सम्राट अशोक, शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप यांसारख्या शासकांचे पुतळे आपल्याला भारतभर बघायला मिळतात. पण सम्राट अशोकांचे पुतळे भारताबरोबरच जगभरातील इतर देशांमध्येही बसवण्यात आले आहेत. आज आपण अशाच काही सम्राट अशोकांच्या पुतळ्यांबद्दल जाणून घेणार आहोत. – king Ashoka statue
चक्रवर्ती सम्राट अशोक (ख्रिस्त पूर्व 304 ते ख्रिस्त पूर्व 232) हे भारताचा सर्वात महान शासक आणि कल्याणकारी राजा म्हणून जगभर ओळखले जातात. अशोक हे मौर्य साम्राज्याचे तिसरे सम्राट होते आणि त्यांनी ख्रिस्त पूर्व 268 ते ख्रिस्त पूर्व 232 या काळात शासन केले. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि या धम्माचा जगभर प्रचार केला.
सम्राट अशोकांनी प्रजेला आपल्या अपत्यांप्रमाणे मानून त्यांची काळजी केली, आणि अनेक लोक उपयोगी गोष्टी आपल्या साम्राज्यामध्ये केल्या. त्यांचे मौर्य साम्राज्य हे भारतीय उपखंडातील सर्वात मोठे साम्राज्य होते. भारतीय इतिहासात तसेच भारतीयांच्या मनांमध्ये देखील त्यांना मानाचे स्थान आहे. एका लोकप्रियता सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांनंतर, सम्राट अशोक हे जगातील तिसरे सर्वात लोकप्रिय व उल्लेखनीय भारतीय व्यक्तिमत्व आहे.
चार सिंह असलेला अशोक स्तंभ हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. नवीन संसद भवनाच्या समोर एक विशाल अशोक स्तंभाच्या कांस्य पुतळा स्थापन केला गेला आहे. हा स्तंभ 6.5 मीटर उंच आणि 9500 किलो वजनाचा आहे. याला आधार देण्यासाठी सुमारे 6500 किलो वजनाची स्टीलची यंत्रणाही तयार करण्यात आली आहे. अशोक चक्र भारताच्या राष्ट्रध्वजात आहे.
नुकताच नागपूरच्या दीक्षाभूमी येथे सम्राट अशोकांचा एक दहा फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या लेखाच्या माध्यमातून धम्म भारत वेबसाईटवर आपण पहिल्यांदाच सम्राट अशोकांच्या विविध ठिकाणच्या पुतळ्यांविषयी जाणून घेणार आहोत. सम्राट अशोकांचे पुतळ्यांविषयी माहिती सांगणारे लिखाण यापूर्वी कोणी केले नाही अथवा तशी माहिती देखील इंटरनेटवर उपलब्ध नाही.
भारतातील सम्राट अशोक यांचे पुतळे
1. सम्राट अशोक बुद्ध विहार, वाराणसी, उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सम्राट अशोक बुद्ध विहार आहे. या विहारामध्ये सम्राट अशोक यांचा सुंदर पुतळा उभारण्यात आला आहे. यासोबतच येथे भगवान बुद्धांचाही भव्य पुतळा आहे. हे बुद्ध विहार सारनाथ रेल्वे स्थानकापासून अवघ्या 470 मीटर अंतरावर आहे.
2. दीक्षाभूमी, नागपूर, महाराष्ट्र
अलीकडेच, 24 ऑक्टोबर 2023 रोजी 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर मधील दीक्षाभूमी येथे सम्राट अशोकाचा पुतळा बसवण्यात आला. हा पुतळा 10 फूट उंच आणि पिवळसर रंगाचा आहे. तामिळनाडूतील बुद्धीस्ट फॅटरनिटी मुव्हमेंट या संस्थेने हा पुतळा तयार केला आणि दीक्षाभूमीला भेट म्हणून दिला.
सम्राट अशोकांच्या पुतळ्याला घेऊन केरळ राज्यातील मुंडकायम येथून एक धम्म यात्रा निघाली होती. ही यात्रा तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणामार्गे महाराष्ट्र-दीक्षाभूमीवर आली. लाखो बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत दीक्षाभूमी स्तूपाच्या आत सम्राट अशोकांचा पुतळा स्थापन करण्यात आला. दीक्षाभूमी हे आंबेडकरी बौद्ध अनुयायांसाठी सर्वात महत्त्वाचे स्थळ आहे.
3. सम्राट अशोक कन्व्हेन्शन सेंटर, पटना, बिहार
बिहारमधील पटना येथील सम्राट अशोक कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सम्राट अशोक यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. सम्राट अशोक कन्व्हेन्शन सेंटर हे ₹490 कोटी अंदाजे बजेट असलेले एक अधिवेशन केंद्र आहे.
8 फेब्रुवारी 2014 रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्राची पायाभरणी केली होती. सम्राट अशोकांच्या जयंतीदिनी बिहार राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, इतर राजकीय नेते आणि जनता या पुतळ्याला अभिवादन करतात.
4. सम्राट अशोक बुद्ध विहार, पोरबंदर, गुजरात
गुजरात राज्यामध्ये देखील सम्राट अशोकांचा पुतळा आढळतो. गुजरात मधील पोरबंदर येथे “सम्राट अशोक बुद्ध विहार” असून या विहाराच्या परिसरात सम्राट अशोकांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे.
5. शहीदी पार्क, दिल्ली
दिल्लीमधील शहीदी पार्कमध्ये सम्राट अशोकांचा सुंदर पुतळा आहे. शहीदी पार्क हे भारतातील पहिले मैदानी संग्रहालय असून 4.5 एकर जागेवर ते उभारले गेले आहे. या ठिकाणी असलेल्या कलावस्तू तुम्हाला प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारतीय इतिहासाची झलक दाखवतात. 9 ऑगस्ट 2023 रोजी शहीदी पार्कचे उद्घाटन करण्यात आले.
हे पार्क भारताच्या राष्ट्रीय नायकांना तसेच विविध कालखंडात देशाच्या स्वातंत्र्य व सार्वभौमत्वासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना समर्पित आहे. या सर्वांचे पुतळे येथे बघायला मिळतात.
या उद्यानात सम्राट अशोकांची सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. बौद्ध धर्माचे प्रतीक असलेले धम्मचक्र देखील सम्राट अशोकाच्या डोक्याच्या मागे ठेवलेले आहे. यासोबतच या उद्यानात देशातील समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा दर्शविणारी विविध आकर्षणे देखील आहेत.
6. सन्नती, कलबुर्गी जिल्हा, कर्नाटक
सम्राट अशोकाचा पुतळा कर्नाटकातील सन्नती येथे बसवण्यात आला. सम्राट अशोकास बौद्ध भिक्खू म्हणून चित्रित केले आहे.
old Ashoka statue – मौर्य सम्राट अशोकांची एकमेव उपलब्ध प्रतिमा (शिल्प) कर्नाटकात आहे. सन्नती (ता. चितापूर, जि. गुलबर्गा) येथे ही प्रतिमा असून सम्राट अशोकांनी अखेरचा श्वास तेथे घेतल्याचे मानले जाते. सन्नती हे दक्षिण भारतातील प्रमुख बुद्धस्थळ आहे, मात्र या बौद्धस्थळाकडे केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे.
सम्राट अशोकांनी तीन वेळा दक्षिणेचा प्रवास केला होता. आयुष्याच्या अखेरच्या दिवसांत सम्राट अशोक सन्नतीमध्ये आले असावेत, आणि येथेच त्यांचे निधन झाले असावे. कारण, ते उत्तरेत परतल्याचे पुरावे आढळलेले नाहीत.
सन्नती हे भीमा नदीच्या काठी वसलेले गाव आहे. तेथील चंद्रलांबा मंदिर आवारातील काली मंदिराचे छत 1986 मध्ये कोसळल्यानंतर त्याच्या पायात प्राकृत भाषा व ब्राह्मी लिपीतील सम्राट अशोकांच्या काळातील मौल्यवान शिलालेख आढळले होते. भारतीय पुरातत्त्व खात्याने सन्नती व जवळच्या कनगनहळ्ळी गावात उत्खनन सुरू केल्यानंतर तिथे महास्तुप आढळला. सिंहासनावर बसलेल्या सम्राट अशोकांचे दगडी शिल्प हा या उत्खनानील महत्त्वाचा शोध ठरला. त्याशिवाय साठ कोरीव घुमट व छतासह अनेक अवशेष सापडले.
सध्या सन्नतीचा ताबा भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे. सप्टेंबर 2009 मध्ये कर्नाटक गृहनिर्माण मंडळाने 3.52 कोटी रुपये निधीतून या ठिकाणी संग्रहालय, डॉर्मिटरी, कर्मचाऱ्यांसाठी निवास आणि संरक्षक भिंत बांधली आहे. मात्र, या ठिकाणी सापडलेल्या अवशेषांच्या संवर्धनासाठी उपाययोजना करणे खूप खूप गरजेचे आहे, पण तसे प्रयत्न होताना दिसत नाही. अनेक अवशेष विखुरलेल्या अवस्थेत आहेत. काही मोजकेच अवशेष संग्रहालयात हलविले आहेत. इमारतीचाही वापर नाही.
