आदर्श शिक्षक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आदर्श शिक्षक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आदर्श शिक्षक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जे कुणी ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

आदर्श शिक्षक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

विद्या ही जीवन जगण्याची, जीवनाला आकार देण्याची हातोटी आहे, मानवाच्या कल्याणाचा मार्ग ज्ञान हाच आहे. म्हणून कुठल्याही परिस्थितीत प्रत्येकाने शिक्षण मिळवले पाहिजे, मग ती स्त्री असो वा तो पुरुष असो, प्रत्येकाने शिक्षण हे घेतलेच पाहिजे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते.

बाबासाहेबांचे ठाम मत होते की, शिक्षण ही कोणा एका वर्गाची किंवा एका समाजाची मक्तेदारी नाही, शिक्षण घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. म्हणूनच, त्यांनी संपूर्ण आयुष्य देशातील शूद्र अतिशूद्र म्हणून गणल्या जाणाऱ्यांच्या शिक्षणासाठी तसेच स्त्री शिक्षणासाठी लढा दिला.

शिक्षण हेच प्रगतीचे साधन आहे हे बाबासाहेबांनी हेरले होते. बाबासाहेबांनी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये शिक्षण घेतले, यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी कोलंबिया विद्यापीठ, गेज इन सारख्या परदेशी शिक्षण संस्थांमधूनही ज्ञानार्जन केले.

शिक्षणच क्रांती घडवू शकते हे बाबासाहेबांनी ओळखले होते. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय या मूल्यांवर आधारित देश घडवायचा असेल तर शैक्षणिक क्रांती घडली पाहिजे असे बाबासाहेबांना वाटत होते. बाबासाहेब म्हणतात, ‘उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस हतबल होतो आणि अल्पायुषी होतो, अगदी तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतवणीच दुसऱ्यांचा गुलाम होतो.’

शिक्षण प्रसारासाठी बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मिलिंद कॉलेज व सिद्धार्थ कॉलेज, डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी, द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट, अश्या अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या.

गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून अनेक वसतिगृह बाबासाहेबांनी स्थापन केले. शिक्षण सक्तीचे करा, अशी मागणीही बाबासाहेबांनी शासनाकडे केली. विद्या ही एखाद्या महासागरासारखी आहे. व्यक्तीने जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी चोवीस तास विद्देची साधना करावी, असे ते म्हणत असत.

बाबासाहेब म्हणाले होते, “शिक्षण म्हणजे व्यक्तीचा मानसिक व बौद्धिक विकास करून आणणारे, सामाजिक गुलामगिरी नष्ट करणारे, आर्थिक विकास साधण्याचे व राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याचे शास्त्र आहे.” ते असेही म्हणतात की, “शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे. ते एक राष्ट्रीयतेचे, मानवतेचे, व अज्ञान दूर करण्याचे उदात्त कार्य आहे.”

१५ जून १९५० रोजी बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय स्थापन केले. तेव्हा ते आपल्या भाषणात म्हणतात की, “मिलिंद हा एक ग्रीक राजा होता. तो विद्वानही होता. नागसेन या बौद्ध भिक्खू सोबत त्याने वादविवाद केला. त्यामध्ये नागसेन विजयी झाला. ‘मिलिंद प्रश्न’ नावाचा बौद्ध साहित्यात महान ग्रंथ आहे. शिक्षकांच्या अंगी कोणते गुण असले पाहिजे, हे देखील त्यात सांगितले आहे. म्हणून या कॉलेजला मिलिंद कॉलेज व या जागेला नागसेनवन असे नाव दिले आहे.”

१ सप्टेंबर १९५१ ला बाबासाहेबांनी मिलिंद विद्यालयाच्या इमारतीची कोनशीला भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते बसविली. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की, “हिंदू समाजाच्या अगदी खालच्या थरातून आल्यामुळे शिक्षणाचे किती महत्त्व आहे हे मी समजतो. हिंदुस्तानातील दलित समाजाची उन्नती करणे म्हणजे त्यांच्या अन्न, वस्त्र, निवार्‍याची सोय करून पूर्वीप्रमाणेच त्यांना उच्चवर्णीयांची सेवा करावयास लावणे नव्हे. खालच्या वर्गाची ज्यांच्यामुळे प्रगती खुंटून त्यांना दुसऱ्याचे गुलाम व्हावे लागले तो न्यूनगंड त्यांच्यातून काढून नाहीसा करणे हा खरा प्रश्न आहे. आमच्या सर्व सामाजिक दुखण्यावर माझ्या मताप्रमाणे शिक्षण हेच औषध आहे.”

मुंबईतील सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या सरकारी महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकपदी १० नोव्हेंबर १९१८ रोजी बाबासाहेबांची नेमणूक झाली. सुरुवातीला महार शिक्षक म्हणून काही विद्यार्थी त्यांचा तिरस्कार करत होते. पण बाबासाहेबांचे अथांग ज्ञान पाहून ते आश्चर्यचकित झाले.

डॉ. आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी त्यांचे विद्यार्थी प्रभावित होत असत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यांचे लेक्चर्स ऐकण्यासाठी अन्य महाविद्यालयांचेही विद्यार्थी वर्गात येऊन बसत असत.

थोर शिक्षक महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्याप्रमाणे बाबासाहेबांनी ज्ञानदानाचे महान कार्य केले. देशातल्या प्रत्येक घटकातल्या माणसापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे व सर्व शिक्षित झाले पाहिजे. देश शिक्षित झाला पाहिजे, असे स्वप्न उरी बाळगणारे व त्यासाठी झगडणारे महान व आदर्श शिक्षक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते..!

आकांक्षा साळवे, सॉफ्टवेअर इंजिनियर, मुंबई


शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा लेख लिहिला गेला आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. 

तसेच तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये किंवा ई-मेलद्वारे लिहून आवर्जून कळवावे. धन्यवाद.


हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *