महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक पुतळे जगभरात बसवण्यात आले आहेत. आता लवकरच व्हिएतनाममध्येही बाबासाहेबांचे दहा पुर्णाकृती पुतळे (statues of Ambedkar in Vietnam) उभारले जाणार आहेत.
अमेरिका, युनायटेड किंग्डम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, हंगेरी यांसारख्या अनेक देशांमध्ये बाबासाहेबांचे अर्धाकृती आणि पुर्णाकृती पुतळे पाहायला मिळतात. आता व्हिएतनामही या यादीत सामील होणार आहे. – Statues of Dr Ambedkar in Vietnam
व्हिएतनाममधील डॉ. आंबेडकरांचे 10 पुतळे
14 एप्रिल 2023 रोजी येणाऱ्या आंबेडकर जयंतीला व्हिएतनाम देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दहा पुतळ्यांची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे.
हे सर्व पुतळे 3 मीटर उंचीचे पुर्णाकृती पुतळे असतील, म्हणजे साधारणपणे माणसाच्या उंचीच्या दुप्पट/तीनपट. या दहा पुतळ्यांच्या अनावरणानंतर व्हिएतनाम हा बाबासाहेबांचे सर्वाधिक पुतळे असलेला देश बनणार आहे.
या दहा पुतळ्यांव्यतिरिक्त, बाबासाहेबांचे आणखी दोन फूट उंचीचे खूप सारे पुतळे व्हिएतनाममध्ये, प्रामुख्याने बौद्ध मठ आणि विद्यापीठांमध्ये वितरित आणि स्थापित केले जातील.
बाबासाहेबांचे पुतळे बसवण्याचे काम व्हिएतनामी बौद्ध संघाद्वारे केले जाणार असून हे पुतळे व्हिएतनामच्या विविध शहरांमध्ये बसवण्यात येणार आहेत. व्हिएतनामला पारंपारिकपणे ‘बौद्ध राष्ट्र’ म्हणून ओळखले जाते. येथील सुमारे 75 टक्के जनता बौद्ध धर्मीय आहे.
- भारताबाहेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे; UK मध्ये सर्वाधिक
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तीन सर्वात उंच पुतळे
व्हिएतनामच्या महाथेरो डॉ. थिच न्हात तू (THICH Nhat Tu) यांनी आपल्या देशात डॉ. बाबासाहेबांचे पुतळे बसवण्याचा संकल्प केला आहे. सुरुवातीला व्हिएतनामी बुद्धिस्ट असोसिएशनने व्हिएतनामच्या केवळ एका बौद्ध विद्यापीठाच्या प्रांगणात बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याची योजना आखली होती.
मात्र बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समजून घेतल्यानंतर त्यांनी एक नव्हे तर दहा पुतळे वेगवेगळ्या व्हिएतनामी शहरांमध्ये 14 एप्रिल 2023 रोजी स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच बाबासाहेबांचे लेखन साहित्य (BAWS) व्हिएतनामी भाषेत उपलब्ध करून देण्यावरही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
5 डिसेंबर 2022 रोजी, अभिनेते गगन मलिक, सिद्धार्थ हत्तीअंबीरे आणि बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर तिघांनाही व्हिएतनाम मधील ‘व्हिएतनाम बुद्धिस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट’ने मानद डॉक्टरेट (डॉक्टर ऑफ ह्युमन लेटर्स) प्रदान केली.
बाबासाहेबांचा आणखी एक पुतळा
2 सप्टेंबर 2023 रोजी, व्हिएतनामच्या सोक ट्रांग प्रांतात असलेल्या अवलोकितेश्वर मंदिरात बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आणखी एक पुतळा स्थापित करण्यात आला. गगन मलिक फाउंडेशन आणि मोस्ट ऑनरेबल Thich Nhat Tu यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. व्हिएतनाममध्ये बसवण्यात आलेला हा दुसरा आंबेडकरांचा पुतळा असून अजून 8 आंबेडकरी पुतळे येथे बसवायचे आहेत. (बघा Gagan Malik’s facebook post)
व्हियेतनाम किंवा व्हिएतनाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. 311,699 चौरस किलोमीटर (120,348 चौरस मैल) क्षेत्रफळ आणि 96 दशलक्ष लोकसंख्येसह, हा जगातील पंधरावा-सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. व्हिएतनामच्या उत्तरेला चीन आणि पश्चिमेला लाओस आणि कंबोडियाची सीमा आहे. व्हिएतनामची राजधानी हनोई आहे आणि त्याचे सर्वात मोठे शहर हो ची मिन्ह सिटी आहे.
जगात 18 बौद्ध बहुसंख्य देश आणि प्रजासत्ताक आहेत, त्यापैकी जपान हा एकमेव देश आहे जिथे बाबासाहेबांचा पुतळा आहे. आता बाबासाहेबांचे पुतळे असणारा व्हिएतनाम हा दुसरा बौद्ध देश ठरणार आहे.
एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की व्हिएतनाम हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेला देश आहे. जगातील सर्वात जास्त बौद्ध लोकसंख्या असलेले शीर्ष पाच देश खालीलप्रमाणे आहेत. (बौद्ध लोकसंख्येसह आणि त्या देशातील बौद्धांचे प्रमाण दिले आहे)
- चीन — 75,00,00,000 (50% बौद्ध )
- जपान — 12,10,00,000 (96% बौद्ध )
- व्हिएतनाम — 7,37,00,000 (75% बौद्ध )
- थायलंड — 6,65,00,000 (95% बौद्ध )
- म्यानमार — 5,00,00,000 (90% बौद्ध )
व्हिएतनाममधील बौद्ध धर्म
व्हिएतनाममधील बौद्ध धर्म हा मुख्यत्वे महायान परंपरेचा असून तो देशाचा मुख्य धर्म आहे. बौद्ध धर्म हा ख्रिस्त पूर्व 3र्या किंवा ख्रिस्त पूर्व 2र्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय उपखंडातून व्हिएतनाममध्ये आला. तर काहींच्या मते बौद्ध धर्म हा ख्रिस्त पश्चात 1ल्या किंवा ख्रिस्त पश्चात 2र्या शतकात चीनमधून व्हिएतनाममध्ये आला असावा.
अनेक व्हिएतनामी राजांनी आणि शासकांनी बौद्ध धर्माला राजाश्रय दिला होता. व्हिएतनामी बौद्ध धर्माचा ताओवाद, चिनी अध्यात्म आणि व्हिएतनामी लोक धर्मांच्या काही घटकांशी समन्वित संबंध आहे.
आज, उत्तर ते दक्षिण पर्यंत संपूर्ण व्हिएतनाममध्ये बौद्ध आढळतात. बौद्ध धर्म हा व्हिएतनाममधील एकमेव सर्वात मोठा संघटित धर्म आहे. व्हिएतनामध्ये कम्युनिस्ट सरकार आहे आणि सरकारच्या आकडेवारीनुसार देशातील केवळ 16.4% लोकसंख्या बौद्ध आहे.
काहींनी असा युक्तिवाद केला की ही संख्या नोंदवलेल्यापेक्षा जास्त आहे, कारण अनेकांनी स्वतःला नास्तिक म्हणून घोषित केले परंतु तरीही बौद्ध कार्यात भाग घेतला. नास्तिक व्यक्ती म्हणजे ईश्वराच्या अस्तित्व नाकारणारा व्यक्ती, आणि असा व्यक्ती बौद्ध धर्मीय असतो. बऱ्याच आकडेवारीनुसार आणि देशातील बौद्ध विद्वानांनुसार, व्हिएतनामधील बौद्ध लोकसंख्या ही 75 ते 85% असल्याचे सांगितले जाते.
व्हिएतनामचा कम्युनिस्ट पक्ष अधिकृतपणे नास्तिकतेचा प्रचार करत असला तरी, तो सहसा बौद्ध धर्माच्या बाजूने झुकला आहे, कारण बौद्ध धर्म व्हिएतनामच्या दीर्घ आणि सखोल इतिहासाशी संबंधित आहे.
तसेच, बौद्ध धर्म आणि व्हिएतनामी सरकार यांच्यात क्वचितच वाद झाले आहेत; व्हिएतनामचे कम्युनिस्ट सरकार बौद्ध धर्माला व्हिएतनामी देशभक्तीचे प्रतीक मानते. बौद्ध सणांना सरकारकडून अधिकृतपणे प्रोत्साहन दिले जाते आणि ख्रिश्चन, मुस्लीम आणि इतर धार्मिक घटांच्या तुलनेत बौद्ध धर्मावर कमी निर्बंध आहेत.
सारांश
मित्रांनो, या लेखामध्ये आपण व्हिएतनाममध्ये उभारल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांविषयी (statues of Ambedkar in Vietnam) प्राथमिक माहिती जाणून घेतली. पुतळ्यांचे अनावरण झाल्यानंतर हा लेख अद्ययावत केला जाईल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण हा लेख शेअर करा, धन्यवाद.
हे ही वाचलंत का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 अनमोल सुविचार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘संस्कृत’ अवगत होती का?
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)