सन्नतीला सम्राट अशोकांचे समाधी स्थळ म्हणून घोषित करावे, दरवर्षी बुद्ध महोत्सव साजरा करावा. त्याला पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा, आदी मागण्यांसाठी भंते तिस्सावरो केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. तिस्सावरो हे बिहारमधील बोधगया येथील आहेत.
- अधिक माहिती : मराठी विश्वकोश – सन्नती-कनगनहल्ली
- दै. सकाळ बातमी : सम्राट अशोकांच्या सन्नतीकडे दुर्लक्ष – भंते तिस्सावरो
7. बुद्ध विहार, लोणावळा, महाराष्ट्र
लोणावळ्यातील एका बुद्ध विहारासमोर मौर्य सम्राट अशोकाचा पुतळा बसवण्यात आला आहे. लोणावळा हे महाराष्ट्रातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथे स्थापित केलेल्या पुतळ्यामध्ये सम्राट अशोक यांना बौद्ध भिक्खू म्हणून दाखवण्यात आले आहे. अनेक लोक सम्राट अशोक यांना बौद्ध धर्मप्रचारक राजा म्हणून ओळखतात, परंतु ते बौद्ध भिक्खू देखील होते.
8. पटियाला चौक, जिंद, हरियाणा
हरियाणातील जिंद शहरातील पटियाला चौकात सम्राट अशोकाचा पुतळा उभा आहे. हा पुतळा संगमरवराचा आहे. भाजप आमदार डॉ. कृष्णा मिधा यांनी 7 जानेवारी 2022 रोजी सम्राट अशोकाच्या पुतळ्याचे अनावरण केले.
जिंद शहरातील पटियाला चौक हा शहरातील प्रमुख चौकांपैकी एक आहे. पंजाब आणि चंदीगडकडे जाणारी वाहने येथून जातात. याशिवाय हिस्सारला जाण्यासाठी येथे ओव्हरब्रिजचा वापर केला जातो. रेल्वे स्थानकावर जाण्यासाठीही पटियाला चौकाचा वापर केला जातो. अशा स्थितीत पतियाळा चौक हा शहराचा मुख्य प्रवेश बिंदू असल्याने सम्राट अशोकाच्या पुतळ्याची भव्यता राखणे ही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
9. भिलाई, छत्तीसगड
छत्तीसगडमधील भिलाई शहरातील वॉर्ड-36 डबरापारा चौकात सम्राट अशोकाचा पुतळा बसवण्यात आला आहे. 9 वर्षांपूर्वी या पुतळ्याचे अनावरण झाले होते.
10. लुंबिनी बुद्ध विहार, धुळे, महाराष्ट्र
महाराष्ट्रातील धुळे शहरामध्ये देखील सम्राट अशोक यांचा एक पुतळा आहे. हा अर्धाकृती पुतळा असून तो लुंबिनी बुद्ध विहारामध्ये आहे. सम्राट अशोकांच्या शेजारी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे, तर या दोन्हीच्या मागे बुद्धांचा मोठा पुतळा आहे.
सम्राट अशोकांचा हा पुतळा अडीच फुट उंच, सुमारे ५० किलोग्रम वजनाचा, पंचधातूचा पुतळा आहे. 29 मार्च 2023 रोजी सम्राट अशोकांच्या 2327 व्या जयंतीचे औचित्याने लुम्बिनी बुद्ध विहारात स्थापित करण्यात आला.
11. सम्राट अशोक उद्यान, जोधपुर, राजस्थान
राजस्थानच्या जोधपूर शहरात एक सुंदर सम्राट अशोक उद्यान आहे. या गार्डनमध्ये महान सम्राट अशोक यांचा पुतळा बसवला आहे. हातामध्ये तलवार घेऊन सम्राट अशोक यांना सिंहासनावर बसलेले दाखवले गेले आहे.
12. फतेहपुर, उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा 8 फूट उंच पुतळा आहे. सम्राट अशोकाचा हा पुतळा मौर्य उत्थान समितीच्या कार्यालयाजवळील चौकात बसवण्यात आला आहे.
11 सप्टेंबर 2022 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सम्राट अशोकाच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी जिल्ह्याच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती उपस्थित होत्या.
सम्राट अशोकाच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकत उपमुख्यमंत्री म्हणाले की, सम्राट अशोकानंतर आजपर्यंत देशात असा कोणीही राज्यकर्ता नाही ज्याने अखंड भारताच्या सीमा अबाधित ठेवल्या.
12. नालासोपारा, मुंबई महानगर
नालासोपारा येथील समुद्रकिनाऱ्यावर एक मोठा बौद्ध स्तूप आहे, जिथे सम्राट अशोकाची अर्धाकृती मूर्ती स्थापित आहे. नालासोपारा हे मुंबई महानगर प्रदेशातील एक शहर आहे. हे शहर भारतातील महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आहे.
भारताबाहेरील सम्राट अशोकांचे पुतळे
13. रंगकूट बुद्ध विहार, बांगलादेश
बांगलादेशातील रंगकूट बुद्ध विहारामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे. रंगकूट बनाश्रम बौद्ध मठ हा बांगलादेशातील कॉक्स बाजार जिल्ह्यातील रामू नावाच्या गावात असलेला एक प्रसिद्ध बौद्ध मठ आहे.
या विहाराभोवती केंद्रित असलेल्या प्रदेशात एकेकाळी बौद्ध शिक्षण आणि संस्कृतीची भरभराट झाली होती. अनेकजण या विहारास रामकोट बौद्ध विहार म्हणूनही ओळखतात. रामू गावामध्ये इतर 30 बौद्ध विहार आहेत, परंतु रंगकूट विहाराचे बौद्धांसाठी विशेष महत्त्व आहे.
king Ashoka statue सम्राट अशोकाने आपल्या आयुष्याच्या शेवटच्या 45 वर्षांत बुद्धांच्या अस्थी जोडून 84 हजार चैत्य वा स्तूप वेगवेगळ्या ठिकाणी उभारले. त्यापैकी रामकूट बौद्ध विहार हा एक मानला जातो. अशोकानंतर वेगवेगळ्या शासकांनी या बौद्ध विहाराचे अनेकदा पुनर्निर्माण केले. अगदी अलीकडे, 1966 च्या सुमारास या बौद्ध मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
9 सप्टेंबर 2013 रोजी या रंगकूट बौद्ध विहारामध्ये मौर्य सम्राट अशोक यांचा पुतळा बसवण्यात आला. सम्राट अशोकाच्या हातात त्रिपिटक ग्रंथ देऊन त्यांना बौद्ध धर्माचा संरक्षक आणि प्रचारक म्हणूनही दाखवले आहे. भगवान बुद्ध, फाहियान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुद्धा पूर्णाकृती पुतळे रंगकूट विहारात उभारण्यात आले आहेत.
- या सम्राट अशोकांच्या पुतळ्याचे उच्च दर्जाचे फोटो पहा
- रंगकूट बुद्ध विहाराविषयी बंगाली विकिपीडियावर वाचा
14. अशोकराम बुद्ध विहार, समुत प्राकान, थायलंड
थायलंडच्या समुत प्राकान प्रांतात अशोकराम बौद्ध मंदिर (Wat Asokaram) आहे आणि या बौद्ध विहारामध्ये सम्राट अशोकांचा पुतळा बसवण्यात आला आहे. 8 मे 1962 रोजी अशोकराम बुद्ध विहार बांधले गेले होते. ध्यान साधना करण्यासाठी हे महत्त्वाचे मंदिर आहे.
मंदिर परिसरात सम्राट अशोक यांचा भव्य पुतळा स्थापन करण्यात आला असून सम्राट अशोकांच्या हातात त्रिपिटक ग्रंथ आहे. थायलंड हा एक बौद्ध बहुसंख्य देश असून तेथील सुमारे 95 टक्के लोकसंख्या ही बौद्ध धर्माची अनुयायी आहे.
या लेखामध्ये आपण भारतातील आणि भारताबाहेरील सम्राट अशोक यांचे पुतळे जाणून घेतले. सम्राट अशोकांच्या पुतळ्यांबद्दल पहिल्यांदाच आपल्या धम्म भारत वेबसाईटवर माहिती देण्यात आली. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.
या यादीमध्ये समाविष्ट केलेल्या पुतळ्यांव्यतिरिक्त सुद्धा सम्राट अशोक यांचे बरेच पुतळे असावेत. जर तुम्हाला अशाच सम्राट अशोकांच्या पुतळ्यांबद्दल माहिती असेल तर कृपया आम्हाला ई-मेलद्वारे आवर्जून कळवावे. आणि ही यादी परिपूर्ण करण्यास मदत करावी.
तसेच तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये किंवा ई-मेलद्वारे लिहून आवर्जून कळवावे. धन्यवाद.
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला खालील सोशल मिडिया माध्यमांवर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा.
WhatsApp channel
Telegram channel
Facebook page
E-mail – [email protected]
हे ही वाचलंत का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास
- जगभरातील सम्राट अशोक यांचे पुतळे
- भारतातील 10 सर्वात उंच पुतळे
- ‘या’ देशांमध्ये आहेत डॉ. आंबेडकरांचे पुतळे
- डॉ. आंबेडकरांचे तीन सर्वात उंच पुतळे
- दिल्लीतील 10 डॉ. आंबेडकर पुतळे
- हैदराबादमधील डॉ. आंबेडकरांचा 125 फूट उंच पुतळा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.