जगातील 10 बौद्ध महिला राष्ट्रपती आणि पंतप्रधान

जगभरात अनेक महिला राज्यकर्त्या झाल्या, ज्या इतिहासात अजरामर झाल्या. आधुनिक जगात, अनेक महिलांनी आपल्या देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधानपद भूषवून देशाचा कारभार सांभाळला. त्यांच्यामध्ये अनेक बौद्ध महिला सुद्धा आहेत.

 इस लेख को हिंदी में पढ़ें 

 Read this article in English 

या लेखात अशा काही बौद्ध महिलांचा समावेश आहे ज्यांनी त्यांच्या देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान किंवा उपपंतप्रधान म्हणून काम केले आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगातील पहिली महिला पंतप्रधान ही एक बौद्ध होती!

या बौद्ध महिलांनी देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती पद ग्रहण केले आणि त्या देशावर राज्य केले, तो देश चालवला. जागतिक राजकारणात, विशेषतः बौद्ध देशांमधील राजकारणात बौद्ध महिलांचे प्रतिनिधित्व कमी आहे. जगात सुमारे 18 बौद्ध देश आणि प्रजासत्ताक आहेत आणि या बौद्ध देशांमध्ये बौद्ध महिला राष्ट्रपती आणि पंतप्रधान बनल्या आहेत.

या दहा बौद्ध महिला आहेत ज्यांनी राष्ट्रांवर राज्य केले – तुम्ही किती जणांबद्दल ऐकले आहे?

1. सिरिमावो भंडारनायके (श्रीलंकेच्या पंतप्रधान)

Sirimavo Bandaranaike – imago-images

सिरिमावो भंडारनायके (1916 – 2000) ह्या श्रीलंकन राजकारणी आणि श्रीलंकेच्या 6व्या पंतप्रधान होत्या. 21 जुलै 1960 दिवशी सिरीमाओ भंडारनायके श्रीलंकेच्या तसंच जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. सिरिमाओ यांच्यानंतर जगात दुसऱ्या महिला पंतप्रधान झाल्या त्या इंदिरा गांधी.

सिरीमाओ भंडारनायके श्रीलंकेच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक काळ राहिलेल्या पंतप्रधान आहेत. 1960-65, 1970-77 आणि 1994-2000 दरम्यान त्या श्रीलंकेच्या पंतप्रधान होत्या. त्यांनी श्रीलंका फ्रीडम पार्टी  या राजकीय पक्षाचे नेतृत्वदेखील दीर्घकाळ केले.

सिरिमावो भंडारनायके यांचे पती श्रीलंकेचे चौथे पंतप्रधान सॉलोमन वेस्ट रिजवे भंडारनायके हे होते. श्रीलंकेच्या पाचव्या राष्ट्रपती व माजी पंतप्रधान चंद्रिका कुमारतुंगा आणि माजी कॅबिनेट मंत्री अनुरा भंडारनायके ही त्यांची मुले होती. अधिक माहिती वाचा 

श्रीलंका हे एक बौद्ध राष्ट्र असल्यामुळे कायदेशीरदृष्ट्या येथील राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे बौद्ध धर्माचे अनुयायी असतात. श्रीलंकेतील सुमारे 70 टक्के लोकसंख्या बुद्धिस्ट आहे.

 

2. चंद्रिका कुमारतुंगा (श्रीलंकेच्या राष्ट्रपती व पंतप्रधान)

Chandrika Kumaratunga  – psautographs.ecrater

चंद्रिका कुमारतुंगा (जन्म 29 जून 1945) एक श्रीलंकेच्या राजकारणी असून त्यांनी 12 नोव्हेंबर 1994 ते 19 नोव्हेंबर 2005 या कालावधीत श्रीलंकेच्या पाचव्या राष्ट्रपती म्हणून काम केले आहे.

त्याआधी 19 ऑगस्ट 1994 ते 12 नोव्हेंबर 1994 या अल्पकाळासाठी त्या पंतप्रधान देखील होत्या. 2005 च्या शेवटपर्यंत श्रीलंका फ्रीडम पार्टी (SLFP) या राजकीय पक्षाच्या अध्यक्षा होत्या.

चंद्रिका ह्या श्रीलंकेच्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला राष्ट्रपती आहेत. सॉलोमन वेस्ट रिजवे डीयास भंडारनायके व सिरिमावो भंडारनायके या श्रीलंकेच्या दोन माजी पंतप्रधानांच्या त्या कन्या आहेत.

 

3. न्याम-ओसोरीन तुया (मंगोलियाच्या पंतप्रधान)

Nyam-Osoryn Tuyaa

न्याम-ओसोरीन तुया (जन्म 1958) ह्या एक माजी मंगोलियन राजकारणी आहेत. 22 जुलै 1999 ते 30 जुलै 1999 या अल्प कालावधीत त्या मंगोलियाच्या कार्यवाहक पंतप्रधान होत्या. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आशिया आणि पॅसिफिकसाठी आर्थिक आणि सामाजिक आयोग (ESCA) च्या 55 व्या सत्राच्या अध्यक्षा म्हणूनही काम केले आहे. मंगोलिया हा सुद्धा एक बौद्ध देश असून तेथील 90% पेक्षा जास्त लोकसंख्या बौद्ध धर्माला मानणारी आहे.

 

4. ऍनेट लू (तैवानच्या उपराष्ट्रपती)

Annette Lu Hsiu-lien

ऍनेट लू हसिउ-लियन (जन्म 1944) ह्या एक तैवानच्या राजकारणी आणि देशाच्या माजी उपराष्ट्रपती आहेत. तांगवाई चळवळीत सक्रिय स्त्रीवादी असलेल्या ऍनेट लऊ 1990 मध्ये डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये सामील झाल्या आणि 1992 मध्ये विधानसभेच्या युआनमध्ये निवडून आल्या.

त्यानंतर, त्यांनी 1997 ते 2000 दरम्यान ताओयुआन काउंटी मॅजिस्ट्रेट म्हणून काम केले आणि 20 मे 2000 ते 20 मे 2008 पर्यंत चीन प्रजासत्ताकच्या अर्थात तैवानच्या उपराष्ट्रपती होत्या. तैवान या देशाची सुमारे 93 टक्के लोकसंख्या ही बौद्ध धर्माला मानणारी आहे.

 

5. ये चु-लान (तैवानच्या उप-पंतप्रधान)

Yeh Chu-lan

ये चु-लान (जन्म 1949) ह्या एक तैवानी राजकारणी आहेत. त्यांनी काओसियुंगचे कार्यकारी महापौर आणि तैवान देशाच्या उपपंतप्रधान म्हणून काम केले आहे. 20 मे 2004 ते 21 फेब्रुवारी 2005 या कालावधीमध्ये त्या रिपब्लिक ऑफ चायनाच्या उपपंतप्रधान (वाईस प्रीमियर) होत्या.

 

6. यिंगलक शिनावत्रा (थायलंडच्या पंतप्रधान)

Yingluck Shinawatra

यिंगलक शिनावत्रा (जन्मः 1967) ह्या थाई राजकारणी आहेत आणि 5 ऑगस्ट 2011 ते 7 मे 2014 या काळात त्यांनी थायलंडच्या पंतप्रधान म्हणून काम केले. थायलंड या देशाची सुमारे 95 टक्के लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे.

जून 2011 मधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये फिउ थाई पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर त्या थायलंडच्या 28 व्या पंतप्रधान बनल्या. 30 जून 2013 ते 7 मे 2014 या कालावधीमध्ये त्या थायलंडच्या संरक्षण मंत्री देखील होत्या.

यिंगलक या थायलंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या तसेच 60 वर्षांहून अधिक काळातील त्या सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान देखील ठरल्या. 7 मे 2014 रोजी घटनात्मक न्यायालयाच्या निर्णयाने तिला पदावरून हटवण्यात आले.

 

7. पार्क ग्युन-हाय (द. कोरियाच्या राष्ट्रपती)

Park Geun-hye

पार्क ग्युन-हाय (जन्म 2 फेब्रुवारी 1952) ह्या दक्षिण कोरियाची बौद्ध धर्मीय राजकारणी आहेत. त्यांनी 25 फेब्रुवारी 2013 ते 10 मार्च 2017 पर्यंत दक्षिण कोरियाच्या 11 व्या राष्ट्रपती म्हणून काम केले आहे.

त्यांची राष्ट्रपती पदाची कारकीर्द वादग्रस्त राहिली. त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून दोषी ठरवण्यात आले आणि महाभियोग चालवून राष्ट्रपती पदावरून हटवण्यात आले.

दक्षिण कोरिया हा पारंपरिकदृष्ट्या एक बौद्ध देश आहे. तथापि, सध्या या देशामध्ये बौद्ध धर्म आणि ख्रिश्चन धर्म हे दोन्ही धर्म प्रभावशाली आहेत.

 

8. आँग सान सू क्यी (म्यानमारच्या पंतप्रधान)

Aung San Suu Kyi

आँग सान सू क्यी (जन्म 19 जून 1945) एक बर्मी राजकारणी, लेखिका आणि 1991 च्या नोबेल शांतता पारितोषिक विजेत्या आहेत. 6 एप्रिल 2016 ते 1 फेब्रुवारी 2021 या काळात त्यांनी म्यानमारच्या पंतप्रधान (स्टेट काउंसलर) आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम केले आहे.

त्यांनी 2011 पासून नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (NLD) च्या अध्यक्षा म्हणून काम केले आहे, तसेच 1988 ते 2011 या काळात त्या पक्षाच्या सरचिटणीस होत्या.

आँग सान सू क्यी ह्या बर्मामधील लोकशाहीवादी चळवळीच्या कार्यरत नेत्या असून त्यांनी आपल्या देशात लोकशाहीव्यवस्था आणण्यासाठी लष्करी राजवटीविरुद्ध सुमारे 25 वर्षे संघर्ष केला. म्यानमारच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी 9 जून 2012 रोजी पहिल्यांदा संसदेत पाऊल ठेवले.

लष्करी राजवटीविरुद्ध केलेल्या आंदोलनामुळे स्यू की यांना अनेक वर्षे तुरुंगात काढावी लागली. त्यांना 1992 साली भारत सरकारने त्यांनी म्यानमारमधील लष्करी जुलूमशाही राजवटीविरुद्ध चालवलेल्या अहिंसा चळवळीसाठी जवाहरलाल नेहरु शांतता पुरस्कार देऊन गौरवले.

म्यानमार हा एक बौद्ध देश असून तेथील सुमारे 90 टक्के जनता ही बुद्धिस्ट आहे.

 

9. मेन सॅम एन (कंबोडियाच्या उप-पंतप्रधान)

Men Sam An (globewomen.com)

मेन सॅम एन (जन्म 1953) ह्या एक कंबोडियन राजकारणी आणि कंबोडियाच्या वर्तमान उपपंतप्रधान आहेत. त्या कंबोडियन पीपल्स पार्टी या राजकीय पक्षाच्या सदस्या असून 2003 मध्ये नॅशनल असेंब्लीमध्ये स्वे रिएंग प्रांताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून आल्या होत्या.

25 सप्टेंबर 2008 पासून, त्या कंबोडियाच्या उपपंतप्रधान पदावर कार्यरत आहेत. त्या देशातील पहिल्या महिला उपपंतप्रधान आणि चार स्टार जनरल आहेत. त्यांनी 1970 मध्ये यूएस-समर्थित ख्मेर प्रजासत्ताक काळात सैन्यात भरती झाल्या, त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात लष्करी परिचारिका म्हणून झाली होती.

कंबोडिया हा बौद्धांचे सर्वात जास्त प्रमाण असलेला देश आहे, येथील सुमारे 98 टक्के लोकसंख्या आहे बौद्ध धर्माची अनुयायी आहे.

 

10. त्साई इंग-वेन (तैवानच्या राष्ट्रपती आणि उप-पंतप्रधान)

Tsai Ing-wen

त्साई इंग-वेन (जन्म 1956) ह्या तैवानची राजकारणी असून 20 मे 2016 पासून रिपब्लिक ऑफ चायना (तैवान) च्या 7 व्या राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत. त्या तैवानच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.

त्या 2020 पासून डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (DPP) या राजकीय पक्षाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी यापूर्वी सुद्धा 2008 ते 2012 आणि 2014 ते 2018 पर्यंत DPP च्या अध्यक्षा म्हणून काम केले आहे.

25 जानेवारी 2006 ते 21 मे 2008 या काळात त्यांनी तैवानच्या उपपंतप्रधान (वॉइस प्रेमियर) देखील होत्या.

 

सारांश

‘राष्ट्रपती किंवा पंतप्रधान असलेल्या बौद्ध महिला’ यांच्याविषयीचा‘ हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. लेख आवडल्यास इतरांपर्यंत जरूर शेअर करा.

या लेखामध्ये अजुन एखादे नाव हवे होते असे तुम्हाला वाटल्यास कृपया त्याविषयी ई-मेल द्वारे किंवा कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवावे. धन्यवाद.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

One thought on “जगातील 10 बौद्ध महिला राष्ट्रपती आणि पंतप्रधान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *