्वातंत्र्य-समता-बंधुता व न्यायाचा पुरस्कार करणारा, गरिबांविषयी अनुकंपा असणारा धर्म म्हणजे खरा धर्म होय. आणि या कसोटीला बौद्ध धर्म पूर्णपणे उतरतो असे त्यांचे मत होते.

प्रारब्ध, नशीब, नियती इत्यादी धार्मिक कारणांमुळे हिंदू माणसांची महत्त्वकांक्षा मारली गेली असा बाबासाहेबांचा विचार होता. त्यामुळे त्यांनी संतांवर देखील टीका केली आहे. संतांनी जातीव्यवस्था मोडून काढली नाही असे त्यांचे मत होते.

 

अस्पृश्यांना आपल्या हक्कांसाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही असे बाबासाहेबांनी सांगितले. त्यांच्या मते, साधनांपेक्षा साध्य महत्त्वाचे आहे. अस्पृश्यता निर्मूलनाच्या बाबतीमध्ये महात्मा गांधी यांचा उच्चवर्णीयांच्या हृदय परिवर्तनावर विश्वास होता. मात्र बाबासाहेबांना असे हृदय परिवर्तन होणे अशक्य वाटत होते.

आजही देशाच्या कानाकोपऱ्यात अस्पृश्यता पाळली जाते. एखादी व्यक्ती ही केवळ ‘दलित’ वा पूर्वाश्रमीची ‘अस्पृश्य’ असल्यामुळे तिला अमानुष वागणूक दिली जाते. तिच्यावर अत्याचार अन्याय होतो.

आणि जेव्हा आपण अशा दलितांवरील अन्यायाच्या घटना वारंवार घडताना पाहतो, ऐकतो; तेव्हा हृदय परिवर्तनाबाबत गांधींचा दृष्टिकोन चुकीचा तर बाबासाहेबांचा दृष्टिकोन खरा होता, असे आपल्याला आज जाणवते. तथापि बाबासाहेबांनी सामाजिक समतेसाठी केलेला संघर्ष हा बहुतांशी सफल झालेला आहे.

 

सारांश

मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार (social views of Babasaheb Ambedkar) जाणून घेतले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर यास तुमच्या मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा.

तुमचे काही प्रश्न असतील तर, किंवा लेखात कुठे व्याकरणाची चूक झाली असेल तर कृपया आम्हाला आवर्जून ईमेल द्वारे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवावे, धन्यवाद.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

5 thoughts on “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार

  1. अप्रतिम लेख… अशेच सामाजिक आशयाचे लिखाण चालू ठेवा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *