नेहरू की आंबेडकर : Wikipedia वर कोण ‘जास्त’ लोकप्रिय आहे? बघा, दोघांचे pageviews

पं. जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Nehru and Ambedkar) या दोन आधुनिक भारताच्या निर्मात्यांपैकी विकिपीडियावर जास्त लोकप्रिय कोण आहे? (Who is more popular on Wikipedia – Nehru or Ambedkar?) ह्या प्रश्नाचे उत्तर आपण आज नेहरू जयंती दिनी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. – Nehru and Ambedkar

Who is more popular on Wikipedia - Jawaharlal Nehru or Dr. Babasaheb Ambedkar
Who is more popular on Wikipedia – Jawaharlal Nehru or Dr. Babasaheb Ambedkar

नेहरू आणि आंबेडकर (Nehru and Ambedkar)

आज 14 नोव्हेंबरनेहरू जयंती अर्थात बाल दिवस. जयंतीदिनी पंडित जवाहरलाल नेहरूंना विनम्र अभिवादन. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे आजही भारतातील अत्यंत लोकप्रिय व्यक्ती आहेत. विकिपीडियावर त्यांना किती व्ह्यूज मिळाले आहेत किंवा त्यांचा विकिपीडिया लेख (प्रोफाइल) किती वेळा वाचला आहे, याविषयी प्राथमिक माहिती आपण या लेखात बघणार आहोत. या सोबतच आपण नेहरूंच्या विकिपीडियावरील लोकप्रियतेची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी करू, अर्थात ही तुलना केवळ विकिपीडियाच्या संदर्भात असेल….

पं. जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या  आधुनिक भारताच्या दोन निर्मात्यांपैकी विकिपीडियावर जास्त प्रसिद्ध कोण आहे? (Pt. Jawaharlal Nehru or Dr. Babasaheb Ambedkar  – Who is more popular on Wikipedia?) नेहरू आणि आंबेडकर यांच्यापैकी कोणाच्या विकिपीडिया लेखाला जास्त वेळा वाचले जाते? ह्या प्रश्नाचे उत्तर आपण आज नेहरू जयंती दिनी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. अनेक लोक असे म्हणतात की, इतिहासाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अन्याय केला आहे, आणि बाबासाहेबांचे महत्त्व आज लोकांना कळते आहे जे त्यांच्या हयातीत कळले नाही. पूर्वी नेहरूंचा भारतीय राजकीय आणि समाज जीवनावर इतका प्रचंड प्रभाव होता की त्यामध्ये डॉ. आंबेडकरांसह इतर जवळपास सर्वच नेत्यांचे कर्तुत्व आणि कार्य खाली दबून गेले, किंवा बर्‍यापैकी दुर्लक्षित झाले.

जवाहरलाल नेहरू हे महात्मा गांधी यांच्या मृत्यूनंतर देशातील सर्वात शक्तिशाली राजकारणी बनले होते, आणि आपल्या मृत्यूपर्यंत ते या स्थानावर टिकून राहिले. त्यामुळे त्यांचा त्यावेळी तर देशाच्या राजकारणात मोठा प्रभाव होताच परंतु आज घडीलाही त्यांचा प्रभाव भारतीय राजकारणात आणि समाजजीवनात बघायला मिळतो. जवाहरलाल नेहरुंचा राजकीय पक्ष – काँग्रेस हा अनेक दशके सत्तेत होता. त्या माध्यमातून सुद्धा नेहरूंचे विचार जनमानसात रुजले आहेत. नेहरूंचा जन्मदिवस बाल दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो.

विकिपीडियावरील जवाहरलाल नेहरूंची प्रासंगिकता किंवा लोकप्रियता मोठी आहे. विकिपीडियाबद्दल प्राथमिक माहिती सांगायची झाली तर विकिपीडिया हा एक सर्वात मोठा आणि बहुभाषी ऑनलाइन मुक्त-विश्वकोश आहे, ज्यावर 5 कोटी 70 लाख पेक्षा जास्त लेख (आर्टिकल्स) उपलब्ध आहेत. आज रोजी विकिपीडिया हा वेगवेगळ्या 325 भाषांमध्ये (आवृत्त्यांमध्ये) उपलब्ध आहे, त्यापैकी सर्वात महत्त्वाची किंवा मोठी आवृत्ती ही इंग्लिश विकिपीडिया आहे. भारतात देखील इंग्लिश विकिपीडियाच सर्वात लोकप्रिय आहे. 20 पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये विकिपीडिया उपलब्ध आहे, यामध्ये हिंदी आणि तमिळ ह्या दोन भाषांमधील विकिपीडिया आघाडीवर आहेत.

जवाहरलाल नेहरूंचा इंग्लिश विकिपीडियावरील लेख हा त्यांच्या सर्व (135) विकिपीडियांवरील लेखांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहे. त्यानंतर हिंदी विकिपीडिया, तेलगु विकिपीडिया, मल्याळम विकिपीडिया आणि तमिळ विकिपीडिया या क्रमशः 5 विकिपीडियांवर ते सर्वाधिक लोकप्रिय आहेत, म्हणजेच यांवर त्यांचे चरित्रलेख सर्वाधिक वाचले गेले आहेत.

दुसरीकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 122 विकिपीडिया लेखांचा विचार करता त्यांचा इंग्लिश विकिपीडियावरील लेख हाच सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यानंतर हिंदी विकिपीडिया, मराठी विकिपीडिया, तमिळ विकिपीडिया आणि कन्नड विकिपीडिया यांचा क्रमांक लागतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंग्लिश विकिपीडिया वरील लेखाचे शीर्षक B. R. Ambedkar हे आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लेखाचे शीर्षक Jawaharlal Nehru हे आहे.

 

विकिपीडियावर कोण ‘जास्त’ लोकप्रिय – जवाहरलाल नेहरू की डॉ. बाबासाहेब आंबेडकर? (Nehru and Ambedkar) 

विकिपीडियावरील एखाद्या लेखाची लोकप्रियता कशी ठरवली जाते? तर ती अशी की, विकिपीडियावरील एखाद्या लेखाला (विकिपीडिया पेज किंवा प्रोफाइल ला) किती वेळा वाचले गेले आहे म्हणजे त्याला किती views (वाचकसंख्या) मिळाले आहे, त्यावरून त्या लेखाची लोकप्रियता ठरवली जाते.

नोव्हेंबर 2020 ते ऑक्टोबर 2021 या बारा महिन्यांत जवाहरलाल नेहरूंचा इंग्लिश विकिपीडियावरील लेख 24 लाख 36 हजार 807 वेळा वाचला (views) गेला होता. याच्या तुलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लेख 36 लाख 59 हजार 215 वेळा वाचला गेला आहे. या 12 महिन्यांपैकी केवळ एका नोव्हेंबर महिन्यातच नेहरूंच्या लेखाला डॉ. आंबेडकरांच्या लेखापेक्षा जास्त views मिळाले होते, तर बाकीच्या अकरा महिन्यांमध्ये बाबासाहेबांचा लेख वाचकसंख्येत नेहरूंच्या लेखापेक्षा आघाडीवर होता.

आपण अजून मागे जाऊन जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन्ही इंग्लिश विकिपीडियावरील लेखांची वाचकसंख्या (views) बघू. विकिपीडियावर जुलै 2015 पासून आकडेवारी उपलब्ध झालेली आहे. जुलै 2015 ते ऑक्टोबर 2021 या सहा वर्ष दोन महिन्यांच्या कालावधीत जवाहरलाल नेहरूंचा इंग्लिश विकिपीडियावरील चरित्रलेख 1 कोटी 65 लाख 24 हजार 410 वेळा वाचला गेला आणि 2019च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांच्या लेखाला इतर महिन्यांच्या तुलनेत सर्वोच्च व्ह्यूज (5 लाख 94 हजार 206) मिळाले होते.

तर दुसरीकडे याच कालावधीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इंग्लिश विकिपीडिया वरील लेख हा 1 कोटी 87 लाख 25 हजार 882 वेळा वाचला गेला होता आणि याच वर्षातील एप्रिल 2021 या महिन्यात बाबासाहेबांच्या लेखाला सर्वाधिक व्ह्यूज (7 लाख 93 हजार 832) मिळाले होते. इंग्लिश विकिपीडियावरील एका वर्षाच्या आकडेवारीनुसार हे लक्षात येईल की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जवाहरलाल नेहरूंपेक्षा 22 लाख+ व्ह्यूज मिळालेले आहेत.

आधीच वर सांगितल्याप्रमाणे विकिपीडिया हा जगभरातील वेगवेगळ्या 325 भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि जवाहरलाल नेहरू यांचे चरित्रलेख वेगवेगळ्या भाषेतील 135 विकिपीडियांवर तयार करण्यात आलेले आहेत, याच्या तुलनेत डॉ. बाबासाहेबांचे लेख केवळ 122 विकिपीडियांवर उपलब्ध आहे.

आज 13 विकिपीडियांवर नेहरूंचा लेख आंबेडकरांच्या चरित्रलेखापेक्षा अधिक आहे, याठिकाणी पंडित नेहरू बाबासाहेबांच्या पुढे आहेत. एखाद्या देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचे लेख प्रामुख्याने अधिकाधिक विकिपीडियांवर बनवले जातात. नोबेल विजेते व्यक्ती असल्यास सुद्धा असे होते. यामुळे त्यांची “उल्लेखनीयता” अधिक असते.

कोणत्या ‘भारतीय’ व्यक्तीचा लेख सर्वाधिक विकिपीडियांवर बनवला गेलेला आहे? हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे मी तुम्हाला उत्तर सांगतो – बुद्ध. होय, गौतम बुद्धांचा लेख सर्वाधिक विकिपीडियांवर बनवला गेलेला आहे, जो वेगवेगळ्या 200 विकिपीडियांवर उपलब्ध आहे. तर, नेहरू आणि आंबेडकर दोघांचेही चरित्रलेख टॉप 10 मध्ये आहेत.

या काही विख्यात भारतीय व्यक्ती, ज्यांचे लेख बहुतांश विकिपीडिया भाषांमध्ये लिहिलेले आहेत. (आकडेवारी अपडेट – जुलै 2023)

  1. गौतम बुद्ध – 200 wikipedias
  2.  महात्मा गांधी – 192
  3.  रवींद्रनाथ टागोर – 155
  4. सम्राट अशोक – 150
  5. बादशहा अकबर – 145
  6. जवाहरलाल नेहरू – 141
  7. नरेंद्र मोदी – 140
  8. मदर तेरेसा – 137
  9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर – 131
  10. कालिदास – 129
  11. इंदिरा गांधी – 126
  12. सत्यजीत रे – 118
  13. दलाई लामा – 116
  14. चाणक्य – 113
  15. अमिताभ बच्चन – 109
  16. शाहरुख खान – 108
  17. ऐश्वर्या राय – 108
  18. ब्रह्मगुप्त – 103
  19. सी व्ही रमन – 98
  20. प्रियंका चोपडा – 95
  21. नागार्जुन – 94
  22. श्रीनिवास रामानुजन – 94
  23. राजीव गाँधी – 94
  24. गुरुनानक – 92
  25. स्वामी विवेकानंद – 89

 

इंग्लिश विकिपीडियानंतर रशियन विकिपीडिया, फ्रेंच विकिपीडिया, जर्मन विकिपीडिया, जपानी विकिपीडिया व अरेबिक विकिपीडिया या क्रमशः पाच परदेशी विकिपीडियांवर नेहरुंचा लेख सर्वाधिक लोकप्रिय आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे इंग्लिश विकिपीडिया खेरीज जपानी विकिपीडिया, फ्रेंच विकिपीडिया, जर्मन विकिपीडिया, चिनी विकिपीडिया आणि रशियन विकिपीडिया ह्या क्रमशः 5 विकिपीडियावर सर्वाधिक प्रसिद्ध आहेत. (Nehru and Ambedkar)

 

नेहरू आणि आंबेडकर – बघा दोघांच्या views मधील फरक

1 जुलै 2015 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हिंदी विकिपीडियावर नेहरूंच्या लेखाला 29 लाख 49 हजार 595 वेळा पाहिले गेले आहे तर डॉ. बाबासाहेबांचा लेख 52 लाख 33 हजार 184 वेळा वाचला गेला आहे. हिंदी विकिपीडियावरील पहिल्या 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींमध्ये जवाहरलाल नेहरू नवव्या स्थानी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या स्थानी येतात. (टॉप-20 प्रसिद्ध व्यक्तींची यादी बघा)

कालावधी

पं. नेहरूंना मिळालेले views

डॉ. आंबेडकरांना मिळालेले views

जुलै 2015 ते डिसेंबर 2015

1,31,872

2,07,386

जानेवारी 2016 ते डिसेंबर 2020

24,91,837

41,43,173

जनवरी 2021 ते ऑक्टोंबर 2021

3,26,186

8,82,625

जुलै 2015 ते ऑक्टोंबर 2021

29,49,895

52,33,184

हिंदी विकिपीडियावरील वीस सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींमध्ये जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लेख वेगवेगळ्या वर्षांमध्ये किती वेळा वाचले गेले आणि त्यांची टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये कितवी रँक राहिली याची माहिती आपण बघू. 2015च्या जुलै ते डिसेंबर महिन्यामध्ये जवाहरलाल नेहरूंचा लेख 1 लाख 31 हजार 872 वेळा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लेख 2 लाख 7 हजार 386 वेळा वाचला गेला होता. त्यानंतरचे वर्ष 2016 मध्ये नेहरूंचा लेख टॉप-20 मध्ये 11व्या स्थानी राहिला आणि त्याला 3 लाख 1 हजार 723 व्ह्यूज मिळाले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखाला 6 लाख 72 हजार 20 व्ह्यूज मिळाले, आणि दुसऱ्या क्रमांकावर होता. 2017 मध्ये नेहरूंना 4,77,883 वेळा वाचले गेले आणि त्यांची रँक आठवी राहिली तर दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकर यांना 7,12,876 वेळा वाचले गेले व ते तिसऱ्या स्थानावर राहिले. 2018 मध्ये नेहरूंचा लेख परत आठव्या स्थानावर राहिला आणि त्यांना 5 लाख 72 हजार 81 वेळा वाचले गेले, तर बाबासाहेबांच्या लेखांना 8 लाख 72 हजार 285 व्ह्यूज मिळाले आणि ते चौथ्या रँकवर राहिले.

नंतरचे वर्ष 2019 मध्ये दोघांच्याही रँकमध्ये सुधारणा झाली. नेहरू सहाव्या स्थानी तर बाबासाहेब आंबेडकर तिसऱ्या स्थानी होते. यावर्षी बाबासाहेब आंबेडकरांना जवळजवळ 10 लाख वेळा (9,99, 873) वाचले गेले, तर 7 लाख 68 हजार 942 वेळा नेहरूंचा लेख वाचला गेला. 2020 मध्ये कोरोना काळ होता, त्यामुळे दोघांच्याही लेखांना 2019 च्या तुलनेत कमी वेळा वाचले गेले, मात्र तरीही डॉक्टर आंबेडकर यांच्या वरील रँकमध्ये सुधारणा झाली तर नेहरूंच्या रँक मध्ये प्रचंड घसरण पाहण्यात आले.

या वर्षी टॉप 20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये पंडित नेहरू 19व्या स्थानावर होते आणि त्यांना 3 लाख 71 हजार 208 वेळा वाचले गेले तर दुसरीकडे डॉक्टर आंबेडकर दुसऱ्या स्थानावर होते आणि त्यांना 8 लाख 86 हजार 119 वेळा वाचले गेले. 2021 या वर्षातील जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यामध्ये जवाहरलाल नेहरू यांचा लेख 3,46,186 इतक्या वेळा वाचला गेला तर बाबासाहेबांचा लेख हा 8,82,625 इतक्या वेळा वाचला गेला. एकंदरीत 1 जुलै 2015 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हिंदी विकिपीडियावर नेहरूंच्या लेखाला 29 लाख 49 हजार 595 वेळा पाहिले गेले आहे तर डॉ. बाबासाहेबांचा लेख 52 लाख 33 हजार 184 वेळा वाचला गेला आहे. 

आपण वर हिंदी विकिपीडियावरील लोकप्रिय व्यक्तीमध्ये नेहरू आणि आंबेडकर यांचे स्थान बघितले आता आपण मराठी विकिपीडिया मध्ये दोघांची रँक बघू. मराठी विकिपीडिया वरील 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींची आकडेवारी पाहिली तर त्यामध्ये 17व्या स्थानी जवाहरलाल नेहरू येतात तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दुसऱ्या स्थानी येतात (20 व्यक्ती लोकप्रिय व्यक्तींची यादी) हिंदी आणि मराठी विकिपीडिया प्रमाणेच बहुतांश भारतीय भाषांमधील विकिपीडियांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लेख जवाहरलाल नेहरूंच्या लेखापेक्षा जास्त वाचला जातो.

 

या लेखामध्ये आपण नेहरू आणि आंबेडकर (Nehru and Ambedkar) यांच्या संदर्भातील माहिती प्रामुख्याने इंग्लिश विकिपीडिया, हिंदी विकिपीडिया आणि मराठी विकिपीडिया या तिन्हींची माहिती बघितली आहे.

जवाहरलाल नेहरूंची विकिपीडियावरील लोकप्रियता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा कमी असली तरी ते इंदिरा गांधी, सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर,स्वामी विवेकानंद, भगतसिंग, शिवाजी महाराज, मोहम्मद अली जिना व वल्लभभाई पटेल यासारख्या अनेक उल्लेखनीय आणि प्रसिद्ध व्यक्तींपेक्षा इंग्लिश विकिपीडियावर जास्त लोकप्रिय आहेत किंवा त्यांचा लेख यांच्यापेक्षा जास्त वेळा वाचला गेला आहे.

 

हे ही वाचलंत का?

मराठी व हिंदी विकिपीडिया वरील सर्व वर्षांतील 20 प्रसिद्ध व्यक्ती

 


मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी उजवीकडील खालील बाजूस असणाऱ्या bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)