मानवी जीवनातील दुःख याविषयी बुद्धांचे विचार

गौतम बुद्धांना जगातील एक थोर शास्त्रज्ञ समजले जाते. त्यांनी मानवी जीवनातील दुःखाच्या निरोधाचा अर्थात नाशाचा शोध लावला. मानवी जीवनातील दुःख कशामुळे आहे आणि त्याचा नाश कशामुळे होऊ शकतो याचा विचार बुद्धांनी सांगितलेला आहे. त्यामुळे ‘दुःख’ याविषयी बुद्धांचे विचार काय होते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

मानवी जीवनातील दुःख याविषयी बुद्धांचे विचार

Lord Buddha’s thoughts on suffering in human life :
दुःखाच्या अस्तित्वाची स्वीकृती आणि दुःखाच्या नाशाचे उपाय ही बौद्ध धम्माची आधारशिला होय. तथागत भगवान बुद्धांनी मानवी जीवनातील दुःखाबद्दल आपले विचार व्यक्त केलेले आहे जे संपूर्ण मानव जातीसाठी हिताचे आहे. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बुद्धांनी आपल्या पहिल्या धर्मोपदेशामध्ये चार आर्यसत्यांचा उपदेश दिला. गौतम बुद्धांनी दिलेल्या पहिल्या प्रवचनाला धम्मचक्रप्रवर्तन किंवा धम्मचक्कपवत्तन म्हणतात.

बुद्धांच्या याच चार आर्यसत्यांना बौद्ध धम्माचा आधार समजले जाते. या आर्यसत्यांमध्ये बुद्धांनी मानवी जीवनातील दुःखाचा उल्लेख केलेला आहे. आता आपण जाणून घेऊया मानवी जीवनातील दुःख याविषयी बुद्धांचे विचार.

 

बुद्धांनी सांगितलेली चार आर्यसत्ये अर्थात Four Noble Truths खालीलप्रमाणे आहेत :

1 – दुःख – म्हणजे या जगात दुःखाचे अस्तित्व आहे.

2 – दुःख समुदय – म्हणजे या दुःखाला कारण आहे.

3 – दुःख निरोध – म्हणजे या दुःखाचा निरोध होऊ शकतो.

4 – दुःख निरोध गामिनी प्रतिपदा – म्हणजे दुःख निरोधाचा जो मार्ग आहे तोच हा मार्ग (मध्यम मार्ग) आहे.

खरं तर, पहिल्या तीन आर्यसत्यांवर बौद्धधम्माचे तत्त्वज्ञान (philosophy of Buddhism) आधारलेले आहे, तर चौथे आर्यसत्य बौद्धधम्माचे नीतिशास्त्र (ethics of Buddhism) होय.

 

दुःखाविषयी बुद्धांचे विचार

भगवान गौतम बुद्धांचे दुःखाबद्दलचे विचार अधिक विस्तृतपणे समजून घेण्यासाठी आपल्याला चारही आर्यसत्यांना समजून घ्यावे लागेल. तथागत बुद्धांनी मानवी जीवनातील दुःखाबद्दल आपण विचार पुढीलप्रमाणे व्यक्त केले आहेत —

पहिले आर्यसत्य :
गौतम बुद्धांनी सांगितलेले पहिले आर्यसत्य हे जगामध्ये किंवा मानवी जीवनामध्ये दुःखाचे अस्तित्व असण्याबाबत आहे. जन्म दुःखमय आहे, वृद्धत्व दुःखमय आहे, व्याधी दुःखमय आहे, आणि मृत्यू सुद्धा दुःखमय आहे. आनंद न देणाऱ्या गोष्टीशी गाठ पडणे सुद्धा दुःखमय आहे. तसेच आनंद देणाऱ्या गोष्टीचा वियोग होणे सुद्धा दुःखमय आहे. एखाद्या गोष्टीची आपल्याला लालसा असते आणि ती गोष्ट मिळाली नाही तर आपल्याला दुःख होते. थोडक्यात पाच आकर्षणे दुःखमय आहे. यालाच दुःख आर्यसत्य म्हणतात.

 

दुसरे आर्यसत्य :
दुसरे आर्यसत्य हे दुःख समुदय आहे, जे दुःखाच्या कारणाबद्दलचे आहे. भगवान बुद्धांनी या आर्यसत्यांमध्ये दुःखास कारणीभूत प्रमुख बाब सांगितलेली आहे – तृष्णा (तण्हा). तृष्णेमुळे दुःख निर्माण होते. इंद्रीय सुखाची लालसा म्हणजे काम तृष्णा होय. जगण्याची लालसा म्हणजे भव तृष्णा होय, ज्यामध्ये मनुष्याला अनंत काळापर्यंत जगावयाची लालसा असते. नष्ट होऊन पुन्हा जन्म घेण्याची लालसा म्हणजे विभव तृष्णा होय. यासारख्या तृष्णा मानवी जीवनातील दुःखाचे कारण आहेत. आवड, इच्छा, लालसा, वासना ही तृष्णेची रूपे होय.

 

तिसरे आर्यसत्य :
तथागत बुद्धांनी सांगितलेले तिसरे आर्यसत्य महत्त्वाचे आहे, जे दुःखाचा नाश वा निरोध होण्याबद्दलचे आर्यसत्य आहे. दुःखास कारणीभूत असलेल्या तृष्णेचा निःशेष होऊ शकतो, म्हणजेच तृष्णेचा संपूर्ण नाश होऊन निर्वाण प्राप्त होऊ शकते हेच दुःख निरोधाचे आर्यसत्य होय.

दुःखाचे अस्तित्व आहे आणि दुःखाचे कारण तृष्णा आहे या बुद्धांच्या पहिल्या दोन आर्यसत्यांमुळे बौद्ध धम्माला ‘निराशवादी धर्म’ म्हटले जात असावे. मात्र बुद्धांचे तिसरे आणि चौथे आर्यसत्य बौद्ध धर्माला निराशवादी धर्म असल्याचा दावा खोडून काढतात.

 

चौथे आर्यसत्य :
भगवान बुद्धांनी सांगितलेले चौथे आर्यसत्य म्हणजेच ‘दुःख निरोध गामिनी प्रतिपदा’ अर्थात दुःखाच्या नाशाचा मार्ग सांगणारे आर्यसत्य. आर्य अष्टांगिक मार्ग (अरियो अट्ठंगिको मग्गो) हे दुःख नाशाच्या मार्गाचे आर्यसत्य होय. आर्य अष्टांगिक मार्गांमध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मान्त, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्न, सम्यक स्मृती व सम्यक समाधी यांचा समावेश आहे.

 

बुद्धांचे पंचशील व अष्टांगमार्ग

‘दुःख’ याविषयी बुद्धांचे विचार – भगवान बुद्धांनी मानवी जीवनातील दुःखाचा नाश करण्यासाठी पंचशीलाचामध्यममार्गाचा उपदेश केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की,

  • त्यांच्या सद्धम्माचा आत्मापरमात्मा यांच्याशी काही संबंध नाही. माणसाच्या मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते, याच्याशी सुद्धा संबंध नाही, तसेच कर्मकांडयज्ञ-याग याशी सुद्धा संबंध नाही.
  • त्यांच्या धम्माचा केंद्रबिंदूमानव’ असून या पृथ्वीवर निवास करीत असताना एका माणसाचे दुसऱ्या माणसाप्रती काय कर्तव्य आहे, हा त्यांच्या धम्माचा प्रथम विषय होय.
  • मानव दुःखी आहे, कष्टी आहे, दारिद्र्यात आहे, त्यांच्या दुःखाचा नाश करणे हा त्यांच्या धम्माचा द्वितीय विषय आहे. दुःखाच्या अस्तित्वाची स्वीकृती आणि दुःखाच्या नाशाचे उपाय हीच त्यांच्या धम्माची आधारशिला होय.
  • प्रत्येक माणसाने पवित्रतेच्या, धर्माच्या आणि शीलमार्गाच्या रस्त्यावर चालल्यास दुःखात निरोध होऊ शकतो.

 

पवित्रतेचा मार्गानुसार उत्तम जीवनाचे पाच मापदंड आहेत ज्याला पंचशील म्हटले जाते.

  1. हिंसा न करणे
  2. चोरी न करणे
  3. व्यभिचार न करणे
  4. असत्य न बोलणे आणि
  5. मादक पदार्थांचे सेवन न करणे

उत्तम जीवनाचे हे पाच मापदंड प्रत्येक व्यक्ती करता कल्याणकारी आहेत आणि समाजासाठी देखील कल्याणकारी आहेत. या पंचशीलाचे पालन केल्यानंतर जीवनातून दुःख कमी अगर नाहीसे होते. ‘दुःख’ याविषयी बुद्धांचे विचार जाणून घेतल्यानंतर आपल्याला कळेल की अवाजवी अपेक्षा, इच्छा, आसक्ती, आवड, तृष्णा यांमुळे मानवी जीवन दुःखमय बनते, टाळण्यासाठी बुद्धांनी सांगितलेला मध्यम मार्ग अनुसरायला हवा.

 

हे ही वाचलंत का?

 

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नव-नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी उजवीकडील खालील बाजूस असणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *