द्रौपदी मुर्मू यांची संपूर्ण माहिती । Draupadi Murmu Biography in Marathi

आदिवासी राजकीय नेत्या, माजी राज्यपाल व राष्ट्रपती पदाच्या उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू यांचे संपूर्ण जीवन चरित्र आणि त्यांचा राजकीय प्रवास जाणून घेणार आहोत.

Draupadi Murmu Biography in Marathi
Draupadi Murmu Biography in Marathi

24 जुलै 2022 रोजी सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदाचा कालावधी संपणार आहे. द्रौपदी मुर्मू या भाजपप्रणित एनडीएच्या राष्ट्रपतिपदासाठीच्या उमेदवार आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली आहे.

द्रौपदी मुर्मू यांची माहितीInformation about Draupadi Murmu

64 वर्षीय द्रौपदी मुर्मू (जन्म 20 जून 1958) ही एक भारतीय राजकारणी आहे. त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत. 2022 च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) अधिकृत उमेदवार आहेत.

त्यांनी यापूर्वी 2015 ते 2021 पर्यंत झारखंडच्या 9व्या राज्यपाल म्हणून काम केले आहे. त्या ओडिशा राज्यातील आहेत. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत.

त्या भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी नामनिर्देशित होणाऱ्या आदिवासी अर्थात अनुसूचित जमातीच्या पहिल्या व्यक्ती आहेत. याआधी कधीही भारताच्या राष्ट्रपतीपदी अनुसूचित जमातीची (ST) स्त्री किंवा पुरुष कार्यरत झालेला नाही.

मात्र यापूर्वी दलित अर्थात अनुसूचित जातीचे (SC) दोन राष्ट्रपती झालेले आहेत — के.आर. नारायणन व रामनाथ कोविंद.

 

वैयक्तिक जीवन

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावातील एका आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील आणि आजोबा हे दोघेही पंचायती राज व्यवस्थेच्या अंतर्गत सरपंच (गावप्रमुख) होते.

द्रौपदी मुर्मू यांनी श्यामचरण मुर्मूशी लग्न केले. या जोडप्याला दोन मुलगे (दोघेही मरण पावले) आणि एक मुलगी झाली. त्यांच्या पतींचे देखील निधन झाले आहे. draupadi murmu in marathi

 

राजकीय कारकीर्द

राजकारणात येण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू ह्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. नगरसेविका, आमदार, राज्य सरकारमधील मंत्री, व राज्यपाल अशा बऱ्याच राजकीय पदांवर त्यांनी काम केले आहे.

त्या 1997 मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही काम केले.

द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या माजी मंत्री असून 2000-2004 आणि 2004-2009 मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार राहिल्या आहेत.

ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युती सरकारच्या काळात, त्या 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2002 पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक राज्यमंत्री आणि 6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004 या कालावधीत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.

त्यांना 2007 मध्ये ओडिशा विधानसभेने ‘सर्वोत्कृष्ट आमदार‘ म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित देखील केले आहे.

द्रौपदी मुर्मू झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या, आणि त्यांचा कार्यकाळ 18 मे 2015 ते 12 जुलै 2021 पर्यंत होता. एखाद्या भारतीय राज्यात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आदिवासी नेत्या देखील होत्या.

 

2022 ची राष्ट्रपती निवडणूक

जून 2022 मध्ये, पुढील महिन्यात होणाऱ्या 2022 च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड केली आहे.

भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यांचे भारतातील अनेक राज्य सरकारे (आमदार) आणि लोकसभा व राज्यसभा (खासदार) यांमध्ये बहुमत असल्याने या निवडणुकीत त्यांची राष्ट्रपती बनण्याची शक्यता जास्त आहे.

द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनू शकतात. यापूर्वी केवळ प्रतिभा देवीसिंह पाटील ह्या भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती राहिलेल्या आहेत.

 

भूषवलेली महत्त्वाची पदे

* झारखंडच्या 9वे राज्यपाल : 18 मे 2015 ते 12 जुलै 2021

* ओडिशा सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) : (6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2004)

* ओडिशा सरकारमध्ये मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) : (6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004)

* ओडिशा विधानसभेच्या सदस्या – आमदार : (2000 ते 2009)

* अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा

* नगरसेविका

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नव-नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी उजवीकडील खालील बाजूस असणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published.