बौद्ध, महार आणि दलित यांची लोकसंख्या

बौद्ध, महार आणि अनुसूचित जाती (दलित) हे तिन्ही समाज गट एकमेकांशी निगडित आहेत. महाराष्ट्रातील लाखो-करोडो लोकांच्या एकत्रितपणे ह्या तिन्ही ओळखी आहेत. या लेखामध्ये आपण बौद्ध, महार आणि दलित या तीन समूहांच्या लोकसंख्येविषयी काही माहिती बघणार आहोत. – Mahar Buddhist dalits

Population of Buddhists, Mahars and Dalits
बौद्ध, महार आणि दलितांची लोकसंख्या

2011 च्या जनगणनेनुसार, भारतात दलितांची अर्थात अनुसूचित जातींची लोकसंख्या 20.14 कोटी अर्थात 16.6 टक्के आहे. हे अनुसूचित जातीचे लोक हिंदू, शीख आणि बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.‌ Mahar Buddhist dalits

 

बौद्ध, महार आणि दलितांची लोकसंख्या

भारतातील दलितांचा धर्म आणि लोकसंख्या 

अनुसूचित जातीतील बौद्ध, शिख आणि हिंदू यांची संख्या किती आहे? 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील अनुसूचित जातींच्या लोकांची धर्मनिहाय आकडेवारी बघू…

  • दलित हिंदू – 18.96 कोटी
  • दलित शीख – 59.53 लाख
  • दलित बौद्ध – 57.57 लाख

 

या 20.14 कोटी दलित हिंदू, शिख आणि बौद्ध यांमध्ये जर आपण 2 कोटी दलित ख्रिश्चनांना आणि 10 कोटी दलित मुसलमानांना जोडले तर भारतामध्ये दलितांची एकूण लोकसंख्या सुमारे 32 कोटी होते. हे प्रमाण भारताच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश आहे.

  • दलित मुसलमान – 10 कोटी
  • दलित ख्रिश्चन – 2 कोटी

 

भारतीय कायद्यानुसार, जी व्यक्ती अनुसूचित जातीची (दलित) असते तिचा धर्म केवळ हिंदू, बौद्ध किंवा शीख असू शकतो. यात तीन धर्मांव्यतिरिक्त मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीयांमध्ये सुद्धा दलित अथवा अनुसूचित जातीचे लोक असतात मात्र ज्यांना अनुसूचित जातीचे (Scheduled Caste) शासकीय लाभ अगर सवलती मिळत नाहीत.

 

महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि लोकसंख्या (Mahar Buddhist Dalits)

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात अनुसूचित जातींची (दलितांची) लोकसंख्या 1,32,75,898 एवढी आहे, जीचे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत 11.81% प्रमाण आहे.

भारतातील एकूण (20.14 कोटी) अनु. जातींपैकी 6.6% अनु. जातीचे लोक हे महाराष्ट्रातील आहेत.

महाराष्ट्रात एकूण 59 अनुसूचित जाती आहेत, यापैकीच महार ही एक जात किंवा समाज होय.

महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख अनुसूचित जातींमध्ये महार, मांग, चाभांर व भंगी हे चार सर्वात मोठे समुदाय आहेत.

2011 मध्ये, महाराष्ट्रातील 1.33 कोटी अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत

  • 57.5% (76 लाख) महार,
  • 20.3% (26.8 लाख) मांग,
  • 12.5% (16.5 लाख) चांभार
  • 1.9% (2.5 लाख) भंगी या समाजाचे लोक आहेत.

या चार जातींचे एकत्रित प्रमाण 92% आहे. उर्वरित 55 अनुसूचित जातींचे प्रमाण 8% आहे. जेमतेम 20 – 22 अनुसूचित जातींची लोकसंख्या 1000 पेक्षा कमी आहे.

 

महाराष्ट्रातील दलितांचा धर्म 

2011 मध्ये, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींपैकी

  • 60.7% (सुमारे 80.12 लाख) लोक हिंदू,
  • 39.2% (52,04,284) लोक बौद्ध
  • अवघे 0.1% (13 हजार) लोक शिख आहेत.

जर जनगणनेत हिंदू म्हणून नोंद झालेल्या त्या 29 लाख महारांची गणना बौद्ध म्हणून झाली असती तर महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही 94.04 लाख इतकी झाली असती, जी महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 8.37 टक्के असली असती.

मुसलमान किंवा ख्रिस्ती झालेल्यांना अनुसूचित जातीचे म्हणून गणले जात नाही, त्यामुळे त्यांचा समावेश येथे नाही.

अनुसूचित जाती प्रवर्गातील बौद्ध

एकूण बौद्ध लोकसंख्या अनु.जाती. बौद्ध लोकसंख्या प्रमाण (%)
भारत ८४,४२,९७२ ५७,५७,००० ६८.१९%
महाराष्ट्र ६५,३१,२०० ५२,०४,२८४ ७९.६८%

 

महारांचा धर्म आणि प्रमाण 

महार समाज हा 99% जरी बौद्ध धर्मीय असला तरी सुद्धा महारांचा एक मोठा वर्ग (सुमारे 38%) 2011 मध्ये जनगणनेत धर्माने “हिंदू” म्हणून नोंदवला गेला आहे. परिणामी राज्यात बौद्धांची संख्या बरीच कमी दिसते.

2001 च्या जनगणनेच्या अभ्यासावरून, 2011 मध्ये महाराष्ट्र राज्यात 76 लाख महार समाज आहे, त्यापैकी

  • सुमारे 62% (47.12 लाख) महार हे बौद्ध आहेत, आणि
  • 37.9% (28.73 लाख) महार व्यक्ती हे हिंदू आहेत, तर
  • अवघे 0.1% (7.8 हजार) महार हे शीख धर्मीय आहेत.

जर जनगणनेत हिंदू म्हणून नोंद झालेल्या त्या 29 लाख महारांची गणना बौद्ध म्हणून झाली असती तर महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही 94.04 लाख इतकी झाली असती, जी महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 8.37 टक्के असते.

 

बौद्धांची लोकसंख्या आणि प्रमाण 

2011 जनगणनेच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण (84 लाख) बौद्धांपैकी 77.36% बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत. महाराष्ट्रात बौद्धांची लोकसंख्या 65,31,200 असून राज्याच्या लोकसंख्येतील हे प्रमाण अवघे 6% आहे.

यातील 52,04,284 (79.68%) बौद्ध हे अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. उर्वरित 13 लाख (20%) बौद्ध हे अन्य मागास (ओबीसी), अनुसूचित जमाती (एसटी), खुल्या (ओपन) व इतर प्रवर्गातील आहेत.

ओबीसींचे, मातगांचे व इतर जातींचे धर्मांतरे राज्यात दरवर्षी होत राहतात.

केवळ अनुसूचित जातींचा विचार करता सुमारे 80 लाख (29 लाख महारांसह) अनु. जातींचे लोक आजही अधिकृतरीत्या बौद्ध नाहीत.

प्रत्येक दशकात महाराष्ट्रातील बौद्धांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसते आहे, जी आंबेडकरी चळवळीसाठी एक गंभीर बाब आहे.

  • जनगणना – बौद्ध संख्या – बौद्ध प्रमाण-
  • 1951 मध्ये, 2.49 हजार   – 0.01 %
  • 1961 मध्ये, 27.90 लाख – 7.05 %
  • 1971 मध्ये, 32.64 लाख – 6.48 %
  • 1981 मध्ये, 39.46 लाख – 6.29 %
  • 1991 मध्ये, 50.41 लाख –  6.39 %
  • 2001 मध्ये, 58.39 लाख – 6.03 %
  • 2011 मध्ये, 65.31 लाख –  5.81 %

 

1961 मध्ये, महाराष्ट्र राज्यात 7.05% बौद्ध होते, आणि हे आतापर्यंतचे सर्वोच्च प्रमाण आहे. 50 वर्षानंतर 2011 मध्ये, 5.81% बौद्ध झाले. 2021 ची जनगणना झाली नाही, त्यामुळे चालू वर्षातील बौद्धांची लोकसंख्या आणि प्रमाण कळू शकत नाही.

इतर समाजांतील लोकांना बौद्ध होण्यास प्रेरित करताना अनुसूचित जातींना व त्यातही महारांना अधिकृतपणे बौद्ध धर्मात कसे आणता येईल याचा विचार व कृती प्रत्येक धम्म बंधु-बघिनींनी करायला हवा.

भारतीय जनगणनेचे आकडे सांगतात की, धर्मांतरित बौद्ध हे विभिन्न अंगाने सामाजिकदृष्ट्या सर्वांहून विशेषत: हिंदू दलितांहून विकसित आहेत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच बौद्ध धर्म हा मनुष्याचा उत्कर्ष करू करतो.

 

महाराष्ट्रातील अनुसूचित जातींशी संबंधित काही महत्त्वपूर्ण बाबी

  • 2011 नुसार, अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे (11.81 लाख/ 8.89%). पुणे जिल्ह्यानंतर नागपूर (8.68 लाख/ 6.34%), सोलापूर (6.5 लाख/ 4.89%) ह्या जिल्ह्यांचे क्रमांक येतात.
  • अनुसूचित जातींच्या सर्वाधिक कमी लोकसंख्या असणाऱ्या 3 जिल्ह्यांमध्ये नंदुरबार (47,985) सिंधुदुर्ग, (55,586), आणि रत्नागिरी (66,948) हे जिल्हे येतात.
  • प्रशासकीय विभागानुसार अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या पुणे विभागात (11.80 लाख) आहे.

 

महाराष्ट्रातील बौद्धांशी संबंधित काही महत्त्वपूर्ण बाबी

  • 2011 च्या जनगणनेनुसार, सर्वाधिक बौद्ध धर्मीय लोकसंख्या असणारे 3 जिल्हे पुढीलप्रमाणे आहेत : नागपूर (6.68 लाख), मुंबई उपनगर (4.70 लाख), आणि ठाणे-पालघर (4.50 लाख).
  • सर्वात कमी बौद्ध धर्मीय लोकसंख्या असणारे 3 जिल्हे पुढीलप्रमाणे आहेत : नंदुरबार (5 हजार), धुळे (13 हजार), आणि सिंधुदुर्ग (24 हजार).
  • 1% पेक्षा कमी बौद्ध लोकसंख्या असणारे 5 जिल्हे पुढीलप्रमाणे आहेत : सोलापूर (0.8%), कोल्हापूर (0.8%), अहमदनगर (0.8%), धुळे (0.7) व नंदुरबार (0.3%).
  • मुंबईत (मुंबई उपनगर व मुंबई शहर जिल्हा) सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या 7,38,082 आहे, जी महाराष्ट्रातील एकूण बौद्ध लोकसंख्येच्या 11.30% आहे.
  • 2011 च्या जनगणनेनुसार, विदर्भामध्ये 2,30,03,179 लोकसंख्या आहे, आणि 26,97,544 (13.08) लोकसंख्येसह बौद्ध धर्म येथील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे.

 

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *