महाराष्ट्रात महार समाजाची लोकसंख्या किती? जनगणनेतून आकडेवारी समोर

आजच्या या लेखामध्ये आपण महाराष्ट्रातील महार समाज लोकसंख्या (Mahar community population in Maharashtra) याविषयी सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. Mahar Samaj Loksankhya Maharashtra साठी येथे 2011 च्या जनगणनेतील अधिकृत आकडेवारीचा वापर केला गेला आहे. –  महार समाज लोकसंख्या महाराष्ट्र

महार समाज लोकसंख्या महाराष्ट्र - Population of Mahar community in Maharashtra
महार समाज लोकसंख्या महाराष्ट्र – Population of Mahar community in Maharashtra

महाराष्ट्रात अनेक जातीसमूह आहेत, त्यापैकी एक प्रमुख समूह म्हणजे महार. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या शेजारील अनेक राज्यांमध्येही महार समाजाची मोठी लोकसंख्या आहे. भारतातील 15 हून अधिक राज्यांमध्ये महार समाजाला ‘अनुसूचित जाती’चा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र (60%) आणि गोवा (50%) या दोन राज्यांतील अनुसूचित जातींमधील सर्वात मोठा समाज म्हणजे महार होय.

Mahar Samaj Loksankhya Maharashtra : या लेखामध्ये महाराष्ट्रातील महार समाज लोकसंख्या याविषयी सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली असून त्यासाठी 2011 च्या भारतीय जनगणनेतील अधिकृत डेटा वापरण्यात आला आहे. 2021 मध्ये भारताची जनगणना झालेली नाही, त्यामुळे आपल्याकडे 2011 च्या जनगणनेचा नवीनतम डेटा आहे. – Mahar Samaj Loksankhya

 

महार समाज लोकसंख्या

महार समाजाची लोकसंख्या महाराष्ट्र – लोकसंख्येच्या दृष्टीने महार समाजाचा महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक लागतो. मराठा समाजानंतर महार समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या 16 ते 27% आहे तर महार समाजाची लोकसंख्या 7 ते 9% आहे.

परंपरेने, महार गावाबाहेर राहत आणि संपूर्ण गावासाठी विविध प्रकारची कामे करत. ते पहारा, संदेशवाहक, भिंती दुरुस्त करणे, सीमा विवाद निकाली काढणे, रस्ते साफ करणे आणि मृत जनावरे उचलणे यासारखी कामे करत. महारांनी शेतमजूर म्हणूनही काम केले आणि काहींकडे जमिनीची मालकीही होती, जरी ते मूलत: शेतकरी नव्हते.

महार अस्पृश्य असल्याने त्यांना विविध अन्यायकारक गोष्टी व अत्याचारांना सामोरे जावे लागले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महार समाजातून आलेले आहेत.

1980 च्या दशकाच्या सुरुवातीस, महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 9 टक्के महार होते, जे राज्यातील एकूण अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या सुमारे 70 टक्के होते.

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या महार जातसमूहाची लोकसंख्या 80.06 लाख होती, जी राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 7.12 टक्के आणि एकूण अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या 60.31 टक्के होती. 80.06 लाख ही संख्या राज्यातील सर्व महारांची नसून फक्त ‘एससी महार’ लोकांची आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

एससी महार किंवा अनुसूचित जातीचे महार म्हणजे असे महार ज्यांचा ‘धर्म’ हिंदू, बौद्ध किंवा शीख या तिघांपैकी एक आहे. राज्यातील ‘ख्रिश्चन महार’ व ‘मुसलमान महार’ देखील आहेत, पण त्यांना कायदेशीरदृष्ट्या ‘अनुसूचित जाती’चे मानले जात नाही. त्यामुळे त्यांना अनुसूचित जातीच्या महारांच्या लोकसंख्येमध्ये ‘एससी’ म्हणून नोंदणीकृत केले गेले नाही. याशिवाय, जनगणनेतील महारांच्या लोकसंख्येत असेही ‘पूर्वाश्रमीचे महार’ लोक गणण्यात आलेले नाहीत, ज्यांनी आपला ‘धर्म’ बौद्ध नोंदवला, परंतु त्यांनी ‘जात’ महार नोंदवली नाही.

म्हणजेच त्यांनी धर्माच्या कॉलममध्ये बौद्धधर्म लिहिला आणि जातीचा कॉलम रिकामा ठेवला. अशांची नोंदणी बौद्ध म्हणून तर झाली पण महार (आणि पर्यायाने अनुसूचित जाती) म्हणून त्यांची गणना झाली नाही. मुसलमान महार, ख्रिश्चन महार, आणि पूर्वाश्रमीचे महार [आजचे बौद्ध] यांची लोकसंख्या ही 15 ते 20 लाखांपर्यंत असू शकते. अशाप्रकारे या सर्व महारांची लोकसंख्या ही 9 टक्के आहे.

एससी नसलेल्या आणि पूर्वाश्रमीच्या महारांची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसल्याने आपण केवळ एससी महारांची लोकसंख्या सविस्तरपणे समजून घेऊ.

 

अनु. जातींमधील महारांचे प्रमाण

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्राची लोकसंख्या 11.23 कोटी आहे, त्यापैकी 1.33 कोटी (11.8%) अनुसूचित जाती आहेत. महाराष्ट्रामध्ये 59 अनुसूचित जाती आहेत, त्यापैकी एक सर्वात प्रमुख जातसमूह म्हणजे महार. 2011 च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातींमध्ये महार हे 80,06,060 (किंवा 60%) आहेत, त्यांपैकी 40,70,230 पुरुष आणि 39,35,830 स्त्रिया होत्या. महाराष्ट्रात एससी महार समाजाचे प्रमाण 7.12 टक्के आहे.

47,64,174 लाख महार लोक हे ग्रामीण भागात राहत होते तर 32,41,886 लाख लोक हे शहरी भागातील होते.

Mahar Samaj Loksankhya : महारांची महाराष्ट्रात 9 टक्के लोकसंख्या मानली जाते आणि अनुसूचित जातींमधील त्यांचे प्रमाण 70 टक्के असल्याचे मानले जाते. परंतु, 2011 च्या जनगणनेत ख्रिस्ती महार, मुसलमान महार व पूर्वाश्रमीचे महार यांची लोकसंख्या जाहीर केली गेली नसल्यामुळे महाराष्ट्रातील एससी महारांची लोकसंख्या 15-20 लाखांनी कमी दिसून येते.

महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या यादीमध्ये 37 व्या क्रमांकावर महार जातसमूह — ‘महार, मेहरा, तराळ, धेगुमेगु‘ आहे.

2011 च्या जनगणनेनुसार, सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रातील 5 अनुसूचित जाती खालीलप्रमाणे आहेत :

 1. महार जातीसमूह – 80,06,060 (60.31%)
 2. मांग जातीसमूह – 24,88,531 (18.74%)
 3. चांभार जातीसमूह – 14,11,072 (10.63%)
 4. भंगी जातीसमूह – 2,17,166 (1.64%)
 5. ढोर जातीसमूह – 1,16,287 (0.88%)

 

महारांची धर्मनिहाय लोकसंख्या

अनुसूचित जातींची लोकसंख्या ही हिंदू, बौद्ध आणि शीख या तीन धर्मांमध्ये विभागली गेली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींपैकी 53 मध्ये बौद्ध धर्म आढळले आहेत. अनुसूचित जातींमध्ये एकमेव महार जातसमूह असा आहे ज्यात बौद्धांची लोकसंख्या ही हिंदूपेक्षा जास्त आहे. उर्वरित 58 अनुसूचित जातींमध्ये हिंदू हे बौद्धांपेक्षा जास्त होते‌.

 

महार समाज लोकसंख्या महाराष्ट्र - Population of Mahar community in Maharashtra by religion
महार समाज लोकसंख्या महाराष्ट्र – Population of Mahar community in Maharashtra by religion

महार समाज लोकसंख्या महाराष्ट्र – महार समाज हा 99% जरी बौद्ध धर्मीय असला तरी सुद्धा महारांचा एक मोठा गट (38%) 2011 मध्ये जनगणनेत धर्माने ‘हिंदू’ म्हणून नोंदवला गेला आहे. परिणामी राज्यात बौद्धांची संख्या बरीच कमी झालेली दिसते. जनगणनेमधील नोंदणी नुसार, 2001 मध्ये, 56 टक्के महार हे बौद्ध होते, जे 2011 मध्ये 62 टक्के झाले. म्हणजेच या दहा वर्षांमध्ये सुमारे 5.5 टक्के महार लोकांनी स्वधर्माची नोंद ‘बौद्ध’ म्हणून केली. दुसरीकडे 2001 ते 2011 या वर्षांमध्ये हिंदू धर्म नोंदवणारे महार 43.7% हून 38.15% झाले (साडेपाच टक्क्यांची घट). 2021 मध्ये जनगणना झाली असती तर बौद्ध धर्म नोंदवणारे महार हे निश्चितच 70% च्या पुढे दिसले असते. पुढील 2-3 दशकांमध्ये, महार समाजामध्ये 90-95% पर्यंत बौद्ध धर्माची नोंदणी होईल असे वाटते.

 

2001 च्या जनगणनेनुसार, महार समाजाची धार्मिक लोकसंख्या खालीलप्रमाणे होती. [संदर्भ  –  1, 2]

 • बौद्ध महार – 31,93,622 (56.24%)
 • हिंदू महार – 24,81,971 (43.71%)
 • शीख महार – 3,319 (0.06%)
 • एकूण महार – 56,78,912 (100%)

 

2011 च्या जनगणनेनुसार, महारांची धार्मिक वर्गवारी खालीलप्रमाणे होती.

 • बौद्ध महार – 49,43,821 (61.75%)
 • हिंदू महार – 30,54,158 (38.15%)
 • शीख महार – 8,081 (0.10%)
 • एकूण महार – 80,06,060 (100%)

 

2001 ते 2011 दरम्यान महारांच्या एकूण लोकसंख्येत 23,27,148 वाढ झाली.


2001 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या खालीलप्रमाणे आहे. [संदर्भ  –  1, 2]

 • SC हिंदू : 66,21,529 (67%)
 • SC बौद्ध : 32,54,144 (32.9%)
 • SC शीख : 5,983 (0.1%)
 • SC एकूण : 9,881,656 (100%)

 

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या खालीलप्रमाणे आहे. [संदर्भ]

 • SC हिंदू : 80,60,130 (60.71%)
 • SC बौद्ध : 52,04,284 (39.20%)
 • SC शीख : 11,484 (0.09%)
 • SC एकूण : 1,32,75,898 (100%)

राज्यातील एकूण अनुसूचित जातीच्या बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या 52,04,284 असून त्यापैकी 49,43,821 (95%) हे महार जातसमूहातील आहेत, तर उर्वरित 2,60,463 (5%) हे अन्य 58 अनुसूचित जातींमधील आहेत.

राज्यातील अनुसूचित जातीच्या हिंदू, बौद्ध व शीख या तिन्ही धार्मिक समुहांमध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही महारांची आहे. महार हे एससी हिंदूंमध्ये सर्वाधिक 38%, एससी बौद्धांमध्ये 95% व एससी शीखांमध्ये 70% आहेत.

 

राज्यातील 30.54 लाख हिंदू महारांची नोंदणी जर बौद्ध महार म्हणून झाली असती तर खालीलप्रमाणे अनुसूचित जातींमध्ये बौद्धांची संख्या वाढली असती आणि हिंदूंची संख्या कमी झाली असती.

 • SC बौद्ध : 82,58,442 (62.21%)
 • SC हिंदू : 50,05,972 (37.71%)
 • SC शीख : 11,484 (0.09%)
 • एकूण SC : 1,32,75,898 (100%)

 

हिंदू म्हणून नोंदवलेल्या 38.15% अर्थात 30.54 लाख महारांची बौद्ध म्हणून नोंद झाली असती तर खालीलप्रमाणे बदल झाले असते.

1) साडेतीस लाख महारांची बौद्ध म्हणून नोंद झाली असती तर महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील 49.44 लाख बौद्ध महार आणि 30.54 लाख हिंदू महार यांची एकूण लोकसंख्या एकत्रित होऊन ‘80 लाख [बौद्ध महार]’ झाली असती. जवळजवळ सर्व महार हे बौद्ध झाले असते.

2) साडेतीस लाख महारांची बौद्ध म्हणून नोंद झाली असती तर महाराष्ट्रात, अनुसूचित जातीमधील 80.60 लाख (61%) दलित हिंदू आणि 52.04 लाख दलित बौद्ध (39%) यांचे प्रमाण बदलून 82.58 लाख (62%) दलित बौद्ध आणि 50.06 लाख (38%) दलित हिंदू झाले असते. म्हणजे अनुसूचित जातीतील हिंदू आणि बौद्ध समाजाची लोकसंख्या अगदी उलट-सुलट झाली असती.

3) 30.54 लाख महारांची बौद्ध म्हणून नोंद झाली असती तर महाराष्ट्र राज्यातील एकूण बौद्ध लोकसंख्या 65,31,200 वरुन वाढून 95,85,358 झाली असती. म्हणजेच राज्यातील बौद्धांचे प्रमाण 5.8 टक्क्यांवरून 8.53 टक्क्यांपर्यंत वाढले असते. यावेळी राज्यातील 79.80% हिंदू सुद्धा 77.30% झाले असते.

4) साडेतीस लाख महारांची बौद्ध म्हणून नोंद झाली असती तर भारतातील बौद्ध लोकसंख्या 84 लाख (0.70%) वरून 1 कोटी 15 लाख (0.95%) झाली असती. मात्र तरीही, देशातील लोकसंख्येत 1% बौद्ध होण्यासाठी अजून 7 लाख लोकसंख्या कमी पडली असती‌.

2011 च्या जनगणनेत, 80 लाख लोकांची नोंदणी ‘महार’ म्हणून झाली आहे. याच्या व्यतिरिक्त सुमारे 15-20 लाख (पूर्वाश्रमीचे) महार असेही आहेत, ज्यांनी स्वतःला ‘महार’ म्हणून नोंदणीकृत केले नाही, त्यांनी फक्त धर्माच्या रकान्यात म्हणून ‘बौद्ध’ नोंदवले, आणि [अनुसूचित] जातीचा रकाना रिकामा ठेवला. अशा व्यक्तींची गणना बौद्धांमध्ये तर झाली परंतु अनुसूचित जातींमध्ये (तसेच महार लोकसंख्येमध्ये) ते समाविष्ट झाले नाही. यामुळे बौद्धांची लोकसंख्या थोडी वाढली परंतु अनुसूचित जातींची आणि महारांची लोकसंख्या घटली.

वरील माहिती बघता महार समाजाची विभागणी खालील तीन गटांमध्ये करता येईल.

 1. हिंदू महार : धर्म ‘हिंदू’ आणि जात ‘महार’ नोंदवणारे,
 2. बौद्ध महार : धर्म ‘बौद्ध’ आणि जात ‘महार’ नोंदवणारे,
 3. पूर्वाश्रमीचे महार : धर्म ‘बौद्ध’ नोंदवणारे पण कोणतीही ‘जात न नोंदवणारे’

 

महार समाज लोकसंख्या महाराष्ट्र – जवळजवळ 99% महार समाज बौद्ध धर्मीय असला तरी जनगणनेमध्ये 30 लाख 53 हजार (किंवा 38%) महारांची धार्मिक नोंद ‘हिंदू’ म्हणून झाली आहे. खाली काही प्रमुख कारणे दिली आहेत ज्यांमुळे बौद्ध महारांची हिंदू महार म्हणून नोंद झाली असावी.

१) बौद्धांना अशी भीती असते की महार जाती सोबतच धर्म हिंदू नोंदवला नाही तर त्यांचे अनुसूचित जातीचे आरक्षण रद्द होईल व त्यांना आरक्षणाचे फायदे व सवलती घेता येणार नाही. म्हणून बौद्ध धर्मीय महार जनगणनेत हिंदू धर्म नोंदवतात.

२) बौद्धांना असेही वाटते की महार जात नोंदवायची असेल तर धर्म फक्त हिंदूच येतो. काही बुद्धांचा असाही गैरसमज आहे की महार जात नोंदवायची असेल तर धर्म फक्त हिंदूच लिहावा लागतो. कारण महार ही जात आहे आणि जाती या हिंदू धर्मात आहेत. प्रत्यक्षात महार हा जातसमूह जवळजवळ सर्व धर्मांमध्ये आहे.

 

महार म्हणजेच हिंदू का?

अनुसूचित जातीची व्यक्ती किंवा दलित व्यक्ती ही सामान्यतः ‘हिंदू’ मानली जाते, परंतु प्रत्यक्षात हे एक मिथक आहे. अनुसूचित जातींमध्ये हिंदूंसोबत बौद्ध आणि शीख यांचा देखील समावेश होतो. त्यामुळे ‘महार जात’ लिहिल्याने ‘धर्म’ आपोआप ‘हिंदू’ होतो, असा विचार करणे पूर्णपणे चुकीचे आहे.

अनेक लोक महार लोकांना हिंदू मानतात. त्यांच्या मते, महार ही एक ‘हिंदू जात’ आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या शाळेच्या कागदपत्रावर (टीसी वगैरे) किंवा जनगणनेत जातीच्या रकान्यात ‘महार’ नोंद केली गेली असेल तर त्या व्यक्तीचा ‘धर्म’ हा आपोआप ‘हिंदू’ होतो. परंतु हे सुद्धा खरे नाही.

व्यक्ती कोणत्याही जातीची असली तरी तिला स्वतःचा धर्म निवडण्याचा अधिकार असतो. जर एखादी व्यक्ती महार असेल तर ती हिंदू, बौद्ध, शीख, जैन, मुस्लिम किंवा ख्रिश्चन यांपैकी कोणताही धर्म नोंदवू शकते. तेव्हा फरक इतकाच राहील की हिंदू, बौद्ध किंवा शीख हे तीन धर्म नोंदवणारे महार लोक हे अनुसूचित जातीचे असतील; तर जैन, ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म नोंदवणारे महार हे अनुसूचित जातीमध्ये मोडणार नाहीत. त्यामुळे महार व्यक्तीने धर्माच्या रकान्यात ‘बौद्ध धर्म’ नोंदवला तर तिच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणावर देखील गदा येत नाही. त्यामुळे महारांनी धर्माची नोंद ‘बौद्ध’ करणे काहीही गैर नाही. हेच मांग, चांभार यांच्यासह सर्वच अनुसूचित जातींसाठी लागू आहे.

 

बौद्ध धर्मात जर जाती नाहीत मग जातीच्या रकान्यात महार जात का नोंदवायची?

याचे उत्तर सोपे आणि सरळ आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गात येण्यासाठी आपणास 59 अनुसूचित जातींपैकी कोणतीतरी एक जात/ समूह नोंदवणे गरजेचे वा अनिवार्य असते. अशावेळी दुसरा प्रश्न निर्माण होऊ शकतो की बौद्ध धर्मात जाती नाही तर मग आपण अनुसूचित जाती प्रवर्गात का यायचे? याचे उत्तर आहे आपण ‘मागास‘ (backward) आहोत म्हणून. बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे आपण पुढारलेलो (forward) झालो नाहीत. आपल्या समाजात प्रचंड गरिबी आणि मागासलेपण आहे हे विसरून चालणार नाही.

त्यामुळे, बौद्ध धर्मात जाती नाहीत यामुळे आपण अनुसूचित जातीची नोंद लिहिणे टाळण्याऐवजी, आपण ‘मागासलेले’ आहोत म्हणून [अनुसूचित] जातीची नोंद लिहिणे अत्यंत गरजेचे आहे. बौद्ध धर्मासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण नाकारण्या इतपत बौद्ध समाज बांधव सक्षम झालेले नाहीत, हे सत्य आपण विसरायला नको. बौद्धांमधील एक फार लहान गट हा श्रीमंत आणि सधन झालेला आहे, या गटाला एससीचे आरक्षण नाही मिळाले तरी तो स्वबळावर कर्तुत्व गाजवू शकतो.

परंतु बहुंशी बौद्ध समाज हा आरक्षणाशिवाय आपल्या पाल्यांची शैक्षणिक फी भरण्यास सक्षम नाही. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सवर्ण किंवा पुढारलेल्या जातींमधील विद्यार्थ्यांएवढ्या उपलब्ध बाबी अनुसूचित जातीच्या किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांजवळ उपलब्ध नसतात. अशावेळी बौद्ध समाजाला आरक्षणाची गरज असल्याची जाणवते. आजच्या बौद्ध आणि अनुसूचित जातींच्या समाजाने ‘अस्पृश्यता’ भोगली आहे, त्यामुळे त्यांना आरक्षणाच्या मदतीने पुढे येण्याची संधी मिळत आहे.

महत्त्वाचे हे की, आपला उद्देश हा जातीच्या रकान्यात ‘जात’ नोंदवणे नसून आपली नोंद ही ‘अनुसूचित जाती’ (Scheduled Caste) म्हणून व्हावी यासाठी आहे. अनुसूचित जातीची नोंद व्हावी म्हणून आपल्याला 59 पैकी कोणती तरी एक जात नोंदवणे अनिवार्य असते. धर्माच्या रकान्यात आवर्जून ‘बौद्ध धर्म’ नोंदवावा.

 • धर्म : बौद्ध
 • जात : महार / 59 SC पैकी एक
 • प्रवर्ग : अनुसूचित जाती (SC)

 

‘सर्व बौद्ध’ हे महार आहेत?

‘सर्व बौद्ध’ हे ‘महार’ आहेत – हा सुद्धा एक गैरसमज आहे. महार हा अनुसूचित जातींमधील सर्वात मोठा समाज आहे आणि बहुसंख्य महार हे बौद्ध धर्मीय आहेत. महारांखेरीज 59 अनुसूचित जातींपैकी एकाही मध्ये बौद्ध धर्म बहुसंख्यक नाही. असे असले तरी सर्वच महार हे बौद्ध नाहीत हेही तितकेच खरे.

आता आपण दुसरा मुद्दा विचारात घ्यायला हवा. महाराष्ट्रातील 59 SC जातींपैकी जवळजवळ सर्वच (53) जातींमध्ये बौद्ध धर्मीय आढळतात. ज्या 6 जातींमध्ये बौद्ध नाहीत त्या जातींची एकूण लोकसंख्या ही 50-100 च्या आत आहे. जर या जातींची लोकसंख्या 200-400 जरी असली असती तरी सर्वच 59 जातींमध्ये बौद्ध धर्मीय आढळले असते.

महाराष्ट्रातील बौद्ध बांधव हे केवळ महार जातीशी संबंधित नसून ते जवळजवळ सर्वच अनुसूचित जातींमधून आहेत. त्यामुळे ‘सर्व बौद्ध हे महार आहेत’ किंवा ‘महार या एकाच जातीमध्ये बौद्ध धर्म आहेत’ हा एक गैरसमज आहे. बौद्धांनी महार या समाजाला ‘जात’ (caste) समजण्याऐवजी ‘समूह’ (community) समजणे जास्त उपयुक्त ठरेल.

अनुसूचित जातींमध्ये जेवढे बौद्ध धर्मीय आहेत, त्यापैकी 95 टक्के हे एकट्या महार जातीतून येतात, उर्वरित 58 अनुसूचित जातींमध्ये 5 टक्के बौद्ध आहेत.

2011 च्या जनगणनेतील अधिकृत आकडेवारी पाहिली असता आढळते की, 2011 मध्ये महाराष्ट्रात एकूण 65,31,200 बौद्ध धर्मीय होते, त्यापैकी 75.70 टक्के (49,43,821) हे थेट महार समाजातील होते, तर उर्वरित 24.30% (15,87,379) बौद्ध धर्मीय हे महार नाहीत. या 24% बौद्धांमध्ये पूर्वाश्रमीच्या महारांची मोठी लोकसंख्या असू शकते, ज्यांनी स्वतः जात ‘महार’ किंवा इतर नोंदवली नाही.

 

नवबौद्ध

‘नवबौद्ध’ ही एक सरकारी संज्ञा आहे. महाराष्ट्र शासन वेळोवेळी अनुसूचित जातींसाठी योजना काढते तेव्हा त्यावर लिहिलेले असते – ‘अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गासाठी’ योजना. प्रत्यक्षात नवबौद्ध हा ‘प्रवर्ग’ नाही, नवबौद्ध ही ‘जात’ नाही, किंवा 59 पैकी एखादी ‘अनुसूचित जाती’ नाही, तसेच नवबौद्ध हा ‘धर्म’ देखील नाही. नवबौद्ध हे निश्चितच बौद्ध धर्मीय असले तरी त्यांची ओळख थोडी वेगळी आहे. नवबौद्ध म्हणजेच ‘अनुसूचित जातीमधील बौद्ध धर्मीय व्यक्ती‘.

नवबौद्ध हे अनुसूचित जातींच्या अंतर्गत येतात, बौद्ध धर्माच्या अंतर्गत येतात. ‘बौद्ध धर्म स्वीकारलेले’ किंवा ‘बौद्ध धर्म अंगीकारणारे’ पूर्वाश्रमीचे अस्पृश्य (किंवा दलित) लोक म्हणजे नवबौद्ध होत. महाराष्ट्रातील 53 अनुसूचित जातींमध्ये जे 52,04,284 बौद्ध आहेत, ते सर्व नवबौद्ध आहेत. देशात नवबौद्ध यांची लोकसंख्या 57.57 लाख आहे.

नवबौद्ध हे बहुसंख्य (95%) महार असले तरी सर्वच नवबौद्ध हे महार समाजाचे नाहीत, आणि सर्वच महार देखील नवबौद्ध नाहीत. नवबौद्ध यास पर्यायी शब्द ‘अनुसूचित जातीचे बौद्ध’ (एससी बुद्धिस्ट) आणि ‘दलित बौद्ध’. ‘दलित हिंदू’ व ‘दलित शीख’ प्रमाणे ‘दलित बौद्ध’ ही संज्ञा हिंदी मिडीयामध्ये वापरली जाते. महाराष्ट्रातील बौद्ध धर्मीय अनुसूचित जातीचे लोक हे स्वतः साठी ‘दलित’ संज्ञा नाकारतात, पण इतर राज्यांच्या बौद्ध एससी मध्ये ‘दलित’ संज्ञा स्वीकार्य असल्याचे आढळते.धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *