या लेखात आपण महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादी (List of Scheduled Tribes in Maharashtra) आणि त्यासोबतच 2011 सालच्या जनगणनेनुसार राज्यातील प्रत्येक अनुसूचित जमातीची लोकसंख्या जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रात अनुसूचित जमातींची संख्या 45 असून त्यांची एकूण लोकसंख्या 1.05 कोटी आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादी आणि त्यांची लोकसंख्या (List of scheduled tribes in Maharashtra and their population) जाणून घेण्यापूर्वी आपण थोडक्यात समजून घेऊया की अनुसूचित जमाती अर्थात शेड्युल्ड ट्राईब / एसटी म्हणजे काय आहे.
अनुसूचित जाती व जमाती : भारतीय संविधानाच्या 341 व 342 या अनुच्छेदांनुसार मागासलेले म्हणून जे वर्ग राष्ट्रपतींद्वारा जाहीर केले जातात, त्यांपैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ह्या संख्येच्या व त्यांच्या समस्यांच्या व्यापकतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाच्या गणल्या जातात.
या व्यतिरिक्त इतर कोणते वर्ग मागासलेले म्हणून स्वीकारावेत, याचा निर्णय राज्य सरकारांवर सोपविला आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाने आणखी दोन वर्गांना मागासलेले म्हणून मान्यता दिलेली आहे. यांत (1) विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि (2) नवदीक्षित बौद्ध व आर्थिक दृष्ट्या मागासलेले यांचा समावेश होतो.
अनुसूचित जमाती : अनुसूचित जमातींना आदिवासी, मूलनिवासी, आदिम जाती व टोळ्या, वन्यजाती व गिरिजन अशी वेगवेगळी नावे आहेत. त्यांपैकी ‘आदिवासी’ हे नाव राष्ट्रीय परिभाषेत अधिक प्रचलित आहे. अनुसूचित जमातींना इंग्लिशमध्ये शेड्युल्ड ट्राईब्स (Scheduled Tribes), ‘एसटी’ (ST) आणि हिंदीत ‘अनुसूचित जनजाती’ अशा नावांनीही ओळखले जाते.
लोकसंख्येसह अनुसूचित जमातींची यादी
आधी महाराष्ट्रात अनुसूचित जमातींची संख्या 47 होती, परंतु 2003 मध्ये यांमधील दोन जमाती (क्र. 12 आणि 45) वगळण्यात आल्या. आणि आता राज्यातील अनुसूचित जमातींची संख्या 45 झाली आहे.
अनुसूचित जमाती लिस्ट महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्यातील 45 अनुसूचित जमातींची यादी खालीलप्रमाणे आहे. 2011 च्या जनगणनेनुसार प्रत्येक अनुसूचित जमातीची लोकसंख्या सुद्धा नोंदवण्यात आलेली आहे.
(मोबाईल धारकांसाठी – खालील तक्ता अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यासाठी मोबाईल आडवा धरावा किंवा desktop view मधून पहावे.)
क्र. | अनुसूचित जमाती | लोकसंख्या |
1 | आंध | 4,74,110 |
2 | बैगा | 333 |
3 | बरडा | 1,247 |
4 | बावचा, बामचा | 345 |
5 | भैना | 270 |
6 | भारिया भुमिया, भुईंहार भुमिया, पांडो | 1,348 |
7 | भत्रा | 66 |
8 | भील, भील गरसिया, ढोली भिल्ल, दुंगी भिल्ल, दुंगी ग्रीसिया, मेवासी भिल, रावल भिल, तडवी भील, भागिया, भिलाळा, पावरा, वासव, वसाव | 25,88,659 |
9 | भुंजिया | 2,136 |
10 | बिंजवार | 8,567 |
11 | बिरहुल, बिरहोर | 145 |
12 | वगळले | - |
13 | धानका, तडवी, टेटरिया, वाल्वी | 35,104 |
14 | धनवार | 4,094 |
15 | धोडिया | 17,520 |
16 | दुबला, तळविया, हळपटी | 18,697 |
17 | गामित, गामता, गावीत, मावची, पडवी | 67,796 |
18 | गोंड, राजगोंद, अराख, र्अराख, आगारिया, असुर, बडी मारिया, बाडा मारिया, भटोला, भीममा, भुता, कोलाभाटा, कोलाभुती, भार, बिझनहोर्न मारिया, छोटा मारिया, दंडमी मारिया, धुरु, धुर्वा, ढोबा, धुलीया, दोराला, गाकी, गट्टा, गत्ती, गाय, गोंड, गोवारी, हिल मारिया, कंद्रा, कालंगा, खटोला, कोटर, कोया, खिरवार, खिरवाडा, कुचा मारिया, कुचकी मारिया, माडिया, मारिया, माना, मनुवार, मगिया, मगिया, मग्या, मुडिया, मुरिया , नागची, नायकपोड, नागवंशी, ओझा, राज, सोनझारी झरेका, थाटिया, थोट्या, वेड मारिया, वेड मारिया | 16,18,090 |
19 | हलबा, हलबी | 2,61,011 |
20 | कमार | 1,391 |
21 | कथोडी, कातकरी, धोर काठोदी, धोर कथकरी, सोन काठोदी, सोन काटकारी | 2,85,334 |
22 | कवर, कंवर, कौर, चेरवा, रथिया, तंवर, छत्री | 26,354 |
23 | खैरवार | 1,843 |
24 | खारिया | 745 |
25 | कोकणा, कोकणी, कुकणा | 68,7431 |
26 | कोल | 6,874 |
27 | कोलाम, मन्नेरवारलु | 1,94,671 |
28 | कोळी ढोर, तोकरे कोळी, कोलचा, कोलघा | 2,20,074 |
29 | कोळी महादेव, डोंगर कोळी | 14,59,565 |
30 | कोळी मल्हार | 2,82,868 |
31 | कोंध, खोंद, कंध | 515 |
32 | कोरकु, बोपची, मौअसी, निहाल, नहुल, बोंधी, बोंडेया | 2,64,492 |
33 | कोया, भिने कोया, राजकोया | 388 |
34 | नागेसिया, नागासिया | 133 |
35 | नायकडा, नायका, चोलिवाला नायका, कपाडिया नायका, मोटा नायका, नाना नायका | 22,307 |
36 | ओरांव, धनगड | 43,060 |
37 | परधान, पाथरी, सरोती | 1,45,131 |
38 | पारधी, अद्विचीन्डचेर, फान्स पारधी, फणसे पारधी, लांगोली पारधी, बहेलिया, बहेल्लिया, चिता पारधी, शिकारी, तकन ताकंकर, तकिया | 2,23,527 |
39 | पारजा | 315 |
40 | पटेलिया | 2,574 |
41 | पोमला | 44 |
42 | राठवा | 488 |
43 | सवर, सवरा | 348 |
44 | ठाकुर, ठाकर, का ठाकूर, का ठाकर, मा ठाकुर, मा ठाकर | 5,67,968 |
45 | वगळले | - |
46 | वारली | 7,96,245 |
47 | विटोलिया, कोटवालिया, बोरोडिया | 448 |
वरील मराठी भाषेतील जमातींची नावे लोकांना समजण्यासाठी असून, जमातींच्या नावांचा स्थानिक बोलीभाषेप्रमाणे उच्चार वेगवेगळे असु शकतात. तसेच जमातींच्या योग्य नावांसाठी केंद्र शासनाच्या इंग्रजी भाषेतील यादीचा उपयोग करावा.
अनुसूचित जमातींची लोकसंख्या
ST Caste List in Maharashtra Marathi : 2011 सालाच्या जनगणनेप्रमाणे भारतातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या 10,42,54,613 म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 8.61 टक्के आहे.
महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या 1,05,07,000 (1.05 कोटी) आहे जी राज्याच्या लोकसंख्येच्या 9.35% आहे. भारतातील एकूण अनुसूचित जमातींपैकी 10.08% महाराष्ट्रात आहेत.
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील 45 अनुसूचित जमातींपैकी 14 अशा आहेत ज्यांची लोकसंख्या 1,000 पेक्षा कमी आहे, तर 1,00,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सुद्धा 14 अनुसूचित जमाती आहेत.
2011 च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या असलेले तीन जिल्हे खालीलप्रमाणे :
- नाशिक जिल्हा (15.64 लाख / 14.88%)
- नंदुरबार जिल्हा (11.42 लाख / 10.86%)
- पालघर जिल्हा (11.18 लाख / 10.64%)
अनुसूचित जमातींची सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेले तीन जिल्हे खालीलप्रमाणे :
- सिंधुदुर्ग जिल्हा (6,976)
- सांगली जिल्हा (18,333)
- रत्नागिरी जिल्हा (20,374)
10 सर्वात मोठ्या अनुसूचित जमाती
2011 च्या जनगणनेनुसार, सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादी खालीलप्रमाणे आहेत :
- भील – 25,88,659 (24.64%)
- गोंड – 16,18,090 (15.40%)
- कोळी महादेव – 14,59,565 (13.89%)
- वारली – 7,96,245 (7.58%)
- ठाकुर – 5,67,968 (5.41%)
- आंध – 4,74,110 (4.51%)
- कथोडी – 2,85,334 (2.72%)
- कोळी मल्हार – 2,82,868 (2.69%)
- कोरकु – 2,64,492 (2.52%)
- हलबा – 2,61,011 (2.48%)
अनुसूचित जमातींना आरक्षण
शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण: महाराष्ट्रात शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासलेल्या घटकांसाठी (SC, ST, OBC+) एकूण 62 टक्के आरक्षण आहे. त्यांपैकी 7 टक्के आरक्षण अनुसूचित जमातीसाठी आहे.
राजकीय आरक्षण : महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत त्यांपैकी 4 हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे 288 पैकी 14 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत.
अनुसूचित जमातीची धार्मिक लोकसंख्या
अनुसूचित जमातीचे लोक हे वेगवेगळ्या धर्माचा अवलंब करतात. तथापि राज्यातील बहुतांश अनुसूचित जमातीचे लोक हिंदू धर्मीय आहेत.
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची धर्मनिहाय लोकसंख्या खालीलप्रमाणे आहे.
- हिंदू : 1,02,18,315 (97.25%)
- मुस्लिम : 1,12,753 (1.07%)
- बौद्ध : 20,798 (0.20%)
- ख्रिस्ती : 20,335 (0.19%)
- शीख : 2,145 (0.02%)
- जैन : 1,936 (0.02%)
- अन्य धर्मीय : 93,646 (0.9%)
- निधर्मी : 40,285 (0.38%)
- एकूण : 1,05,07,000 (100%)
धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे तरी काय?
महाराष्ट्रातील राजकारणात धनगर आरक्षणाच्या मागणीमुळे अनुसूचित जमाती चर्चेत राहते. धनगर समाज हा महाराष्ट्रातील पाचवा सर्वात मोठा जातसमूह असून राज्यात धनगरांची लोकसंख्या सुमारे साडेतीन टक्के आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवगार्तून (ST) आरक्षण द्यावे, अशी धनगर समाजाची जुनी मागणी आहे. सध्या धनगर समाजाला भटक्या विमुक्त संवर्गातून (NT) 3.5% आरक्षण आहे.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या यादीमध्ये 36व्या क्रमांकावर ‘ओरांव व धनगड’ या जमातींची नावे आहेत.
अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे एकच असून इंग्रजीमध्ये R ऐवजी D असा शब्द वापरण्यात आला आहे. ‘ड’ ऐवजी ‘र’ असा उल्लेख आल्याने आतापर्यंत समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झाला नसल्याचा दावा धनगर समाजातर्फे करण्यात येतो.
धनगर किंवा धनगड यापैकी कोणताही उच्चार असला तरी त्याचा अर्थ समान असल्याचा दावा धनगर समाजातर्फे करण्यात आला आहे. तथापि अनुसूचित जमाती हा दावा अमान्य करतात.
अनुसूचित जमातींच्या लोकांचा धनगर आरक्षणाला तीव्र विरोध आहे. त्यांच्या मते, धनगर ही ‘जात’ आहे तर ते स्वतः ‘जमाती’ आहेत. अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे वेगवेगळे असल्याचेही अनुसूचित जमातीचे लोक सांगतात.