डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्माविषयी दृष्टिकोन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्व प्रमुख धर्मांचा सखोल अभ्यास केला. अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलेल्या बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, आणि बुद्धांच्या भूमीत बौद्धधम्माचे पुनरुत्थान केले. आज आपण बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्माविषयीचा दृष्टिकोन समजून घेणार आहोत. ख्रिश्चन धर्म, इस्लाम, यहुदी धर्म, जैन धर्म, शीख धर्म यासारखे अनेक पर्याय असताना देखील बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचाच स्वीकार का केला, हेही आपल्याला कळेल.

Dr Babasaheb Ambedkar’s view on Buddhism

Dr. Babasaheb Ambedkar's view on Buddhism
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्माविषयी दृष्टिकोन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धर्माविषयी दृष्टिकोन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मात जन्म घेतला होता. त्यांनी अस्पृश्योद्धाराची सुरु केली व त्यांना या चळवळीच्या दरम्यान जे अनुभव आले त्यामुळे त्यांच्या हिंदू धर्माविषयी असलेल्या मतात आमूलाग्र बदल झाला. हिंदू धर्मात व्यक्तीला स्थान नाही तसेच हिंदू धर्माने कर्तव्याची विभागणी केलेली आहे व परिणामतः हिंदू धर्माने दलितांवर, शुद्रांवर, सामाजिक व बौद्धिक गुलामगिरी लादली, त्यांना अन्यायकारक वागणूक दिली. मूलभूत हक्कांपासून अस्पृश्य समाजाला वंचित ठेवण्यात आले, हिंदू धर्मातील स्पृश्य समाजाने अस्पृश्य समाजाचा तेजोभंग केला, त्याची विटंबना केली. हिंदू धर्मात राहून न्याय्य वागणूक, सामाजिक प्रतिष्ठा मिळणार नाही हे ओळखूनच त्यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला. विविध धर्मांचा तौलनिक अभ्यास करून बौद्ध धर्मच व्यक्तिविकासाला व सामाजिक समतेला पोषक आहे अशी त्यांची खात्री पटली होती.

प्रमुख धर्मांवरील त्यांच्या तीक्ष्ण टीकेमुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनेकदा धर्माविरुद्ध समजले जाते, परंतु ते धार्मिक वा आध्यात्मिक प्रवृत्तीच्या व्यक्ती होते आणि सार्वजनिक जीवनात धर्माचे महत्त्वाप्रती जागृत होते. इतर धर्मांपेक्षा बौद्ध धर्माच्या श्रेष्ठतेबद्दलचे त्यांचे मत सर्वज्ञात असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचा मार्ग हा मार्क्सवाद या प्रबळ धर्म नाकारणाऱ्या तत्त्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ मानला.

 

बौद्ध धर्माविषयी बाबासाहेबांचा दृष्टिकोन :

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेला बौद्ध धर्म आणि पारंपरिक बौद्ध धर्म यात बराच फरक आहे. डॉ. आंबेडकरांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म‘ या पुस्तकात त्यांनी ‘धर्म आणि धम्म’ या दोन्ही गोष्टीतील फरक स्पष्ट केलेला आहे. धर्म ही व्यक्तिगत बाब असून तो प्रत्येकाने स्वतःपुरताच ठेवावा, या उलट ‘धम्म’ ही एक सामाजिक संकल्पना आहे. मूलतः आणि तत्त्वतः धम्म हा सामाजिक तसेच सार्वजनिक आहे. कोणत्याही एका व्यक्तीला धम्माची आवश्यकता नसते. माणसा-माणसांतील व्यवहार उचित ठेवणे याला धम्म असे म्हटले जाते. धम्माशिवाय समाजधारणाच होऊ शकत नाही, समाजधारणेसाठी की नीती आवश्यक असते ती पवित्र व सार्वत्रिक स्वरुपाची नीती म्हणजे धम्म होय.

 

तर्कवादी व विज्ञाननिष्ठ

बौद्ध धर्मातील तार्किकता आणि विज्ञानवाद या विज्ञाननिष्ठ बाबी बाबासाहेब आंबेडकरांना फार महत्त्वाच्या वाटल्या. बुद्ध आणि त्यांचा धम्म हे आपल्या ग्रंथाच्या प्रस्तावने त्यांनी लिहिले आहे की विज्ञान मानणाऱ्या व्यक्तीला जर कोणता धर्म हवा असेल तर तो केवळ बौद्ध धर्मच आहे. बुद्ध धर्माइतके तर्कशुद्ध विचार आणि विज्ञान निष्ठत्व इतर कोणत्याही धर्मात आढळत नाही.

 

भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भवितव्य

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भवितव्य हा लेख महाबोधी मासिकाच्या एप्रिल-मे 1950 च्या अंकात प्रकाशित झाला होता. 1892 मध्ये अनागरिक धम्मपाल यांनी स्थापन केलेले महाबोधि मासिकपत्र हे त्यावेळी बौद्ध धम्मावरील इंग्लिश भाषेत प्रकाशित होणाऱ्या बौद्ध मासिकांमध्ये सर्वात महत्त्वाचे मासिक होते. त्याचे वितरण जगभराच्या इंग्लिश जाणणाऱ्या बौद्धांमध्ये होत असे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा लेख 6500 शब्दांचा होता.

त्यांनी लेखाचे पाच क्रमांक देऊन ‘भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भवितव्य’ लेखाचे विभाजन केलेले आहे आणि त्यापैकी प्रत्येक विभागात वैशिष्ट्यपूर्ण विषय आलेला आहे. पहिल्या भागात बुद्ध हे अन्य तीन मोठ्या धर्मांच्या संस्थापकांपेक्षा कशामुळे वेगळे आणि श्रेष्ठ ठरतात हे दाखवून दिले आहे; दुसऱ्या भागात – जो सर्वांत मोठा आहे – त्यांनी बौद्धधम्माची हिंदुधर्माबरोबर तुलना केलेली आहे; तिसऱ्या भागात त्यांनी भारतात बौद्धधम्माचे पुनरुज्जीवन होईल अशी आशा व्यक्त केलेली आहे. चौथ्या भागात हिंदू धर्माव्यतिरिक्त अन्य धर्मांच्या तुलनेत बौद्धधम्म कसा महत्त्वाचा ठरतो याचा सारांश त्यांनी दिलेला आहे. आणि पाचव्या भागात, बौद्धधम्माच्या आदर्शाचा प्रचार-प्रसार साध्य करण्यासाठी कोणती तीन पावले उचलली पाहिजेत याची रूपरेखा दिलेली आहे.

बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्माविषयीचा दृष्टिकोन

 

ईश्वर संकल्पनेचा अभाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या ‘भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भवितव्य’ या लेखामध्ये म्हणतात की, गौतम बुद्ध स्वतःला माणूस समजतो. तो स्वतःला परमेश्वराचा अवतार किंवा त्याचा पुत्र मानीत नाही. तसेच बौद्ध धर्मात ईश्वर ही संकल्पना नाही. बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानानुसार विश्व हे स्वयंभू असून ते कार्यकारणभावाच्या नियमानुसार चालते. मात्र खिश्चन धर्मात येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र मानला जातो. तसेच हिंदू धर्मात कृष्ण हा स्वतःला देवांचा देव ‘परमेश्वर’ मानतो. मात्र गौतम बुद्धाने आपण स्वतः देव किंवा देवाचा पुत्र आहोत असा दावा केलेला नाही. ‘मी मोक्षदाता नसून केवळ मार्गदाता आहे’ असे सांगून गौतम बुद्धाने ‘माझे विचार पटले तरच तुम्ही ते स्वीकारा’ असे सांगितले आहे. बौद्धाची शिकवण व तत्त्वज्ञान यांचा आंबेडकरांवर मोठा प्रभाव पडला व त्यांची इतर कोणत्याही धर्मापेक्षा बौद्ध धर्मच अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी उपयुक्त आहे याची खात्री पटली.

 

माणूस हा धर्माचा केंद्रबिंदू

बौद्ध धर्म हा मानवतावादी धर्म असून ‘माणूस’ हाच या धर्माचा केंद्रबिंदू आहे. बौद्ध धर्माचा पाया नीतीमत्तेवर आधारलेला आहे. बुद्धाची शिकवण ही नैतिक आहे. एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीबरोबर कसे वागावे याचे काही नियम त्यांनी सांगितलेले आहेत. बौद्ध धर्म सदाचार, नीति यावर आधारलेला आहे. प्रज्ञा, शील, मैत्री व करुणा ही बौद्ध धर्माची मूलतत्त्वे आहेत. मानवाची दुःखे नष्ट करण्यासाठी गौतम बुद्धाने सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक् वाणी, सम्यक् कर्म, सम्यक् आजीविका, सम्यक् प्रयत्न, सम्यक् स्मृती आणि सम्यक समाधी असा अष्टांग मार्ग सांगितलेला आहे. मानवाने आपल्या वासनेवर विजय मिळविला पाहिजे. सुखोपभोगाच्या मागे न लागता मानवाने उपभोग व कायाक्लेश यांना त्याज्य मानून निर्वाण प्राप्तीसाठी मध्यम मार्ग स्वीकारला पाहिजे असे बौद्ध धर्मात स्पष्ट सांगितलेले असल्याने बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाचा डॉ. आंबेडकरांवर प्रचंड प्रभाव पडला व सहाजिकच ते बौद्ध धर्माकडे आकर्षिले गेले.

 

स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचा पुरस्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचा पुरस्कार करणारे होते. डॉ. आंबेडकरांच्या मते बौद्ध धर्माने स्वातंत्र्य, समता व बंधुता या मानवी मूल्यांचा स्वीकार केलेला आहे तसेच हिंदू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मात कर्मकांड, जातिभेद, उच्च-नीचता यांना स्थान नाही. बौद्ध धर्म हा बुद्धिनिष्ठ आहे, विज्ञाननिष्ठ आहे. जगात दुःख आहे ही मूलभूत संकल्पना बौद्ध धर्मात आढळते. जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू ही दुःखाची नैसर्गिक कारणे आहेत व ती कोणालाही नष्ट करता येणार नाहीत. गौतम बुद्धाने ज्या दुःखाचा विचार केला ते दुःख नैसर्गिक कारणांमुळे निर्माण झालेले नसून सामाजिक कारणांमुळे निर्माण झालेले आहेत. सामाजिक अन्याय, विषमता, संघर्ष ही दुःखाची मूळ कारणे आहेत व ती कोणत्या मागनि नष्ट करायची याचा मार्ग फक्त गौतम बुद्धानेच सांगितलेला आहे असे मत आंबेडकरांनी व्यक्त केलेले आहे. साहजिकच गौतम बुद्धाने सामाजिक अन्याय, विषमता व दुःख यांचा नाश करण्यासाठी जे उपाय सांगितले त्याचा आंबेडकरांवर मोठा प्रभाव पडला. भारतातील अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी, त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी बौद्ध धर्मच योग्य आहे अशी त्यांची खात्री पटली व ते बौद्ध धर्माकडे आकर्षिले गेले‌‌.

 

समारोप 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून हिंदू धर्माला पर्याय म्हणून केलेला नाही. अनेक धर्माचा तौलनिक दृष्टिकोनातून अभ्यास केला, प्रत्येक धर्माच्या तत्त्वज्ञानाचे सखोल चिंतन केले व अनेक धर्मांपेक्षा बौद्ध धर्म हा सर्वसमावेशक आहे सर्वश्रेष्ठ आहे, अशी त्यांची खात्री पटली व त्यांनी अस्पृश्य समाजाच्या पुनरुत्थानासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्माविषयीचा दृष्टिकोन


हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *