प्रकाश आंबेडकर यांचे जीवन चरित्र आणि राजकीय कारकीर्द

प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातील एक दिग्गज राजकीय नेते आणि माजी खासदार आहेत. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. आपल्या आजोबा नंतर आंबेडकर घराण्यातील सर्वाधिक यशस्वी राजकीय व्यक्ती असलेल्या प्रकाश आंबेडकर यांची राजकीय क्षेत्रातील कामगिरी आणि संपूर्ण राजकीय कारकीर्द आपण जाणून घेणार आहोत.

प्रकाश आंबेडकर यांची राजकीय क्षेत्रातील कामगिरी - Political achievements of Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर यांची राजकीय क्षेत्रातील कामगिरी – Political achievements of Prakash Ambedkar

प्रकाश आंबेडकर यांची राजकीय कामगिरी अर्थात त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास महत्त्वपूर्ण आहे. 68 वर्षीय एडवोकेट प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी विविध राजकीय पदे भूषवलेली आहेत आणि अनेक सामाजिक व राजकीय कामे केलेली आहेत. ते आजही एक सक्रिय आणि आघाडीचे राजकीय नेते असून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आहेत.

 प्रकाश यशवंत आंबेडकर

जन्म

10 मई 1954 (मुंबई)

व्यवसाय

राजनीतिज्ञ, वकील एवं सामाजिक कार्यकर्ता

शिक्षा

  • सेंट स्टैनिस्लॉस हाई स्कूल, मुंबई

  • सिद्धार्थ कॉलेज ऑफ़ आर्ट्स, मुंबई (BA)

  • सिद्धार्थ कॉलेज ऑफ़ लॉ, मुंबई (LLB)

उपनाम

बालासाहब आंबेडकर

धर्म

माता-पिता

मीरा आंबेडकर एवं यशवंत भीमराव आंबेडकर

पत्नी

अंजली आंबेडकर (विवाह : 1993)

संतान

सुजात (बेटा)

राजनीतिक पार्टी

  • वंचित बहुजन आघाडी (2019 से)

  • भारिप बहुजन महासंघ (1994 – 2019)

  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (1994 से पहले; 1998 - 1999)

सांसद (MP)

  • लोक सभा सदस्य (1999 – 2004)

  • लोक सभा सदस्य (1998 – 1999)

  • राज्य सभा सदस्य (1990 – 1996)

भाषाएं

मराठी, हिंदी और अंग्रेजी

पता

यशवंत निवास, कवराम सोसायटी, अकोला- 444001

ई-मेल

वेबसाईट

प्रकाश आंबेडकर यांची राजकीय क्षेत्रातील कामगिरी जाणून घेण्यापूर्वी आपण त्यांची कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी सुद्धा जाणून घेऊ.

कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी

प्रकाश यशवंत आंबेडकर हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि वकील आहेत. ते वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणूनही आंबेडकरी चळवळीतील महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत. ते भारतातील 12व्या आणि 13व्या लोकसभा अकोला मतदारसंघाचे सदस्य होते. त्यांनी भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहात काम केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांचा जन्म 10 मे 1954 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे ‘प्रकाश’ हे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठेवल्याचे सांगितले जाते. 1972 मध्ये त्यांनी मुंबईच्या सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूलमधून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. 1978 मध्ये, त्यांनी सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्समधून बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) केले आणि 1981 मध्ये त्यांनी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉमध्ये बॅचलर ऑफ लॉ (एलएलबी) केले.

प्रकाश आंबेडकर हे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचे ज्येष्ठ नातू आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव यशवंत आंबेडकर (भैय्यासाहेब) आणि आईचे नाव मीरा आहे. भैय्यासाहेबांचे निधन 1977 मध्ये झालेले आहे तर त्यांच्या आई अजूनही हयात आहेत, आणि भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा आहेत. प्रकाश आंबेडकरांना दोन धाकटे भाऊ भीमराव आणि आनंदराज, आणि एक धाकटी बहीण रमाबाई असून त्यांचा विवाह आनंद तेलतुंबडे यांच्याशी झाला आहे. प्रकाश आंबेडकर यांचा विवाह अंजली मायदेव यांच्याशी झाला असून त्यांना सुजात हा एकुलता एक मुलगा आहे.

Dr BR Aambedkar family tree
Aambedkar family tree

प्रकाश आंबेडकर यांची राजकीय क्षेत्रातील कामगिरी

सुरुवातीला प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांच्या संकल्पनेतून 1957 मध्ये स्थापना झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षामध्ये कार्यरत होते. 1994 च्या पूर्वी याच पक्षामध्ये त्यांचे राजकारण सुरु होते.

4 जुलै 1994 रोजी प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ या राजकीय स्थापना केली. हा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मधून फुटून बनलेल्या अनेक गटांपैकी एक होता. भारिप बहुजन महासंघाने अकोला नगरपालिका निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष अशा प्रस्थापित राजकीय पक्षांशी लढत जिंकली.

प्रकाश आंबेडकरांनी आणलेल्या नवीन सोशल इंजिनीअरिंगच्या माध्यमातून हे यश मिळाले, जे नंतर ‘अकोला पॅटर्न’ म्हणून ओळखले गेले. 1995 नंतर पक्षाचा विस्तार सुरूच राहिला, काही दलितेतर पक्ष आणि संघटना भारिप बहुजन महासंघात सामील झाल्या.

बाळासाहेब आंबेडकर हे 1990 – 1996 दरम्यान भारतीय संसदेचे वरिष्ठ सदन असलेल्या राज्यसभेचे सदस्य (खासदार) झाले. यानंतर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जवळपास सर्व गट एकत्र आले आणि त्यांनी ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (युनायटेड)’ नावाखाली युती केली.

याच माध्यमातून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार म्हणून प्रकाश आंबेडकर 1998 मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघातून 12 व्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले. 1999 मध्ये त्याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा ते 13व्या लोकसभा निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार म्हणून निवडून आले आणि ते 2004 पर्यंत लोकसभेचे सदस्य (खासदार) होते.

प्रकाश आंबेडकर हे 1990 ते 1996, 1998 ते 1999, आणि 1999 ते 2004 या कालावधीमध्ये खासदार राहिले. त्यानंतरही त्यांनी अनेक लोकसभा निवडणुका लढवल्या मात्र त्यांना यश मिळाले नाही.

बाळासाहेब आंबेडकरांनी एकीकडे दलितांचे पुनर्गठन करण्याचे धोरण अवलंबले आणि दुसरीकडे दलितांबद्दल सहानुभूती असलेल्या विरोधी पक्षांशी युती करण्याचा एक मध्यम मार्ग अवलंबला. त्यांच्या पाठिंब्यानेच त्यांनी दोनदा बिगर राखीव मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. निवडून येण्यात ते यशस्वी झाले नसले तरी दोन्ही प्रसंगी त्यांना मोठ्या प्रमाणात मते मिळाली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने अर्थात आरपीआयने आपल्या मागण्या मांडण्यासाठी नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढला, ज्यात त्यांच्या दलित शेतकऱ्यांच्या वतन जमिनींचे हस्तांतरण करणे ही प्रमुख मागणी होती. ब्रिटिश राजवटीच्या आधी आणि नंतरही, काही जमिनी लोकांना सरकार किंवा समाजाला किंवा दोन्हीसाठी दिलेल्या सेवांसाठी दिल्या जात होत्या. या जमिनींना स्थानिक कायद्यात “वतन जमीन” असेही म्हणतात आणि महाराष्ट्रातील अनेक वतन 1950 ते 1960 च्या दरम्यान रद्द करण्यात आले. या मोर्चाला प्रतिसाद म्हणून, महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली ज्यात प्रकाश आंबेडकर सदस्य होते. ही प्रकाश आंबेडकर यांची एक महत्त्वपूर्ण राजकीय कामगिरी होती.

prakash-ambedkar
prakash-ambedkar

रिडल्स आंदोलन

RPI ला सर्वात मोठे यश 1988 मध्ये मिळाले जेव्हा प्रकाश आंबेडकरांनी इतर दलित संघटनांसोबत एकत्र येऊन मुंबईत मोठा मोर्चा काढला, प्रचंड निदर्शने केली. याचे निमित्त होते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘रिडल्स ऑफ हिंदूइझम’ नावाच्या पुस्तकातील भाग अधिकृत प्रकाशनातून हटवण्याच्या हालचालींबाबत हे आंदोलन केले गेले होते.

काही लोकांनी पुस्तकातील काही भाग हटवण्याची मागणी केली होती आणि महाराष्ट्र सरकार त्या दृष्टीने सदर मजकूर कृती करत होती, मात्र डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांना ही गोष्ट मुळीच पटणारी नव्हती. ‘रिडल्स ऑफ हिंदूइझम’ ग्रंथाबद्दल हे आंदोलन असल्यामुळे ‘रिडल्स आंदोलन’ म्हणून ओळखले जाते.

बाबासाहेबांच्या पुस्तकातील भाग हटवण्याच्या या निर्णयाला शिवसेनेने पाठिंबा दिला होता, जी यावेळी हिंदू राजकीय संघटना म्हणून उदयास येत होती. पुस्तकातील भाग हटवला जाऊ नये या उद्देशासाठी सर्व दलित संघटनांना एकत्र आणण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी ‘आंबेडकर विचार संवर्धक समिती’ (AVSS) स्थापन केली.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि इतर हिंदुत्ववादी कट्टरपंथी लोकांनी रिडल्स ऑफ हिंदुइझम पुस्तकाच्या प्रति जाळल्या होत्या.

5 फेब्रुवारी 1988 रोजी प्रकाश आंबेडकर, रा. सु. गवई आणि इतरांच्या नेतृत्वाखाली दलितांनी मोठ्या ताकदीचे प्रदर्शन केले. या मोर्चात सहभागी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाच लाखांहून अधिक अनुयायी महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच गुजरात आणि इतर राज्यांतून मुंबई शहराच्या मध्यभागी आले होते.

मुंबईतील दलित निदर्शनानंतर काही दिवसांतच शिवसेना, मराठा महासंघ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विविध गट आणि दलित पँथर्सच्या प्रतिनिधींच्या 10 फेब्रुवारीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत ‘रिडल्स’चा प्रश्न सोडवण्यात आला.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाच्या चौथ्या खंडात संबंधित परिशिष्ट कायम ठेवण्यात येईल, असे बैठकीत मान्य करण्यात आले; आणि “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू देवतांबद्दलच्या टिप्पण्यांशी महाराष्ट्र सरकार सहमत असेलच असे नाही” फक्त ही एक ओळ त्यात जोडली जाईल.

रिडल्स आंदोलनामधील प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही त्यांची एक महत्त्वपूर्ण राजकीय कामगिरी ठरली.

 

भारिप बहुजन महासंघ

प्रकाश आंबेडकर यांनी 4 जुलै 1994 रोजी स्थापन केलेल्या भारिप बहुजन महासंघ या पक्षाने खासदार आणि आमदार निर्माण केले होते.

बहुजन महासंघ, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या निकट सहकार्याने काम करणारी एक राजकीय रचना फेब्रुवारी 1993 मध्ये स्थापन करण्यात आली. त्या वर्षाच्या उन्हाळ्यात, या पक्षाच्या उमेदवाराने नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभेची जागा जिंकून काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला.

भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन महासंघ यांच्यातील युतीने दलित आणि ओबीसींच्या संयुक्त आघाडीची कल्पना केली ज्यांची सांस्कृतिक ओळख मूलत: ब्राह्मणेतर होती. बहुजन महासंघाने असा युक्तिवाद केला की ब्राह्मणी समाजव्यवस्थेत दलित आणि ओबीसी हे दोघेही सांस्कृतिकदृष्ट्या समान अत्याचारित असल्याचे दिसून येते.

बहुजन महासंघाने ‘बहुजन’ या श्रेणीमध्ये बौद्ध, शीख, जैन आणि मुस्लिम, तसेच ओबीसी आणि दलित, आदिवासी, महिला, गरीब मराठा आणि गरीब ब्राह्मण यांसारख्या जाती गटांचा समावेश केला आहे. अशा प्रकारे ‘बहुजन’ वर्गामध्ये त्या सर्वांचा समावेश होतो ज्यांचे जात, वर्ग आणि लिंग या गोष्टींच्या आधारे शोषण केले जाते.

The performance of Bharip Bahujan Mahasang and Vanchit Bahujan Aaghadi in the Lok Sabha elections
प्रकाश आंबेडकर यांची राजकीय क्षेत्रातील कामगिरी – महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील कामगिरी

प्रकाश आंबेडकर यांची राजकीय क्षेत्रातील कामगिरी आणि निवडणुका

भारिप बहुजन महासंघाच्या टिकिटावर निवडून आलेले उमेदवार खालीलप्रमाणे आहेत.

लोकसभा : 1999 मध्ये, प्रकाश आंबेडकर हे 13व्या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडूण आले होते. भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर निवडून आलेले ते एकमेव खासदार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा : भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर महाराष्ट्राच्या विधानसभेवर अनेक उमेदवार निवडून आलेले आहेत.

  • 1999 मध्ये, 10व्या महाराष्ट्र विधानसभेवर रामदास मणिराम बोडखे (अकोट), दर्शन मोतीराम भांडे (बोरगाव मंजू) आणि वसंत धोडा सूर्यवंशी (साक्री) हे तीन सदस्य निवडून गेले होते.
  • 2004 मध्ये, 11व्या महाराष्ट्र विधानसभेवर भडे हरिदास पंढरी (बोरगाव मंजू) हे एकमेव उमेदवार निवडून गेले होते.
  • 2009 मध्ये, 12व्या महाराष्ट्र विधानसभेवर हरिदास पंढरी भदे (अकोला पूर्व) हे एकमेव उमेदवार निवडून आले होते.
  • पुढे 2014 मध्ये, 13व्या महाराष्ट्र विधानसभेवर बळीराम सिरस्कर (बाळापूर) हे एकमेव उमेदवार निवडून गेले होते.

पुढील 2019 च्या 14व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भारिप बहुजन महासंघ ‘वंचित बहुजन आघाडी’मध्ये विलीन करण्यात आला. 2019 मध्ये, 14व्या महाराष्ट्र विधानसभेवर वंचित बहुजन आघाडी अनेक जागांवर लढली, मात्र एकही उमेदवार निवडून आला नाही.

 

भीमा कोरेगावची हिंसा आणि महाराष्ट्र बंद

2019 च्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी भीमा कोरेगाव येथे हिंसा झाली होती.

कोरेगावच्या लढाईत लढलेल्या महार सैनिकांच्या स्मरणार्थ, त्यांचे वंशज (बौद्ध) दरवर्षी 1 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा मधील जयस्तंभा’ला भेट देतात. 1 जानेवारी 2018 रोजी, बौद्ध, तसेच काही हिंदू दलित, ओबीसी आणि शीख लोक कोरेगाव भीमा येथे ‘जयस्तंभा’ला भेट देण्यासाठी आले होते.

परंतु काही कट्टरतावादी हिंदुत्ववादी लोकांकडून जयस्तंभास भेट देण्यास आलेल्या आंबेडकरी लोकांवर हिंसात्मक हल्ला करण्यात आला. यासोबतच आंबेडकरी लोकांच्या वाहनांची व सामानांची नासधूस व जाळपोळ करून नुकसान करण्यात आले.

गावातील बौद्ध व मुस्लिम घरांवर कट्टरतावादी हिंदुत्ववादी लोकांनी हल्ला चढवला आणि त्यांच्या मालमत्तेची नुकसान केले. आंबेडकरी लोकांचे रक्त सांडवण्यात आले, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली, लाट्या काठ्यांनी सुद्धा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

भीमा कोरेगाव ग्रामपंचायतीने आंबेडकरी लोकांवर बहिष्कार टाकला होता. 1 जानेवारी या दिवशी ग्रामपंचायतीच्या हुकूमिने गावातील सर्व दुकाने व इतर उपयोगाची सोयीची साधने बंद करण्यात आली होती.

कट्टर हिंसक लोकांद्वारे आंबेडकरी चळवळीतील निळा ध्वज आणि बौद्ध धम्माचा पंचशील ध्वज यांचेही नुकसान करण्यात आले. पोलीस प्रशासन सुद्धा या प्रकरणात विशेष काही भूमिका बजावू शकले नाही.

प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आक्रमक हिंदुत्ववादी कट्टरपंथी लोकांना फूस लावण्याचा आरोप केला. पोलिसांनी तपास करून या दोघांवर कडक कारवाई करण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांसह देशातील नागरिकांनी केली आहे. मात्र महाराष्ट्र सरकार आणि राज्य पोलिसांनी दोषींवर कोणतीही कारवाई केली नाही.

त्यामुळे 3 जानेवारी 2018 रोजी प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील जनतेला “महाराष्ट्र बंद” ची हाक दिली. महाराष्ट्र बंदच्या या आवाहनाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि बंद यशस्वी झाला. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बंदचे पडसाद उमटले. 50% पेक्षा जास्त महाराष्ट्रीय लोक बंदमध्ये सहभागी झाले होते. ही एक चांगली प्रकाश आंबेडकर यांची राजकीय क्षेत्रातील कामगिरी होती

मुंबई बंद पाडण्याची ताकद यापूर्वी फक्त शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होती, मात्र अशी ताकद बाळासाहेब आंबेडकर यांची सुद्धा आहे, याचे सर्व स्तरातील लोकांना खात्री झाली. महाराष्ट्र बंद नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब आंबेडकर यांची ताकद प्रचंड वाढली. ते आंबेडकरी आणि बहुजन समाजाच्या केंद्रस्थानी आले. विशेषत: तरुण गट त्याचे समर्थक बनले.

बहुजन जनता विशेषतः तरुणांनी प्रकाश आंबेडकरांना दलितांचे व बहुजनांचे नेतृत्व करण्याची जोरदार मागणी केली. प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा यासाठी नवीन राजकीय कृती म्हणून नवीन पक्षाची स्थापना केली – वंचित बहुजन आघाडी.

 

The performance of Bharip Bahujan Mahasang and Vanchit Bahujan Aaghadi in the Maharashtra Assembly Elections
भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील कामगिरी

वंचित बहुजन आघाडी

प्रकाश आंबेडकर यांनी 20 मार्च 2018 रोजी वंचित बहुजन आघाडी हा नवीन राजकीय पक्ष स्थापना करण्याची घोषणा केली, ज्याची विचारधारा प्रामुख्याने संविधानवाद, आंबेडकरवाद, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि पुरोगामीवाद यावर जोर देते.

वंचित बहुजन आघाडीने एका वर्षानंतर 24 मार्च 2019 रोजी, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केली. याला जवळपास 100 लहान राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो आहेत.

14 मार्च 2019 रोजी आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन होणार असल्याची घोषणा केली होती. भारिप-बहुजन महासंघाच्या माध्यमातून सोशल इंजिनीअरिंगचा ‘अकोला पॅटर्न’ यशस्वी होऊनही ‘भारिप’ (आरपीआय) या शब्दाने पक्षाच्या विस्ताराला मर्यादा आल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारिप-बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन होईल, कारण वंचित बहुजन आघाडी व्यापक अर्थाने मान्य आहे.

एआयएमआयएमला या वंचित बहुजन आघाडीत सहभागी करण्यासाठी एआयएमआयएम पक्षाचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील (सध्या खासदार) यांनी एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्याशी चर्चा केली व ती सकारात्मक ठरली. त्यानंतर ओवैसी यांनी 2 ऑक्टोबर 2018 रोजीच्या औरंगाबादमधील वंचित बहुजन आघाडीच्या सभेमधे बहुजन वंचित आघाडीला साथ देण्याचे जाहीर केले आणि एआयएमआयएम पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली. आगामी लोकसभा निवडणूक मध्ये एआयएमआयएम आणि वंबआ एकत्र लढले सुद्धा.

 

17वी लोकसभा निवडणूक, 2019

मार्च 2019 मध्ये, वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीला आपल्या 37 लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यामध्ये उमेदवारांच्या नावासमोर त्यांच्या जातीचा किंवा धर्मांचा उल्लेख करण्यात आलेला होता. धनगर, कुणबी, भिल्ल, बौद्ध, कोळी, वडार, लोहार, वारली, बंजारा, मुस्लिम, माळी, कैकाडी, धिवर, मातंग, आगरी, शिंपी, लिंगायत आणि मराठा अशा विविध समाजातील लोकांना उमेदवारी देण्यात आली होती.

उमेदवाराच्या नावापुढे जातीचा/धर्माचा उल्लेख करण्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हटले की, “या आधी मराठ्यांशिवाय इतर कुणाला उमेदवारी दिलीच जायची नाही. म्हणून ते जाहीर करण्याची वेळच येत नसे. हे गृहीतच धरले जायचे की उमेदवार मराठाच आहे परंतु ती नंतर मराठ्यांची सत्ता न राहता कुटुंबाची घराणेशाही झाली.”

बाळासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, “आज आम्ही जात जाहीर केली कारण ही पद्धत कोणताच पक्ष स्वीकारत नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षांत मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली.” ज्या वंचित समाजातील लोकांना कधीही कुठल्या पक्षाने उमेदवारी दिलेली नाही त्यांना वंचित आघाडीने उमेदवारी दिली त्यामुळे त्यांच्या जातीचा/धर्माचा उल्लेख करणे प्रकाश आंबेडकरांना आवश्यक वाटला.

वंचित बहुजन आघाडीचा झेंडा

31 मार्च 2019 रोजी, प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ध्वजाचे अनावरण केले. या ध्वजात अशोकचक्रासह निळा भीम ध्वज; शिवाय त्यात केशरी, पिवळा व हिरवा रंग असलेले त्रिकोण आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, 6 एप्रिल 2019 रोजी, वंचित बहुजन आघाडीने भारतीय संविधानाचा सरनामा हाच त्यांचा जाहीरनामा असल्याचे सांगितले. या जाहीरनाम्यात वेगवेगळ्या 27 मुद्द्यांवर भर देण्यात आला होता.

या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसकडून युतीची ऑफर देण्यात आली होती आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला पाच-सहा जागांवर उमेदवारी देणार होती, परंतु प्रकाश आंबेडकरांनी यापेक्षा दुप्पट जागांची मागणी केली. परिणामी युतीचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि निवडणुकीमध्ये याचा मोठा फटका वंचितला आणि काँग्रेसला सुद्धा बसला. ‘एकीचे बळ’ खूप जास्त असते हे त्यावेळी अनेकांना कळले.

प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली, परंतु ते दोन्ही ठिकाणी पराभूत झाले. यापूर्वी ते अकोल्यातून दोनवेळा खासदार राहिलेले आहेत. महाराष्ट्रातील 2019 मधील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी औरंगाबाद मतदारसंघाच्या एका जागेवर एआयएमआयएम तर बाकीच्या 47 जागांवर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे उमेदवार उभे होते.

त्यापैकी एआयएमआयएमचा एकमेव उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले तर वंबआचा कोणताही उमेदवार जिंकू शकला नाही. राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी 80 हजारांहून अधिक मते घेतली.

2019 मध्ये झालेल्या, या पक्षाने एआयएमआयएम पक्षांसह 17व्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण 48 जागा लढवल्या, ज्यात एका जागेवर एआयएमआयएम उमेदवार उभा होता तर इतर 47 जागांवर वंबआचे उमेदवार उभे होते.

या निवडणुकीमध्ये वंबआ व एआयएमआयएम ने एकत्रित 41,32,242 (7.64%) मते मिळवली. तर वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर उभे राहिलेल्या 47 उमेदवारांना एकूण 37,43,200 मते मिळाली, जे निवडणुकीतील एकूण मतांच्या 6.92 टक्के आहे.

यापूर्वी, 2014 मध्ये झालेल्या 16व्या लोकसभा निवडणूकीत प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर राज्यात 23 उमेदवार उभे केले होते, मात्र सर्वांचा पराभव झाला. त्यांना एकत्रित 3,60,854 (0.7%) मते मिळाली होती.

प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुमारे साडे 37 लाख मते मिळाली मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाला 5 लाखांपेक्षा कमी मते मिळाली होती. दोन लोकसभा निवडणुकी मधील हा फरक प्रकाश आंबेडकरांची राजकीय शक्ती दर्शवतो, जरी त्यांना या मतांचे सत्तेत रूपांतर करता आले नाही.

2014 मध्ये झालेल्या 13व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर 70 उमेदवार उभे केले होते, मात्र त्यापैकी केवळ एकच उमेदवार विजयी झाला. सर्व उमेदवारांना एकत्रित 4,72,925 (0.9%) मते मिळाली होती.

2014 च्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मतांच्या तुलनेत फार कमी मते मिळाली होती.

 

14वी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, 2019

लोकसभेनंतर महाराष्ट्रात लगेचच विधानसभेची निवडणूक आली. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठीच्या जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडी व ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन यांच्यात मतभेद झाला आणि सप्टेंबर 2019 मध्ये त्यांची युती तुटली. निवडणुकीनंतर युती तुटल्याचा फटका वंचितला आणि एमआयएम ला सुद्धा बसला.

वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र विधानसभेची उमेदवारी देताना ओबीसी, भटके-विमुक्त, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मुस्लिम व अल्पसंख्य अशा सर्व समाजाला उमेदवारी दिली होती.

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी 234 मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे केले होते. तसेच 23 इतर उमेदवारांना सुद्धा पाठिंबा दर्शवला होता. बहुजन समाज पक्षानंतर (262 जागांवर लढले) सर्वाधिक जागा वंचित बहुजन आघाडीने लढल्या होत्या.

या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जाहिर केलेल्या यादीनुसार, पक्षाने मराठा समाजाच्या 18 लोकांना उमेदवारी दिली होती. 18 टक्के उमेदवार भटके-विमुक्त (एनटी) जात गटातील असून त्यात बंजारा, वंजारी आणि धनगर या जातींना सर्वाधिक प्राधान्य दिले होते.

अनुसूचित जातीचे (एससी) 50 उमेदवार (17 टक्के) दिले होते; यापैकी 42 उमेदवार बौद्ध व 8 उमेदवार चांभार, मोची, मांग आणि ढोर अश्या जातींचे होते. ओबीसी समाजाचे 32 उमेदवार (11 टक्के) दिले होते, ज्यात हलबा कोष्टी, माळी, सोनार, कुणबी, लेवा पाटील या छोट्या जातींच्या बहुसंख्य उमेदवारांचा समावेश होता.

पक्षाने 25 उमेदवार (9%) मुस्लिमधर्मीय दिले होते. त्यातही मुस्लिमांतील शिकलगार, धोबी, पटवे अशा मागासवर्गीय जातगटातील उमेदवारांना वंचितने प्राधान्य दिले होते. अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राज्यात असलेल्या 25 राखीव मतदारसंघांत वंचितने उमेदवार (9 टक्के) दिले होते.

आदिवासींतील माना, गोंड, गोवारी या लहान जमातींना वंचितने उमेदवारीत प्रतिनिधित्व दिलेले होते. पक्षाने 25 उमेदवार (9%) धनगर समाजाचे दिले होते. वंचितने दोन ख्रिस्ती (एक ईस्ट इंडियन), एक शीख, आणि एक मारवाडी (जैन) उमेदवार दिला होता.

तसेच वंचितने 12 उमेदवार (4 टक्के) या महिला दिलेल्या होत्या. वंचित बहुजन आघाडीने काही मतदारसंघात अपक्ष व एआयएमआयएमच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवलेला होता, ज्यात औरंगाबाद पूर्व, भायखळा, व कुर्ला मतदारसंघांचा समावेश होता.

वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत उभे केलेल्या 234 जागांपैकी एकाही जागेवर विजय मिळाला नाही. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना 24 लाखांपेक्षा अधिक मते (4.6 %) मिळाली. दहा मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांना क्रमांक दोनची मते मिळाली होती, तर अनेक मतदारसंघांत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.

यानंतर प्रकाश आंबेडकर अनेक राजकीय घडामोडींमध्ये सहभागी दिसले. जुलै 2022 मध्ये, प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रपतींच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दर्शवला होता.

वंचित बहुजन आघाडी आता पुढील निवडणुकीसाठी तयारी करत आहे. एखाद्या पक्ष सोबत युती करून आपली शक्ती वाढवून वंचित यशस्वी कामगिरी करू शकते.

 

जानेवारी 2023 मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ पक्षाशी युती केली आहे. उद्धव ठाकरेंंचा पक्ष हा महाविकास आघाडीचा एक घटकपक्ष आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणाले की हा पक्ष केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या हिंदुत्वाला मानणारा पक्ष आहे. आगामी काळात ही युती काय कामगिरी करते हे पाहणे महत्त्वाचे असेल.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नव-नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी उजवीकडील खालील बाजूस असणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

2 thoughts on “प्रकाश आंबेडकर यांचे जीवन चरित्र आणि राजकीय कारकीर्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *